गर्भार
८.३५ ची चर्चगेट लोकाल..;
कितीतरी मुली आणि बायका
गोऱ्या काळ्या , ऊन्च आणि बुटक्या
त्यांच्यातलीच एक ती
आजची उत्सवमूर्ती
गोड गोजिरी सुंदर साजिरी
कुंकवाची टिकली पोत् काळी
हिरव्या रंगाची, साडी काठा पदराची
टपोऱ्या पोटाची ,सातव्या महिन्याची
"अगं नीट" ,"सावकाश" ,"सांभाळून",
"मी उठते ,तू घे बाई बसून"
"जाई ,जुई ,आबोली, मोगरा
घ्या न ताई दोन रुपयांला गजरा"
"लवकर ये ग इकडे गजरेवली"
"किती हळूबाई, मुलुखाची वेन्धली "
"तुला ग कसला चढलाय माज?
दे चाल पटकन पाचला पाच"
"मला ग गजरे भरू या उटी
मुलगाच येऊ दे तुझ्या पोटि "
आज शेवटचा दिस उद्यापासून माहेरी
"कसा बी करमेल ह्यांना एकटा घरी "
लाजऱ्या मुखावरी सुखाचा कवडसा
कोण असेल? बाळ दिसेल कसा?
--------------------
८.३५ ची चर्चगेट लोकल
कितीतरी मुली आणि बायका
गोऱ्या काळ्या , ऊन्च आणि बुटक्या
त्यांच्यातलीच एक ती
रोजचीच पिडलेली
काळी सावली, धान्द्रट बावळी
साडी चुरगळलेली डोक्यावर टोपली
दडवलेल्या पोटाची कितव्यातरी महिन्याची
बाई कुणा गरिबाघरची
"जाई ,जुई ,आबोली, मोगरा
घ्या न ताई दोन रुपयांला गजरा"
"बाई एक गजरा घेता का?"
"शिट डोळे फुटले का ?"
"काय तरी लाज न जनाची न मनाची
स्वताच नाही धड ह्यांना हौस पोरांची"
थकलेल्या मुखावर क्षीण प्रश्नांचा
कोण असेल बाप तरी ह्याचा?
हफ्तेवाला पोलिसदादा का चाहावला
ह्मातारा हमाल का भिकारी पांगळा ?
--अनिता डीसा