Author Topic: मला न समजलेलं राजकारण…  (Read 485 times)

मला न समजलेलं राजकारण…
« on: February 24, 2015, 10:44:20 AM »
"राजकारण…" किती साधा आणि सरळ शब्द आहे…
पण याचा नेमका अर्थ सांगायला… शब्दकोशही निशब्द आहे…
कसाही पाहिला तरी… हा शब्द बरबटलेलाच दिसतो…
इथे उभा प्रत्येकजण… त्या चिखलाने माखलेला असतो…

पिढ्यान पिढ्या चालत आलंय… म्हणे याचा इतिहास खूप मोठा आहे…
जमेल तिथे मूळं रोवत आलंय… याचा पसारा फार मोठा आहे…
कधी सत्तेसाठी कधी पैशासाठी… तर कधी नुसता सूड घेण्यासाठी…
राजकारण खेळलं जातंय… जनतेचा जीव घेण्यासाठी…

राजकारण कसं खेळावं… याला कुठलेच नियम नसतात…
काय मिळालं काय गमावलं… याची गणितच निराळी असतात…
आई-बाप, काका-मामा… इथे प्रत्येकजण वैरी असतो…
एकट्यानेच जगतात सगळे… इथे जिवाभावाचा कोणीच नसतो…

नाती म्हणजे वर चढायला… वापरलेली फक्त एक शिडी असते…
एकदा वर पोचल्यावर… जिची पुन्हा कधीच गरज नसते…
बुद्धिबळाचा हा खेळ… यातलं कोडं कधीच सुटत नाही…
माणसं अशीही वागू शकतात… हेच आमच्या मनाला पटत नाही…

चांगला हेतू चांगले विचार… इथल्या जगाला मानवत नाहीत…
इतरांना होणाऱ्या पिडा… यांच्या कठोर मनाला जाणवतच नाहीत…
विरोधात उठणारा आवाज… सोयीस्कररीत्या दाबला जातो…
अन आवाज उठवणारा… accident मध्ये मारला जातो…

राजकारण करायला… कुठलंही कारण लागत नाही…
दगडाचं कठीण मन हवं… मग डिग्री सुद्धा कुणी मागत नाही…
कोणाचीही असो चित-पट… सामान्य माणूसच भरडला जातोय…
राजकारणाच्या वरवंट्याखाली… वर्षानुवर्षे चिरडला जातोय…

राजकारण म्हणजे चिखल… याला कुणी बर साफ करावा…?
वाटतं… जनतेच्या हितासाठी एकतरी महारथी यात उतरावा…
राजकारणाचा खरा अर्थ… कदाचित तेव्हाच आम्हाला कळेल…
अन दूर जाणारं आमचं पाऊल… स्वतःहून या राजकारणाकडे वळेल…

- टिंग्याची आई  :)
http://tingyaachiaai.blogspot.ca/2014/11/blog-post_17.html

Marathi Kavita : मराठी कविता