ती कविता लिहायची राहूनच गेली,
जरा उशीरच सुचली मला ती,
माझ्यातला कवी जरी नव्हता संपला
साठवू नाही शकलो शब्दात मी तिला,
किती वेळा लिहिली.... अर्धवटच,
वाटायचं लिहून झाल्यासारखं
पण समाधान होत नसे तिचं,
कधी खोडली, रेघोट्या मारल्या ओळींवर,
किती कागद चुरगळून फेकले,
जपायला हव्या होत्या त्या ओळी,
जतन करायला हवे होते ते कागद
कवितेच्या मृत्युपत्रांसारखे.....
मी शोधात रहायचो तिला
असेल नक्कीच कुठे मनाच्या आसपास,
उगवण्यापुर्वीच्या सूर्यासारखी
अचानक रंग भरायची माझ्या आयुष्यात,
पण माझ्या क्षितिजावरचे आकाश
सतत ढगाळलेले......
ओल्या कागदावरच्या शाईसारखे
विरघळत रहायचे माझे शब्द तिच्यात
आकार घेण्यापूर्वीच..........,
पण अपूर्ण राहिली तरी
ती माझी कविता आहे
हे समजले नाही तिला कधी,
दुसरे कोणी करू शकणार नव्हते
इतके प्रेम होत तिच्यावर,
ते स्वताच जेव्हा उमगेल तिला
आणि 'पूर्ण' होईल ती
तेव्हा शेवटी खाली माझीच सही असेल.