दे मला तुझ्या वेदना साऱ्या,
माझ्या सुखाचा सारा आसमंत घे.
पांघर तुझ्या मनाला वास्तवाची शाल माझ्या,
दे मला सारी तुझी खंत दे.
दे मला नश्वरतेचा शाप तुझा,
चिरंतर असलेला माझा अनंत घे.
राख झालेल्या भावनांच्या,
जखमांचे निखारे ज्वलंत दे.
दे मला तुझे एकटेपण,
घे माझ्या साऱ्या सहवासाचा प्रांत घे.
तुझ्या नावे कर पुण्याईचे ढिग माझे,
दे मला तुझा सारा आकांत दे.
नको राहूस उदासीन आता,
घे माझे तेज सारे नखशिखांत घे.
तेजोमय हो असा अन,
दे मला तुझी सारी भ्रांत दे.
दे मला तुझे अज्ञान सारे,
घे माझ्याकडला ज्ञानवंत घे.
खोटी भीती नियम शिकवले ज्याने,
दे मला तो तुझा वेदांत दे.
घे माझा जन्म तुला,
घे त्यातली उसंत घे.
घे माझे उरलेले श्वास अन,
दे मला तुझा अंत दे.
...............