आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
दिसत नाही फूल
तरी वास येतो !
तुम्ही म्हणाल भास होतो !
भास नव्हे : अगदी खरा
गालांवर श्वास येतो !
मनातल्या फांदीवर गुणी पाखरू येऊन बसतं;
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
किलबिल करीत जाग्या होतात
त्याच्या सगळ्या हालचाली,
कधी शब्द, तर कधी
शब्दावाचून त्याची बोली
धुपासारखी भरून टाकते सगळी खोली !
ज्याचं त्याला कळत असतं :
त्याच्याशिवाय, तिच्याशिवाय
जीवाला इतकं बिलगून कुणीच नसतं !
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
आपण आपलं काहीबाही
करीत असतो,
सगळ्यांसाठी हे करीत, ते करीत
वेळ आपला भरीत असतो !
जरा थांबा,
आठवून बघा :
एकटेच आपण आपल्याशी हळूच हसतो,
खरंतर आजूबाजू कोणीच नसतो !
हसता हसता कोण आपले डोळे पुसतं ?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
संध्याकाळच्या गूढ सावल्या,
रात्र होते खिन्न काळी;
पाखरं गाणी मिटून घेतात,
मुकी होते रानजाळी !
घराच्या पयरीवर कोण तेव्हा एकटं बसतं ?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
खिडकीतून दिसणारा
नोळा तुकडा कोणाचा ?
फांदीमागे चंद्र आहे :
हसरा मुखडा कोणाचा ?
एकान्तात उगवणारा
एक तारा कोणाचा ?
निरोप घेऊन येणारा
ओला वार कोणाचा ?
डोळे मिटून घेतल्यावर आपल्याला कोण दिसतं ?
आपलं माणूस किती दूर असलं तरी
आपल्या अगदी जवळं असतं !
मंगेश पाडगांवकर