मला दु:ख जळण्याचे नाही
धुरामध्ये विरण्याचेही नाही
दु:ख एव्हढंच की,
तू मला फक्त जाळलेच नाहीस
जाणलेही नाहीस
आठव कधी मी तुझी साथ सोडली?
कधी मी तुझी कांस सोडली?
प्रेमात पडल्याच्या आनंदातही
तू माझी राख केलीस
प्रेमात आपटल्याच्या नैराश्याताही
तू माझीच राख केलीस..!!
धावपळीतला विसावा म्हणून
मला रोज जाळतोस
निश्चिंत शांत एकांतातही
फक्त मलाच जाळतोस
तो तुझा पेला कसा नेहमी विसळून स्वच्छ करतोस..
मला मात्र कुठेही बेदरकार भिरकावतोस..
मान मुरगाळून चुरगाळतोस..
गटांगळ्या खायला बुडवतोस..
काहीच नाही तर चक्क, चिरडूनही टाकतोस..
अरे, दुनियेत तुला ज्याने-त्याने फक्त 'बनवलं' आजवर
एक मीच जी जळायलाही तयार असते तुझा इशा-यांवर
मी जळले तेव्हढाच धूर तरी झाला
तुला तर लोकांनी धूर न काढताच जाळला..
....रसप....