कुणी केली किती माया तरी वाटतो परका,
दुजेभाव मनातला सलतो सारखा.
मज वाटे कि प्रीत केवळ नसानसांतून धावे,
तसे नसे काही हे तर सारे फसवण्याचे कावे,
स्फटिक टोचती पाया फुटल्या हिरयांचे,
ते हिरे नव्हते होत्या नभातल्या तारका.
पुजत असतो ज्यांना मानून देव्हारयातली मूर्ती,
खरा भाव त्यांचा असतो निजस्वार्थी,
चिखल होतो निष्ठेने वाहिल्या फुलांचा,
डोळ्यात झोंबतो भाळावरचा श्रद्धावंत भूक्का.
नफ्या-तोट्याचा सारा हा बाजार,
माया जमवण्याचा जडलेला आजार,
इथे बापच काढतो पोटच्या पोरीला विकाया,
तर कुण्या बापालाच आहे पोरापासून धोका.
वाटतो जो कुणी पुरया जीवनाचं आभाळ,
तोच करतो अखेर खरया नात्यांची आबाळ,
धीर द्यायला आयुष्यभर असतो जो पाठीशी,
क्षणात सोडून साथ तो करतो पोरका.
जीव ओवाळून टाकतो खरा जयांवरी,
तोच खोल जखम देतो उरात अंतरी,
खंजीराची धार वार करताच नाही,
राग लपलेला असतो सुप्त मनातला मुका.
....... अमोल