तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे..
प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात..
ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..?
नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात..
स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात..
अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१||
तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे..
सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे..
बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे..
माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे..
धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ ||
तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार
मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार..
शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे..
आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे..
अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ ||
तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. !
Author - Unknown