दिसाच्या डोळ्यास दिव्यांचा प्रकाश,
रात्रीच्या अंगास सावल्यांचा भास,
पसरली थंडी हवेमध्ये गार.
निज बाळा आता रात्र झाली फार.
दमलास सारा दिसभर सोन्या,
घराच्या दिशा तुझ्या पावलांस उण्या,
दे थोडा आता खेळन्यांना थार.
निज बाळा आता रात्र झाली फार.
लागली असे भूक घे थोडा घास,
ऐक आता जरा देऊ नकोस त्रास,
रागवीन जराशी, देऊ कारे मार ?
निज बाळा आता रात्र झाली फार.
सोन्याचे दिस तुझे लहानपण,
सखा आणि सखी आपण दोघेजण,
मोठं होशील तेव्हा विसरशील का सारं?
निज बाळा आता रात्र झाली फार.
माझ्यासुद्धा डोळा दाटली रे निज,
तू सूटतोस माझ्या कुशीतून सहज,
पुरे झाले चांदणे, लाऊ खिडकीचे दार.
निज बाळा आता रात्र झाली फार.
वाटते का भीती लहानपण जाण्याची,
खेळातच आहे का मजा तुझ्या जिण्याची,
दिसतं तुला पण कारे दाट भविष्य येणारं.
निज बाळा आता रात्र झाली फार.
.........................अमोल