कविता-कुणाला स्फुरते, कुणाला सुचते, कुणाला प्रसवते, कुणाला सीजर करून काढावी लागते :D. मी बापडा कविता सरळ पाडतोच ::). समस्त कवींची क्षमा मागून मी एवढेच सांगू इच्छितो की कविता कोणालाही सहज पाडता येण्यासारखी गोष्ट आहे :P. थोडे शब्दभांडार, थोडे व्याकरण, थोडी मनाची तरलता आणि खूपशी इच्छा ह्या बळावर कोणीही कवी बनू शकतो 8). आता माझेच पहा ना! मी कुठल्याही विषयावर ५-१० मिनिटात बऱ्यापैकी कविता पाडू शकतो. मी काही एखादा प्रेमवीर वगैरे नाही. तरी पुढील कविता वाचून पहा. मी तुम्हाला नक्कीच एखादा प्रेमगीते लिहिणारा कवी वाटेन :'(.
रिमझिम पडती पावसाच्या धारा
अंगांग भिजवी ओलाचिम्ब वारा
रेशमी रेघानी ओघळू आले मन
हळूच ओठानी घुसळले तन
नदीचा प्रवाह धावे सागरा पाहून
आलो बाहूत तुझ्या जाया विरघळून
तृप्तिचा हा गंध मना जाई वेडावून
तुझ्या प्रेमात गेलो विरून-मिसळून
आहे ना गम्मत. आता ही चारोळी पहा:
ध्येयासाठी प्रवास
हेच खरे जीवन
ध्येयाविना प्रवास
म्हणजे नुसतीच वणवण
काय? वाटलो ना मी विचारवंत.
आता ही कविता पहा:
मी कोणाचा सांगा बर
आईचा की बाबांचा?
पण खर सांगू का
मी किनई माझ्या ताईचा
आईने मला अडगुलं-मडगुलं शिकवलं
ताईने मला ते फेकायला शिकवलं
बाबांनी मला बॉल आणून दिला
ताईने मला तो झेलायला शिकवला.
ह्यातून माझ्यातील खट्याळ मूल दिसलं असेल.
कालचा इतिहास, उद्याचा अविश्वास
कुणाचा भरवसा, कुणाचा विश्वास
नात माझी जवळ होती सकाळी
भुर्रकन पुण्याला उडून गेली
ध्यास लागतो वेडा
कळ उठते मनात
मनाला किती समजावले
जग वर्तमानात
आपल्या प्रत्येकाच्या मनात एक ठसठसणारी जखम असते. ती अशावेळी बाहेर येते इतकेच. कविता म्हणजे तरी काय, तर आपल्या अशा भावनांचा तरल आविष्कार. काही नाही हो. प्रत्येकाच्या मनात एक खोडकर मूल असते, एक हळुवार तरुण-तरल मन असते आणि एक परिपक्व प्रौढत्व असते. केव्हा कोणाला बाहेर काढायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
- उदय जांभेकर