आयुष्याच्या वाटेवर
किती सावल्या आल्या
फक्त थोडे घुटमळून
क्षणातच निघून गेल्या,
तालापणाऱ्या ऊन्हातसुद्धा
माझा प्रवास सुरूच होता
आपुलकीच्या देखाव्यात
जो तो गल्लेभारुच होता,
चालता चालता पाय जेव्हा
तापल्या मातीत पोळू लागले
पायाखालची ओल शोषणाऱ्या
सावल्यांचे अर्थ कळू लागले,
साऱ्या सावल्या आल्या नि गेल्या
डोक्यावर उरली एकच सावली
वात्सल्याचा पदर घेऊन
होती माझी माय-माउली,
गर्भातूनच सावली धरून
माय आली आभाळ होऊन
माझ्यासाठी फुलत राहिली
स्वत: मात्र सोशित ऊन,
तिच्या छायेत नव्हता स्वार्थ
फक्त मायेचा झरा होता
सावल्यांच्या गुंतावाल्यात
एकच खरा अर्थ होता..
--------- प्रा. रायभान दवंगे