सान्ग शब्द कसे सुचायचे
पहाटेस ताम्बडे फुटताना
चारी दिशा सोनपिवळ्या रन्गताना
धरतीवर प्रकाशवर्षा होताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या प्रकाशाला कवितेत कसे बान्धायचे
आकाशात ढग दाटून येताना
टिपटिप थेम्ब सरीन्मधे बदलताना
ओला कोवळा मृद्गन्ध दरवळताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या श्रावणाला कवितेत कसे बान्धायचे
झुळझुळणार्या झर्यामधे डुम्बताना
किनार्यावर मनसोक्त विहरताना
चिमुकल्या माशाना हळूवार सतावताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या आनन्दाला कवितेत कसे बान्धायचे
पक्षान्ची सुरेल तान ऐकताना
फुलपाखराना अलगद छेडताना
नाजुक फुल वार्यावर डुलताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या वसन्ताला कवितेत कसे बान्धायचे
गर्द धुक्यात वाट सापडताना
झाडान्ची पानगळ पान्घरून घेताना
इवलेसे दवबिन्दू केसात माळताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या शिशिराला कवितेत कसे बान्धायचे
तुझा हात हातात घेताना
भरदार छातीवर पळभर विसावताना
ओठान्ची भाषा डोळ्यानी बोलताना
सान्ग शब्द कसे सुचायचे
या एकरूपतेला कवितेत कसे बान्धायचे
Unknown