खळं
खळं भरलं दाण्यांनी
कसं डोळ्यात साठवू
माझी फाटली गं ओटी
किती ओंजळीत घेऊ
गोल सपाटली भुई
जसं खळं चांदण्याचं
थेंब पिऊन घामाचं
दाणं पिकलं मोत्याचं
खिलारी गं बैलजोडी
कशाकशाने नटवू
खळं भरलं दाण्यांनी
कसं डोळ्यात साठवू
उन्हं, चांदणं, काळोख
सारं झेलतं गं खळं
भोळ्याभाबड्या मनाचं
भारी जगण्याचं बळ
ढीग रासेचा बघून
सुख लागते पालवू
खळं भरलं दाण्यानं
कसं डोळ्यात साठवू
दिस डोईवर येतो
गोळा करता मोतरं
दाणं खेळती सुपात
वारा धरताना फेर
पाचुंद्याच्या ढिगाआड
धेनू लागली पान्हवू
खळं भरलं दाण्यांनी
कसं डोळ्यात साठवू
- सौ. कल्पना दुधाळ, बोरी भडक (ता. दौंड)