मारकुट्या मास्तरांना धडा
"कशाले काय म्हनू नही' या ज्येष्ठ
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या धर्तीवर
मारकुट्या मास्तरानं,
जाणावे कोवळे जिऊ
विद्यालयी चिमण्याची,
करू नये पाठ मऊ...
मारकुट्या मास्तरानं,
उत्तमच द्यावी दीक्षा
भक्तगणा, देऊ नये,
असह्य, अघोरी शिक्षा...
मारकुट्या मास्तरानं,
नेत्र उगा रोखू नये
छडी हातात घेऊन,
निरागसा ठोकू नये...
मारकुट्या मास्तरानं,
वेगानं उखडू नये
रागानं लाल होऊन,
चेल्यास बदडू नये...
मारकुट्या मास्तरानं,
फुलाला दुखवू नये
खूप निष्ठूर होऊन,
वळाला उठवू नये...
मारकुट्या मास्तरानं,
म्हणावेच प्रेमगान
मूल चुकून चुकता,
बनावेच झमावान...
मारकुट्या मास्तरानं,
छात्रा, मारणं टाळावं
प्रेमधडा पटवण्या,
साने गुरुजीच व्हावं...
- श्रीकांत नायकवडी, सातारा