जगत आहे तसे साधेच आयुष्य माझे,
जगण्यात तसे विशेष काही राहिलेच नाही.
उपेक्षाच आली जगताना आजवर जन्मभर,
किती खास जगलो तेही वळून पहिलेच नाही.
कोणताही देव ना कधी प्रसन्न झाला,
त्याचा हि काय दोष! मी फुल कधी वाहिलेच नाही.
मीच कवाडे खुली केली येणाऱ्या संकटांना,
कंटाळून त्यांना कधी मी दार लाविलेच नाही.
ते आले होते जखमांवर माझ्या फुंकर घालण्याला,
पण खुले करून घाव सारे मी हि दाविलेच नाही.
मोकळा भेटलाच ना कुणी सच्चेपणे सांगण्या दुखः,
कागदावरी या मोकळीक भेटता मला राहविलेच नाही.
हुंदके अपार आले काळोख्या कोपऱ्यात,
परी उजेडात हे अश्रू कधी वाहिलेच नाही.
नशा चढली होती तेव्हा पहिल्याच थेम्बातून,
नंतरचे घोट सारे शुद्धीतून पिलेच नाही.
कण कण मरताना मला मी पहिले आहे,
आता जे आले आहे ते मरण पहिलेच नाही.
.......अमोल