कळेना कसे राजभाषा परि
हि माय सोसे हाल आपल्याच घरी
असे आमुचि हि माय जरि
भिकारिण वाटे आपल्याच दारि
आम्ही लाडके, माजोरडी बालके
करी दुजाभाव हिच्यापरि
वाटतसे लाज आम्हास भारि
जाहलो कृतघ्न तिच्यावरि
असे सोशिक हि मायमराठी
हाल बेहाल जाहली तरि
आम्हास खेळवि अमृतामाजी
लागले प्यावया हलाहल जरि
कसे पांग फेडू कळेना हिचे
आणिले जरि सहस्त्रतारे भुमंडळी
घेऊ शपथ उद्धरावया हिला
नेऊ तिला स्वर्गादपि देवतांमाजी
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)
