एकदा एक पोपट स्वतःवरच चिडला,
म्हणाला, " माझं हे जीवन आहे की झाडाचा सुकलेला पाला !
काय नुसतं या झाडावरून त्या झाडावर जायचं,
फक्त अन्नासाठी दाही दिशा भटकायचं.
काय ठेवलं आहे त्या पेरू आणि मिर्चीमध्ये,
पिझ्झा बर्गर टाकावे वाटतातच ना माझ्या लालचुटूक चोची मध्ये. "
निर्मळ तळ्यात, धबधब्यात सर्वांनी भरपूर दंगा केला,
" सर्दी झाली मला तर येणार आहे का कोणी औषध द्यायला! "
थंड वाऱ्याची झुळूक फुलवीत होते प्रेमाचा ओलावा,
" मफलर गुंडाळतो, वाढलाय फारच गारवा ! "
अनेक हिवाळे, उन्हाळे गेले, त्याने अनेक पावसाळेही बघितले,
पोपटाचे मन मात्र दिवसेंदिवस उदास,दुःखी,चिडखोर होऊ लागले.
एकदा एका निवडूंगाखाली उदास बसलेला तो मैनेनं पहिला,
तिनं हळूच विचारलं, " का रे , काय झालं तुला ? "
" ह्या जीवनाला मी कंटाळलो आहे जाम,
मेरे जीवनमे नहीं बचा अब कोई राम ! "
मैना म्हणाली, " तुला नकोसं झालं आहे या ठिकाणी,
कारण तुला मुळी पचतच नाही इथलं पाणी !
तू घे उंच भरारी त्या उंच आकाशात,
आणि जा तुला हव्या त्या आवडत्या जंगलात. "
मैनेचे ते बोल ऐकून त्यानं खरंच सोडलं ते जंगल,
निघाला पचणाऱ्या पाण्याच्या शोधात, ज्याला आपण म्हणतो 'मृगजळ'
तो उडत उडत शेवटी एके ठिकाणी पोहोचला,
त्याला कुणीतरी सांगितलं, सीमेंटच जंगल म्हणतात त्याला.
एका पडक्या, जुनाट घरात तो पोपट शिरला,
मोडकी खिडकी, तुटलेलं दार, पडलेल्या भिंतींची खोली ओळखीची वाटली त्याला.
त्या खोलीच्या मध्यभागी एक होता मोडका पिंजरा,
त्याच्या जवळ जाताच पोपटाला आठवला भूतकाळ सारा.
पिंजरा पोपटाला म्हणाला, ' अरे पोपटा, तू आलास परत !
इथून कंटाळून, चिडून आणि मला तोडून निघून गेलेला तूच न तो वेडा पोपट ! '
- Omkar P Badve