कविता
कविता म्हणजे हृदयातील शब्द
वाचून जिला, होई मन मुग्ध
जे साध्या शब्दांत न होई व्यक्त
मदतीला येतसे कविताच फक्त
कविता म्हणजे जणू स्वर्गीय वाणी
पहाटेच्या गवताचा स्पर्श अनवाणी
कविता ही कवीची प्रेमकहाणी
राघूने मैनेला गायलेली गाणी
काव्यात शब्दांना अमृताची गोडी
पोपटाला जशा त्या पेरूच्या फोडी
भावनेला अचूक शब्दांची जोडी
शोभे जशी राधाकृष्णाची जोडी
कविता ही कवीची गरुडभरारी
यमुना तीरी जसा कृष्ण मुरारी
जेथे समाप्त होई क्षमता रवीची
तेथे सुरु होई कविता कवीची
-स्वप्नील वायचळ