एक दिनचर्या
काळोखाची रात्र होती शांतता भयाण होती
रातकिड्यांच्या किरकिरीसंगे घुबडांची घुत्कार होती
दिवसभराच्या श्रमाने थकलेली नि भागलेली
साखरझोपेमधे धरा स्वप्न सुंदर पहात होती
पूर्वेकडच्या क्षितीजावरुनी हळूच सूर्य डोकावला
भरून उर्जा ठासून त्याने पहिला किरण पाठवला
दबलेल्या पायांनी अलगद हळुवार तो किरण आला
स्वप्नमग्न धरतीला त्याने अलगद रेशीम स्पर्श केला
मोरपिसाच्या स्पर्शाने त्या अंगावरती फुले उमलली
शीण सारा गायब होऊन धरती ताजीतवानी झाली
एका मागे एक साऱ्या किरणांची बरसात झाली
न्हाऊन त्यात धरती पुन्हा दिवसासाठी तयार झाली
-स्वप्नील वायचळ