मी वेळ
एकच दिशा माझी, मला येत नाही वळता
एकच गती माझी, मला येत नाही पळता
एकदा निघून गेले की मी पुन्हा येत नाही
असताना लवकर माझी किंमत कळत नाही
नाव माझे वेळ मला आदि ना अंत
वाटचाल चालू माझी सतत नि संथ
ठोक्यावर माझ्या चाले विश्वचि अवघे
प्रवासात माझ्या येती अनुभव नवखे
आनंदात वाटते मी तुरुतुरु चाले
दु:खात वाटे जणू अचल मी राहे
किंमत माझी बदलते व्यक्ती परोक्ष
आईनस्टीनला वाटते मी आहे सापेक्ष
लग्न जुळवताना माझे महत्व किती
मुहूर्तावर चालू होती शकुनाच्या रीती
जन्मवेळी आकाशातील ताऱ्यांची स्थिती
ठरविते छत्तीसपैकी जुळतात किती
धावण्याच्या शर्यतीत सेकंदाला मान
वेळीच उपचार केले तर वाचतील प्राण
विहीर खोदू नये जेव्हा लागली तहान
शक्तीपेक्षा प्रसंगी युक्तीही महान
मनसोक्त दवडे कोणी कोणा वाटे भीती
नशेमध्ये चूर कोणी अभ्यास करी राती
रागलोभ कोणाचा ना कोणावर प्रीती
यशापयश तुमचे हो तुमच्याच हाती -स्वप्नील वायचळ