हंडारास
घाटाखालून पाणी आणते,माझी माय माउली,
हंडारास डोईवर,बघा तिने रे लावली...
दुरदूर भटकते,ती रे पाण्याच्या शोधात,
अर्धा जीव कुडीमध्ये, अर्धा अपुल्या पिलांत.....
हंडा डोईवर घेऊन, चढे ती हा घाट,
बघा कसे भिडले तिचे, पाठीलाच पोट....
नाही अंगी तिच्या त्राण, नाही जीवाला आराम,
लिहिले आहे भाळी तिच्या, अखंड काम आणि काम....
करी वणवण रानी, बघा शोधण्या पाणी,
समुद्र आटलाय तिच्या, खोल-खोल नयनी.....
रानीवनी हिंडोनी, देह तिचा करपला,
धाप लागे तिला आता, श्वास हृदयी कोंडला......
पाय पायात अडकतो, तोल जाई रे चालला,
मृत्यू दारावर उभा, हाल जीवन जगता....
दिगंबर