ओम साई
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय.....
कुठेतरी हृदयात काही तरी खुपतंय,
कितीही शोधलं तरी,दडून काही लपतंय,
कच्च्यादोरीच पाळणी,हे बेभान झुलतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय.......
कळत नाही बरोबर,कि काही तरी चुकतंय,
शुश्कावीत मन-रोपटं,मुरत्या पाण्यास मुकतंय;
भासलं एकदा खोट्या आशेन,कि हे थोडं झुलतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय.......
अदृश्य सख्या समवेत,हे सतत बोलतंय,
विचार सोलणीने,सालपटि भावना सोलतंय;
झोपत कधी कडेला,तर कधी होऊन पालथंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय.......
काय हवं याला,न यालाच काही कळतंय,
दिशाहीन वाटेनं,सैरावैरा पळतंय;
निष्कारण स्वतःस,असुरापरी छळतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय.......
कोणत्या आगीला,हे मेणावून गळतंय,
कोणापासून लपून,लांब हे पळतंय;
लई-ठेका सोडून आज वेगळंच तालतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय......
कुठल्या प्रेमहाकेला,जणू हे अतुरतंय,
सगळं कसं विचित्रच आज मनी घडतंय;
थंड फुंकरी सुद्धा,ओल्या जखमा छीलतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय......
का विचार-वादळाला असं हे जपतंय,
स्वतःस आगी पोळून,भावना उन्हाळी तपतंय;
ओल्या सरेस अपेक्षून वेडं, स्वप्नीच खुलतंय,
कोण जाणे मनात,काही तरी सलतंय......
चारुदत्त अघोर.(दि.४/२/११)