कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्या कवितेशी कुठेही संबंध नसतो
एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात
त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी
बर्याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...
मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!
-काव्य सागर