घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत,
घर म्हणजे भिंतीवरचे छत,
जे आपल्यावर कधीच कोसळत नाही.
घर म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे,
घर म्हणजे आपलं माणूस,
जे नेहमी फक्त आपलाच विचार करतं.
घर म्हणजे फक्त निर्जीव जिन्नस नव्हे,
घर म्हणजे त्या वस्तू,
ज्या प्रसन्गी सजीव होऊन
आपला एकटेपणा दूर करतात.
घर म्हणजे फक्त संभाषण नव्हे,
घर म्हणजे चार प्रेमाचे शब्द,
जे आपल्याला आपुलकीची ऊब देतात.
घर म्हणजे फक्त नात्यांचे बंध नव्हेत,
घर म्हणजे नाजूक रेशीमगाठी,
ज्या परस्परांची हृदये जोडतात.
घर म्हणजे फक्त एक इमारत नव्हे,
घर म्हणजे एक वास्तू,
जी सोडायची वेळ कधी येऊ नये,
आणि आलीच, तर खूप वेदना होतात,
आपल्याला आणि घरालाही…