जरी झाली दिवेलागणी
तरी म्हणत नाही “शुभंकरोती”,
खरतर तू आजही असायला हवी होती.
तू गेल्यापासून कसलं गं,
उरलंय आयुष्यात “कल्याणम”,
आला दिवस जातोय तसाच,
माझेही रोजच्या सारखे शरणम.
आता फार चिड येते,
म्हणताना “आरोग्यम धनसंपदा”,
आजारानेच गेलीस तू ,
आणि दारिद्र्य हसले खदाखदा.
“शत्रुबुद्धि विनाशाय ,
दीपज्योती नमोस्तुते”,
तू नसल्यावर हा सारासाराचा,
माझ्याकडे विचार कुठे.
“दिव्या दिव्या दिपोत्कार,
कानी कुंडले मोती हार”,
शुकशुकाट घरामध्ये,
आणि देवघरात अंधार.
तेव्हापासून नाही होत,
“दिव्याला पाहून नमस्कार”,
तू गेल्यापासून फक्त जगतोय,
विसरून सारे संस्कार.
कधीच नाही फुलल्या,
तेव्हापासून दिवा पणती,
घरात नाही तेवल्या,
त्या दिवसापासून वातीवर ज्योती,
मीही नाही म्हटली.
त्या दिवसापासून शुभंकरोती,
ज्या दिवशी मी तुला.
चितेवर पहिली होती.
.....अमोल