रस्त्यावरून जाता जाता ,कधीतरी एक call आला
‘Mum’ Calling असं झळकावून मग ,माझा phone वाजू लागला
“हो ,अगं just पोचतो ,हा jam फार irritate करतोय
आज traffic बघ ना ,snail’s pace नि पुढे सारतोय ”
Phone ठेवला ,brake सोडले ,गाडी चे चाक जरासे पुढे सरले
मन मात्र मागे आले , दोन मिनटा पूर्वीच्या बोलण्यात दडले
कसं आरामात भाषांतर झालं ,
’वैताग’ चा ‘irritate’ झालं
आणि ‘हळू हळू ’ चा ‘snails pace’ झालं
मग आपणहूनच मन माझं ,जेभेवर्ती मागे गेलं.
“अर्रे बापरे ” कधी ‘Oh Fuck’ झालं ,ते कानालाही कळला नाही
जीभ भाषेशी घात करताना ,मनाला काहीच भिडलं नाही
रस्त्यावरचे लोक आता “अरे मित्रा ” सोडून “ओ भैय्या ” होते
मैत्रिणीचे नाव सुधा “जयु ” सोडून “Jazz” होते .
प्रेमाला तर कधीच ‘love’ नि मागे टाकलं होतं
मराठीत प्रेम व्यक्त करणं ,बर्याच आधी expire झालं होतं
इतर भाषांची चाकरी जणू मनात ऋत्लीच होती
जेभेवरची मातृभाषा आता जशी सावत्रच वाटत होती
इतक्यात steering वरच्या हाताला टोकदार काहीतरी जाणवलं
“आई चा घो !” म्हणत मी हात मागे खेचला
काटा रुतला होता हातात ,टिपूस भर रक्त निघालं होतं
मन मात्र खुश होतं ,ते रक्त माझं मराठीत वाहिला होतं .