वार्याच्या मंद झुळूकेबरोबर
मला येते तिची आठवण ..
तिच्या नजरेतला इकरार बघण्यासाठी
... जपला होता एक क्षण.....प्रेमाचा
आठवणीत तर कायम राहतील
मित्रांच्या संगतीतले क्षण ..
त्यांना पुन:पुन्हा जगण्यासाठी
राखून ठेवला होता एक क्षण....मैत्रीचा
घरट्यात चिवचिवणार्या पिल्लांकडे
कायमच झेपावत असतं चिमणीचं मन ..
त्यांना घास भरवण्यासाठी
राखलेला असतो तिनेही एक क्षण....ममतेचा
जिवलगांपासून दुरावताना
आक्रंदून उठतं मन ..
त्या वेदना विसरण्यासाठी
विसरतो मी तो एक क्षण ....विरहाचा
क्षण...
क्षणाक्षणाला बदलणारे क्षण...
घट्ट पकडलेल्या मुठीमधल्या वाळूसारखे घसरणारे क्षण...
पण तरीही जपायचा असतो एक क्षण....आयुष्याचा
-स्वप्नील