पूर्वा उजळणारी,
भास्कराची सोबत करणारी ..
तळपती,चैतन्यमयी..
गुलाबी पहाट मी..
की..
शीतलता घेऊन येणारी,
चंद्र-चांदण्यांचा नजराणा देणारी..
धुंद निशा मी???
अवखळ्,पोरकट ..
खळाळून वाहणारा निर्झर मी..
की..
शांत ,अमाप खोलीचा सागर??
कोसळणारी बेभान बरसात मी,
की
रिमझिम बरसणार्या पाऊसधारा..??
मी..
थंडीतलं कोवळं,उबदार ऊन,
की..
उन्हाळ्यातली तळपती मध्यान्ह??
मी..
तुझ्या डोळ्यांमधली आसवं ..
की..
तुझ्या ओठांवरलं हसू??
खरंतर..
मी या सगळ्यातच आहे,
मी..उथळ निर्झरही अन् शांत सागरही..
नेहमीच अतृप्त राहणारी तहान..
शांतपणाची चाहूल..
एकटेपणाची सोबत..
मी..
धुंद वातावरणाची नशा..
घोंगावणारं वादळ..
लवलवणारं गवताचं पातं..
कोवळ्या पानावरची नवजात लवं..
मी..
जीर्ण कागदावरल्या सुरकुत्या..
तुझ्या ओठांवरलं गीत..
तुझ्या हाकेला ओ देणारी खोल खोल दरी..
मी..
अर्घ्य दिली जाणारी ओंजळ..
अन् त्या ओंजळीतील पाणीही....