शब्दांविनाच गात राहते मी गाणं..
तुझ्या हृदयातलं..
मूकपणे..
जसं निळ्या-काळ्या आकाशातल्या,
एका वेडया चांदणीने ऊब शोधावी..
चंद्राच्या शीतलतेत..
तिने का धरावी अभिलाषा त्याची???
पण तरीही ती झुरत राहते,
अंतापर्यंत त्याच्यासाठीच..
जसं क्षणभंगुर आयुष्य लाभलेल्या पतंगाने..
आगीची धग पीत रहावी,
अन् शांतपणे आयुष्य ओवाळून टाकावं..
त्या ज्वालांतच समर्पित व्हावं..
जसं कोवळ्या सकाळी ..
सोनसळी किरणं त्या सहस्त्ररश्मीची,
अंगावर घ्यावीत..
मोकळ्या आकाशाने..
तसचं मी..
माझे सुर शोधत राहते,
पुनवेच्या लाटांच संगीत असतचं सोबतीला..
छेडल्या जाणार्या तारांत..
तुझेच ध्वनी-प्रतिध्वनी ऐकत राहते..
जन्माला आलेलं गाणं..
गाताच येत नाही कधी,
कारण,..
मूक असतं ना ते..