तिन्हीसांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला,
वाऱ्याच्या गाण्याची संथ मधुर धून
अन आसमंत सारा केशराने भरलेला
भरल्या आभाळी पावसाची
लागे हलकी हलकी चाहूल
अवखळश्या कृष्णमेघांची
मनास पडलेली भूल
झाडाझाडांतून नव्या चैतन्याचा सूर
अन् सूर्यास्ताचे वेध क्षितिजाकडे
गंध मातीचा ओला पावलांशी
सांडूनी सुवासिक अत्तराचे सडे
अर्थ अक्षरजन्माचा
न सांगता कळलेला
तिन्ही सांजेची वेळ होती
आदल्या रात्री थोडा पाऊस पडलेला
- गौरव पांडे