आज पोळी भाजताना,
वाफ बोटावर आली,
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
डोळ्यातल्या सरितेला,
पूर येई असा काही,
भावनांच्या सागराला,
कळे भरती आली .....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
पायी चालता वाटेने,
रुतता काटा पावलात,
माझ्या आईच्या भेगांची,
मज आठवण झाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
धुता कपड्यांचा ढीग,
जाई निघून हा जीव,
मज स्मरे माझी माउली,
अशाच कष्टातच न्हाली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली
आई म्हणालीच होती,
करता माझी पाठवणी,
आले घरी माझ्या सूख,
पोरी तुझ्याच पाऊली,
नुसत्या विचाराने आज,
होते पापणी ओली.....
आणि आई च्या नावाची
हाक ओठावर आली