श्रावण श्रावण कधी सरसर कधी कोवळे ऊन
येता पंचमी नकळत धावे माहेरासी मन
हिरवीगार झाडे वेली पाणी सरीचे पिवून
सुस्तावलेले जागे झाले,धुंदावले काळे रान
वर वाहे आधी मधी कधी होई तो बेभान
कधी झुळूक प्रेमाची देई आईची आठवण
झाली तयार धरित्री शालू हिरवा नेसून
तिच्या पोटी जागे झाले प्रियकराचे स्वप्न
पाच मासाचा तो गर्भ दिले चैत्राने हे दान
चिंब भिजली प्रेमात हवी थोडी आत्ता उब
म्हणे लपंडाव प्रेमाचा जरा पाहावा मांडून
जरा पाहावे नव्याने पुन्हा प्रेमात भांडून
कधी राही लपून कधी येई लगबगीन
मना वाटे हुरहूर तेव्हा बसे लगटून
कधी खान्तावे हे मन का न सखाआला अजून
मिठी घाली पाठूनिया देई दृढ आलिंगन
माझ्या मना वाटे लाज पोट वाढते पाहून
जरी पावूल अधीर मन निघे न येथून
माझा खट्याळ हो राणा मला पाहतो चोरून
येता नजरेस कान्हा मन जी हरखून
नको नको म्हणतांना देई दृढ आलिंगन
ठाम बजावले त्याला नको ठेवू गुंतवून
माझ्या आईच्या भेटीला माझे गुंतले मन
तुझी माय तुझ्या पाशी कशी तुला यावी जाण
माहेरासी आठवता माझे भिजती लोचन
उद्या पंचमीचा सणमला जावूदे येथून
मंगेश कोचरेकर