(एकदा पहाटे अचानक जाग आली. त्या पहाटेच झालेलं दर्शन अन अंगणात असलेला अनंत मला कसे दिसले त्याच वर्णन........)
अंगणी बहरता अनंत
मज आठवली सहज
स्वप्नात पहिली जी
फुललेली एक पहाट
ध्यानस्थ दिव्यांचे खांब
पसरवती मंद प्रकाश
थकलेला रस्ता निजला
पांघरून सोनेरी शाल
नव्हताच नभा मधे चंद्र
नव्हतेही तारे तेंव्हा
निजलेले ओढून सारे
ती गर्द काळोखी झूल.
निशब्द हवेत अचानक
सळसळ पानांची दिसली
पावसाच्या सरीने हलक्या
ती गंधित झाली माती
उचलून हळूच ती झूल
तो नभी प्रकटला चंद्र
अन होऊन तुकडा तुकडा
सांडला जणू पानांत
पहिले जाऊनी जवळ
ते भिजले झाड चंद्रात
प्रतिबिंबित चंद्र पानांत
तो अनंत फुलला खास
मज पहाता म्हणाले फुल
मी सत्यच, नाही स्वप्न
चंद्राच्या रंगुनी रंगी
मी प्यायलो पहाट गंध
ऐकता ओळख पटली
फुललेल्या त्या फुलाची
त्या फुलातल्या चंद्राची
अन धुंद पहाट गंधाची
स्पर्शता हळूच फुलाला
मज चंद्र भासला त्यात
जाणवला मजला मंद
तो मधुर पहाट गंध
अंगणी बहरता अनंत
मज आठवली सहज
मी पहाट पाहीली सत्त्य
न्हवते ते स्वप्न ना भास
केदार....