तुझ्या दारी उभा तुझाच मी कोणी,
रिते हात घेऊन थकल्या पायांनी.
जेव्हा कोणी नाही आधार जीवाला,
आठवतो तू आपोआप मनोमनी.
देऊ नको काही मी मागत हि नाही,
सोबत रहा फक्त एवढीच मागणी.
एकटाच झेलीन हसतमुखाने,
सांगणार नाही कधी दुखले म्हणुनी.
थकेन जेव्हा हे आवरताना सारं,
बसेन दोन क्षण तुझ्या पायाशी येउनी.
जरी विसरलो नाव जपायला,
दाखवशील ना रूप मिटताना पापणी ?
माझे अश्रू पुसायला नकोस येऊ,
हलकं होऊ दे मला थोडसं रडूनी.
नाही दारात उभा तू देवबीव म्हणुनी,
सारं मनातलं मांडतो सखा समजुनी.
माझी श्रद्धा तुझ्यावर जरी असली,
नाही होणार मोकळा भार तुझ्यावर टाकुनी.
मी शिश झुकवून दोन्ही हात जुळवुनी,
हसायला शिकीन विसरून रडगाणी.
........... अमोल