देव जगात आहे कि नाही यावर चर्चा करण्यापेक्षा,
तू तुझ्यात देव शोधला म्हणजे झालं.
कुणीतरी येऊन करावं काही चांगलं,
असा विचार करणं गैर नाही,
पण सुरुवात तू तुझ्यापासून कर यातच सारं आलं.
ज्याने चोच दिली तोच पुरवतो दाणा,
हा तर फक्त आळशाचा उखाणा.
कष्ट करून ज्याला यश शोधता येतं,
खराखुर्रा देव त्यालाच तर भेटतोना !
नाही तुला मातीत शोधता आलं सोनं,
तरी सोन्याची माती नाही केलीस म्हणजे झालं.
चराचरी देव दाटला आहे म्हणतात,
आणि देवळाभोवती रांगा लांबताना दिसतात.
देव भक्तीचा भुकेला आहे असं जरी सांगतात,
तरी लाखांच्या देणग्या त्याच्या चरणी जमतात.
इतरांना हे वेडेपण समजवण्यापेक्षा तू शहाणा झालास म्हणजे झालं.
तडफडणाऱ्या गाढवाला नाथांनी गंगा पाजली याचे गोडवे कश्याला,
कोणी रोकलं आहे का तुला त्याची प्रत्याक्षानुभूती घ्यायला.
पाणी पाजण्यासाठी गाढव तडफडायलाच कश्याला हवं,
असंच सुद्धा पाणी पाजता येतं कि त्याला,
तुझ्यात तोच भाव असला म्हणजे झालं.
नाही लिहिता आली एखादी ओवी,
पण वाचायपासून कुणी थांबवलेय ?
तू त्या प्रमाणे वाग त्यातच सारं भरून पावलं,
देव शोधणं कठीण आहे,
देव होणं सोप्पं आहे,
तुला नवीन काही निर्मिता नाही आलं तरी चालेल,
तू आहेस ते जपलं म्हणजे झालं.
देव येईल, मग काय काय देईल,
त्यापेक्षा तुझ्या दोन्ही भरल्या हातातला एक हात रिकामी कर,
तुझा हात मोकळा असल्याशिवाय देव तुला भरून देईल तरी कश्यात.
देवाने कुणाला काही दिलं नाही म्हणून काय झालं,
तुला जमेल तेवढं तू दिलंस म्हणजे झालं.
......अमोल