लहानपणापासुन त्याचं जगणं जरा जगावेगळंच होतं.
त्याला त्याचं असं एक आकाश हवं होतं की जिथं कोणाचेही कसलेही नियम नसतील.
कुठल्याही अटी नसतील.
कुठलही क्षितिज नसेल.
जिथं फक्त त्याची स्वप्न असतील....
स्वप्न ? .........काय असतात स्वप्न ?
जे आपल्याला घडावंसं वाटतं त्याला स्वप्न म्हणायचं का जे घडणार नाहीये त्याला ?
काहीही असो...
स्वप्न बघायला आणि ती पुर्ण होणार असतील तर करायला ताकद लागते.
त्याच्यात होती ही ताकद आणि त्याला आभिमान पण होता त्याचा.
एक दिवस ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याला उमजलं की,
खरी ताकद पुर्ण करायला लागत नाही, ती लागते ते दुस-याची स्वप्न आपली मानुन पुर्ण करायला आणि त्या स्वप्नाळू जीवाला नविन स्वप्न द्यायला.
त्याच्या स्वप्नासाठी तीनी तिचं घरटं सोडलं आणि ती त्याच्या घरट्यात आली.
स्वप्न न बघणं एक वेळ सोप्प असतं पण सोडुन देणं खुप अवघड....
आपलं घरटं मागं सोडताना ती खुप काही सोडुन आली होती.....
खुप आठवणी... खुप क्षण...
तिच्या घरट्यात तिनी पहिल्यांदा डोळे उघडल्यानंतर, आईचे भरलेले डोळे बघुन
आईच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
विजेच्या कडकडाटाला घाबरुन बाबांच्या कुशीत शिरल्याचा क्षण...
तिच्या इवल्याशा चोचीत आईनी भरवलेलातो मायेचा क्षण...
तिला उडता यावं म्हणुन तिच्या आईबाबांनी केलेल्या धडपडीचा क्षण....
तिनी पहिल्यांदा उडुन सगळं आकाश हिंडुन जग जिंकल्याचा क्षण...
त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं,
पण ’आपण इतक्या सहज आपलं जग सोडु शकतो का ?’ हा प्रश्न त्याच्यामनात आला आणि...
त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. त्याचे डोळे शांत होते... शांत कसले सुन्न होते.
तिच्या उपकराच्या ओझ्याखाली दबलेला तो सुन्न डोळ्यातुन इतकंच म्हणाला की...
"तु हे सगळं कसं करु शकली ?"
ती म्हणाली,
" तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं ! "
मध्ये काही क्षण गेले...
ती होती म्हणुन कुठेही सुखात जगत होते. पण एकमेकांसोबत कुठेही जगणारे ते पिलासाठी मात्र असं कुठेही जगायला तयार नव्हते.
त्यांना पिलासाठी एक छानसं आणि मोठ्ठं घर द्यायचं होतं.
त्यामुळे जगाची यत्किंचीतही फिकीर न करणा-या त्या दोघांसाठी प्रत्येक काडीला किंमत होती.
पिलाला द्यायचं घरटं आता थोडंसं राहीलय, ह्या वेडानी भारावलेले ते शेवटच्या चार काड्या आणायला बाहेर पडले ते, पावसाळी हवा पडलीये हे माहित असुनही...
ती पिलाला छातीशी धरुन...
आणि तो, दोघांचं असणं हृदयाशी धरुन घरट्यासाठी घरट्याबाहेर पडला ते स्वप्नांचे पंख लाऊनच.
ह्या स्वप्नांचं थोडं विचित्रच असतं. जगावेगळं जग असतं ते...
त्याचे सुर वेगळे असतात.
गंध वेगळे असतात. त्यांचे ॠतु वेगळे असतात.
निसर्गाचे नियम त्याला ठाऊकच नसतात कदाचीत.
पण निसर्गाला तरी स्वप्नांचा हळवेपणा कुठे ठाऊक असतो ?
नाहीतर पिलासाठी जीव ओतुन गुंफलेल्या त्या घरट्यावर अशी वीज का कडाडली असती ?
ती वीज कडाडलीही इतक्या अमानुषपणे की हजारो पावसाळे पाहिलेला तो वटवृक्षही त्याच्याच आधारानी उभ्या असलेल्या वेलीला घाबरुन बिलगला.
पाउस पडायच्या आधिच त्याच्या भांबावलेल्या डोळ्यात त्यांच्या घराचं स्वप्न बुडत होतं.
त्याला माहितीच नव्हतं की स्वप्न ही एखाद्या नाजुक फुलांवर पडलेल्या दवबिंदुंसारखी असतात.
ती फक्त पहायची असतात.
त्यांना स्पर्श करायला गेलं की ती मातीत मिसळुन जातात.... .......फुलांसकट !
मातीचा गंध जीवाला वेडाउन टाकतो, ते उगाच नाही...
कारण तो कोणाच्या तरी स्वप्नांचा गंध असतो.
त्या ओल्या वातावरणातही त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले. तो पुन्हा एकदा सुन्न झाला होता.
पिलाला छातीशी धरुन ती पुन्हा घरट्यापाशी पोहचली होती. तिनी एक क्षण.. एकच क्षण त्या घरट्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी घरटं सोडुन ती त्याच्याकडे झेपावली.
त्याचे थरथरते हात तिनी ओंजळीत धरुन त्याला शांत केलं आणि त्याला जवळ घेऊन ती घरट्यात परतली सुद्धा...
निसर्गाला स्वप्नांचा हळवेपणा ठाऊक नसतो तसं त्याचं सामर्थ्य पण माहित नसतं. फुलावरचं ते दवबिंदु साधंहललं सुद्धा नव्हतं.
तिचं पिल्लु सुरक्षित होतं. तो सुरक्षित होता. त्याचं घरटं सुरक्षित होतं.
पाचसाचं थैमान तिनं तिच्या पंखांवर थोपवुन धरलं होतं. ते तिघंही एकाच विश्वासानं तिच्याकडे पहात होते.
"तु हे सगळं कसं करु शकतेस ?" ह्या त्याच्या अपेक्षित प्रश्नाला तिनं नेहेमिचंच उत्तर दिलं.
"तुला नाही कळणार.... त्यासाठी बाई असावं लागतं !"
स्वप्न डोळ्यात असतात तोपर्यंतच ठीक असतं. ती एकदा श्वासात मिसळली की त्यांच्याशिवाय जगणंच कठीण होतं. आपण आपल्या पिलाला त्याचं स्वतःचं असं एक आकाश द्यायचं असं त्या दोघांनी ठरवलं आणि त्या दवबिंदुच्या ओझ्यानी फुलंच वाकलं.
पिलासाठीच पिलाला सोडुन त्यांना रोज लांब उडावं लागणार होतं.... ते ही पिलाला रोज दुस-याच्याच घरात सोडुन.... स्वप्न तुम्हाला मरु देत नाहीत, पण ती तुम्हाला जगुही देत नाहीत.
तिला तिच्या स्वप्नातलं आकाश खुणावत राहीलं आणि नऊ महिने आणि त्यानंतरचा प्रत्येक क्षण पिलाला जवळ ठेवणारी ती निग्रही झाली.
त्यांनी पिलाला त्या घरट्यात सोडलं आणि जड पंखांनी ते निघाले.
तो खुप अस्वस्थ झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली. विचार करण्याची त्याची हिंमतच होईना. त्याचे हात थरथरायला लागले होते. तो अजुन एकदा सुन्न झाला होता.
अशा वेळेला त्याला नेहेमीचाच एक आधार होता.... तिचा !
मोठ्या विश्वासानी त्यानी तिच्याकडे पाहिलं...पण...
पण ती स्वतःच कोसळली होती....... ........खचली होती. त्याच्यासाठी स्वतःचं घरटं सोडताना असलेली तिच्या पायातली ताकद संपली होती.
त्या निसर्गाला थोपवुन धरणारे तिचे पंख गळुन पडले होते.
ती रडत होती. खुप रडत होती.
तिची ही अवस्था बघुन तो उठला आणि पिलाला आणण्यासाठी निघाला.
ती म्हणाली, "थांब राजा, थोडंसं थांब. ते समोरचं आकाश खेचुन आणु आणि मग पिलाकडे येऊ. ते वाट बघत असेल आपली आणि त्याच्या आकाशाची. माझ्यावर विश्वास ठेव. आपल्याला जमेल ते."
त्याला कळेना... काहीच कळेना...
ना तिचं रडणं... ना खचणं... ना उठणं आणि ना उडणं.... तो म्हणाला,
" मला नाही कळणार... खरंच नाही कळणार... ह्यासाठी कदाचीत बाई असावं लागेल. "
ती म्हणाली,
खरंय तुझं... तुला नाही कळणार... कारण हे कळायला बाई तर असवं लागेलच पण त्याही पेक्षा आई असावं लागेल."
कुठलाच पुरुष कधी बाई होऊ शकत नाही, .... आई तर नाहीच नाही !
धुद रवी.