Author Topic: एक कथा- शाळेची!  (Read 5614 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 579
एक कथा- शाळेची!
« on: February 09, 2013, 01:24:00 PM »

आपल्यापैकी कोणीच अस नाही, ज्याला शाळेचे दिवस आठवत नाहीत. (अर्थात जे शाळेत गेलेच नाहीत ते या गोष्टीला अपवाद आहेत ह.....) असो, तर शाळेत केलेली दंगामस्ती, बाईंच्या हाताचा (किंव्हा हातातल्या छडीचा) मार, रिझल्टच्या दिवशीची उत्सुकता (जरी पेपर खराब गेलेला असला तरी....), ते पालक मिटींगच्या वेळी हृदयाचे ठोके वाढण वगैरे सगळ कधीच विसरू शकत नाही ना.
असाच एका शाळेचा परीक्षेच्या आदल्या दिवशी...
बाईंनी वर्गात एन्ट्री मारली, तसे सारे विद्यार्थी उभे राहिले, आणि मरगळल्या प्रमाणे भसाड्या आवाजात एकसुरात ”गुड मॉर्निंग” म्हणाले. (खरतर ज्याच्या त्याच्या घरच्यांनी घरातून हाकलून दिल्यामुळे, दुसरीकडे कशाला, म्हणून शाळेत आल्याप्रमाणे सारे आलेले असायचे.) अंघोळ न करताच आल्याप्रमाणे ओशाळून बाकड्यावर बसलेले होते. काहींच्या डोळ्यांवर अजुनि झापड येत होती. काही जण तर बाकड्यावर डोकं  ठेवून अक्षरशः झोप काढत होती आणि ते हि घोरत-घोरत ! बाई आल्या, तस एकमेकांना उठवत डोळे चोळत चोळत पुस्तकं वर काढली. ”काय रे, काल कुठपर्यंत झालं ?” असा प्रश्न रोजच्या सवयी प्रमाणे बाईंनी विचारला. पुजा किरणच्या कानाशी पुटपुटली, ”बघ, बाईंना पण नाही आठवत.” किरणची डोळ्यावरची झोप उतरायला काही तयार नव्हती. डोळे मोठ्ठे करून ती पुस्तक, गीता, बाई, आणि संपुर्ण वर्ग अशी चौफेर नजर टाकण्याचा प्रयत्न करत होती. कालच्या रात्रीच जागरण...दुसर काय!
बाईंनी आजच्या धड्याच नाव लिहायला म्हणून फळ्याकडे पाठ फिरवली आणि त्यांनी पाहिलं...
फळ्यावर एका डोकं खाजवणाऱ्या माकडाच चित्र आणि त्या खाली नाव, ‘मिस.आफळे’. आणि तेव्हडच नाही काही...... खालची ओळ, ’ह्या डोक्यात काही तरी आहे.....म्हणून तर खाजवावं लागत!!!!’
स्वतःवर अशी टिक्का-टिपणी कोण बर सहन करेल? आणि आफळे बाई तर ज्वालामुखी आणि त्यात हि तेलाची धार.....मग काय विचारायचं, आगीचे लोळच्या लोळ अगदी तुफान वेगाने आफळे बाईच्या तोंडातून बाहेर येणारच.
पण आज बाई चिडल्याच नाहीत. हे चित्र कोणी काढल हे सुद्धा न विचारता शांतपणे डस्टर घेऊन  फळा स्वच्छ पुसला. सईला खरतर ओरडा खाण्याची रोजची सवय होती पण आज काही वेगळाच झालं नै! ती बुचकळ्यात पडली. बाईंनी धड्याचे नाव लिहिले. म्हणाल्या, ”पोरांनो, उद्या परीक्षा आहे. आहे ना लक्षात?”
मग सई घाबरली. तिला कळाल, बाई आत्ता का ओरडल्या नाहीत ते. ‘आता, या चित्राचा बदला परीक्षेतल्या पेपरातील मार्कांवर होणार बहुतेक......अरे बापरे....याला म्हणतात स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण.’ सईन डोक्याला हात लावला. आता तिला पश्चाताप झाला होता चांगलाच.
बाई सईच्या रोखाने पाहत म्हणाल्या, ”इथ जेव्हड छान चित्र काढलंय, तेव्हड्या चांगल्या आकृत्या पण काढा पेपरात.” सईन लाजत-लाजत होकारार्थी मान डोलावली.                 
आता वर्गाला पुर्णपणे जाग आली होती. झोपेच वातावरण आता टेन्शनच झाल होत. परीक्षा म्हणाल्यावर, सर्वात आधी घरच्यांचे चेहरे, शेजारपाजारच्यांची आपल्या मार्कशीटबद्दल असणारी उत्सुकता, बाईंच्या छड्या अस सार-सार डोळ्यासमोर येऊ लागल आणि सगळा वर्ग एकदम चिडीचुप्प झाला. (पण झोपेमुळे नाही बर का)! सगळ्यांनी पुस्तकं चाळायला सुरवात केली.
बाईंनी शेवटचा राहिलेला धडा शिकवायला सुरवात केली, “तर आजचा धडा आहे, ’मानवी अवयव’. पहिला अवयव – ‘डोळे’  चला, सांगा बर डोळ्यांबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला ?” किरणने हात वर केला.
किरण :  डोळ्यांवर गाणी लिहिता येतात.
बाई अचाट होऊन बघत बसल्या.
बाई : गाण? उदाहरणासकट स्पष्टीकरण दे.
गौतम : पण बाई, स्पष्टीकरण तर मराठीच्या पेपरात विचारतात न? विज्ञानात तर शास्त्रीय कारणे         विचारतात न?
बाईंनी गौतमकडे पाहून डोळे वटारले, तसं तो खाली बसला.
पुन्हा किरणकडे नजर टाकत बाईंनी भुवया उंचावल्या.
किरण : म्हणजे, उदाहरण, ‘ते’वाल गाण नैका.....ते.
बाई : (जरा चिडून) ‘ते’ म्हणजे काय, ते निट सांग ग.
किरण : (मग वर्गात नजर फिरवत, घसा जरा खाकरून घेऊन, तालासुरात गाण सुरु झालं,) कजरा रे, कजरा रे, तेरे काले काले नैना.....
वर्गातली सारी तिच्या बरोबर जोर जोरात गाऊ काय लागले, काही नाचू लागले, आणि काहींनी बाकड्याला ढोलकी समजून पिटायला सुरवात केली. तश्या बाई चिडल्या. सगळ्यांना शांत करत,
बाई : ए, गपा रे. (किरणकडे बघून हात खालच्या दिशेने हालवत) किरण, बसा खाली.
मधेच राघव उठला,” बाई, हे तिन चुकीच गाण म्हणल आहे....मी सांगतो खर गाण....(कॉलर ताठ करून)
आखोंमें तेरी, अजब सी, अजब सी अदायें हैं......
मध्येच विमल सारंगला कागदी विमान फेकून मारू लागली, ते चुकून दीपक ला लागल तसा तो जोरात ओरडला, ”कोण आहे रे?” विमलने बेंचखाली डोके लपवले.
बाई : (खूप राग आलेला असूनही तो आवरत) अरे ए, हि शाळा आहे. गाण्यांची मैफिल नाही. 
(कोणाला काही विचारण्यात काही अर्थ नाही हे ओळखून बाईंनी धडा पुढे वाचायला सुरवात केली.)
मानवी डोळ्यांचा उपयोग सभोवतालच्या वस्तू बघण्याकरता होतो. मानवाला दोन डोळे असतात. दृष्टीपटल हा महत्वाचा भाग आहे. पापण्यांमुळे डोळ्यांचे संरक्षण होते.
लीना : कुठल्या रंगाच्या पापण्या संरक्षण करतात बाई?
(बाई परत बुचकळ्यात) बाई : काय? कुठल्या रंगाच्या? म्हणजे? (थोड चिडवत) तुझ्याकडं किती व्हरायटी आहे ग पापण्यांची?
लीना : खूप व्हरायटी आहे. (जरा तोऱ्यात,) माझ्याकडे १२ प्रकारच्या आयशेड्स आहेत.   
बाई :(आता चिडूनहि उपयोग नाही हे कळल्यावर शांतपणे) लीना, कुठल्याही रंगाची लावलीस न तरी चालेल ह मला! आणि नाही लावलीस तरी चालेल. (जरा वैतागून) आणि तू आता स्थानापन्न झालीस तर मी कृतकृत्य होईन.
लीना तिच्याच तोऱ्यात का होईना, पण खाली बसली.
बाई : आता दुसरा अवयव- ‘नाक’. तर नाक हे घ्राणेंद्रीय आहे. श्वासोत्स्वास करायला या अवयवाचा उपयोग होतो. प्रत्येकाला एक नाक दोन डोळ्यांच्यामध्ये असते........(मध्येच राघव उठला.)
राघव : बाई, नाकाचा अजून एक फायदा आहे, तो नाही लिहिलेला बुकात.
बाई : (सारख मध्ये बोलल्याने थोड त्रस्त होऊन) कुठला रे ?
राघव : ते, राग साठवण्याच ठिकाण आहे.
बाई : काय? ते आणि कस? उदाहरणासह स्पष्टीकरण.... (मधेच थांबून गौतम कडे पाहत आणि चूक सुधारत...) म्हणजे सविस्तर सांग.
राघव : मी माझ्या पप्पांना विचारलं कि ते मम्मीला का घाबरतात, तेव्हा पप्पा म्हणाले कि तुझ्या आईचा राग सतत तिच्या नाकाच्या शेंड्यावर असतो. 
(वर्गातले सगळे जोजोरात हसू लागले, तसा राघवाचा उत्साह ओसरला आणि तो गपगार होऊन खाली बसला.)
आता शिकवण कठीण आहे, हे बाई समजून चुकल्या. आता चष्मा लावता येतो हा कान असण्याचा फायदा आहे किव्हा कानातले डूल घालायला कान उपयोगी पडतो अस उत्तर कोणी द्यायला नको म्हणून बाईंनी साधा सोप्पा पर्याय निवडला.....
बाई : चला, आता आत्मचिंतन करा.
(साधारणतः बरेचसे शिक्षक हाच पर्याय निवडतात. अर्थात, विद्यार्थी दुसरा पर्याय शिल्लकच ठेवत नाहीत म्हणा!)   
तरीही अजुन एक प्रश्न होताच....
मानसी : पण ‘आतमचीनतन’ मणजे काय?
‘बोबडी बोललीच मध्ये शेवटी’...विचार करून बाईंनी उत्तर दिल,” वाचा तुमचं तुम्ही....असा अर्थ आहे त्याचा. कळल? (सिद्धीचा हात वर होताना पाहून) आणि हो, आता एकदम शांतता हवी वर्गात मला.”
सिद्धीन हात खाली घेतला; मग बाईंनी खुर्चीवर पाठ टेकली......
आणि परीक्षेचा दिवस उजाडला......
एरवी कधी वेळेत न येणारी मुल, वेळेआधी वर्गात हजर पहायची असतील, तर हाच दिवस योग्य.
रश्मी : काय ग लीना, झाला न अभ्यास ?
लीना : हो ग. म्हणजे थोडा राहिलाय. पण पास होऊ शकेन.
मानसी : माज्य पण झालंय तोद-तोद वाचून.
सगळ्यांकडे पुस्तक असूनही शेजारच्याच्या पुस्तकात डोकी घालून एकाच ठिकाणी झालेला घोळका.... वर्गात नुकत्याच आलेल्या बाईंच्या हातात पेपरांचे जडच्या जड गठ्ठे पाहून सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. हृदयाचे ठोके क्षणोक्षणी वाढत होते.....कसा असेल पेपर? सोप्पे असतील कि अवघड असतील प्रश्न?
बाईंनी पेपर वाटप केल आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर भर दिवसा चांदणे, तारे, चंद्र , वीज... असे काय काय चमकून गेले. काहींना ब्रम्हांड आठवल तर काहींना आख्खी पूर्वपिढी आठवली. आज किती दिवसांनी अस दृश्य पाहायला मिळाल कि विद्यार्थींना शांत बसायला सांगायची गरजच पडली नाही. (आता तुम्ही म्हणाल, कि एकमेकांना उत्तर विचारायला देखील बोलले नाहीत? पण कोणालाच उत्तरं येत नव्हती मग काय विचारणार?) सगळे फक्त एकमेकांचे चेहरेच बघत बसले होते काहीवेळ. अर्थात त्या सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखेच झाले होते. याला अपवाद म्हणजे आफळे बाई......त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.
  सगळ्यांनी जमेल तसा सोडवायला सुरवात केली. तरी दीक्षा अधून मधून पुढच्याच, थोड मागच्याच अस पाहण्याचा प्रयत्न करत होती. पण पुढच्यान व्हिटामिनस चे प्रकार लिहिले होते-व्हिटामिन ‘ए’, व्हिटामिन ‘इ’, व्हिटामिन ’आय’, व्हिटामिन  ‘ओ’, व्हिटामिन ‘यु’...... हे चुकेचे आहेत एवड माहित असल्याने पुढच्याची उत्तर छापून उपयोग नाही, मग मागच्याची कॉपी करायला सुरवात केली.
कोणी एखादा विद्यार्थी आकृती काढायला लागला कि बाकीचे घाबरायचे. कोणीतरी सतत लिहितोय म्हणाल्यावर इतरांची चांगलीच भंबेरी उडायची. लवकरात लवकर पेपर बाईंच्या हाती सुपूर्द करून बाहेर पडून सगळे निमूट घरी परतत होते.
निकालाचा दिवस......
हातात निकाल पडताच चेहरेही पडत होते, हे काही वेगळ सांगायला नको.
सईन निकाल ‘तो ‘त्या’ चित्राचा बदला होता,’ अस म्हणत गोड मानून घेतला. बाकीच्यांनी पालकांना अनेक वेगवेगळ्या थापा मारल्या; कमी मार्कांचं कारण म्हणून. साऱ्या पालकांना बाईंनी निकालाचा निकाल लावण्याकरिता एकत्र बोलावले तेव्हा इकडे बच्चेकंपनीच्या गप्पा सुरु झाल्या.....कोणाला किती मार्क पडले, कोणी काय थापा मारल्या, कोणी काय कारण दिली ते विचारू-सांगू लागली.
रीना : काय ग , किती विषय गेले?
कीर्ती: माझे??? मराठी आणि गणित. अन तुझे?
रश्मी: (मध्येच येत) अग किती गेले काय किती सुटले ते विचार. 
कीर्ती: ए गप ग आळूची भाजी! सारख तोंड आपल कडवटचं का! (रीनाकडे बघत) अग जास्त काही नाही, फक्त ६ विषय जरा गेलेत.
राघव: म्हणजे एकही नाही सुटला हिचा.
कीर्ती: (चिडवत) तुमच काय साहेब? सुटलेत का काय सगळे?
राघव: (तिच्याच भाषेत) नाही बॉस, आम्ही तुमच्याच सारखे...तुम्हाला नको का कोणी सोबती ओरडा खायला!
रश्मी: अरे, एकमेकांची खेचत नका बसू. सगळ्यांचेच गेलेत. कडेला जान्हवी उभिये बघ. चल तिला विचारूया...
सगळी मंडळी मोर्च्या घेऊन, कडेला हातात निकाल घेऊन उभ्या असलेल्या जान्हावीकडे आली.
राघव: काय मग? किती लाल रेघा आहेत मार्कशीट मध्ये?
रश्मी:  ए जरा निट विचार न.....काय ग, काय आहे निकाल?
जान्हवी : (मंद स्मित करत) पास.....६२ पर्सेंट.
जमा झालेली सगळी मंडळी बुचकळ्यात पडली.
रश्मी : जान्हवी, का उगाच मजा करतेस आम्हा लोकांची?
जान्हवीन मार्कशिट् हातात ठेवली तसा रश्मीचा चिडवण्याचा मूड ओसरला. डोळे वितभर मोठ्ठे करत रश्मी तिच्या मार्कशीटकडे पाहतच राहिली क्षणभर.
सगळेच मार्कशीट ओढून ओढून बघू लागले....एकदा मार्कशीट तर एकदा जान्हवी.....दोन्हीकडे पाहत सगळे दातखीळ बसल्यासारखे शांत सुम्भासारखे उभे होते.
राघव : काय, जान्हवीची तर लॉटरी लागलीये बाबा.
कीर्ती : चमत्कारच झाला!
जान्हवी : नाही ग. अस काही नाहीये.
इतका वेळ बाजूला उभा असणारा रवी मधेच बोलला : मग काय ? इतके छान मार्क ? कसे?
प्रश्न रवीने विचारला असला तरी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर असलेले मोठ्ठे प्रश्नचिन्ह जान्हवीला स्पष्ट पणे दिसत होत. जान्हवी काही बोलणार इतक्यात आफळे बाई मिटिंग आटपून तिथे आल्या.
‘आता त्यांनी आपल्या पालकांना नक्कीच आपल्या विरुद्ध भडकवलं असणार. मग काय, घरी जाऊन आई-बाबा आपली चांगली खबर घेणार.....किती मेहनतीन त्यांना पटवल होत या रिझल्ट करिता! पण आता त्यावर पाणी टाकल या आफळेनि. बसा आता बोंबलत.’ सगळ्यांच्या मनातले त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सगळे एकमेकांच्या मागे लपायला लागले. अपयशानंतर तोंड कस दाखवायचं या विचाराने नाही, तर आता हि बाई नापास झाल्याबद्दल एक लांब लचक भाषण देणार ना, म्हणून!
पण आज आफळे बाई सरळ जान्हवी कडे आल्या,
बाई : जान्हवी, अभिनंदन बेटा.
जान्हवीन पटकन बाईंना वाकून नमस्कार केला. बाकीचे सगळे तोंडात बोट घालून अचंब्याने बघत राहिले गुरुशिष्याकडे.
राघव : ब...ब..बाई, हे....हे...म्हणजे, ते...अ....
बाईंनी फक्त एकदा नजर टाकली सगळ्यांवर.
बाईंची नजर शांत होती. न त्या चिडल्या होत्या, न टोचून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. पण तरी सार वातावरण गंभीर झालं होत; बहुतेक पहिल्यांदाच!
राघवची बोलती बंद झाली होती. एक कुठला तरी वेगळ्याच प्रकारचा धाक होता सगळ्यांना. पण एरवी प्रमाणे बाईंचा नव्हता.....बहुतेक मनाचा....स्वतःची पहिल्यांदाच सगळ्यांना इतकी भीती वाटत होती. कोणी काहीच बोलत नव्हत. पण थोड्याच वेळात हि शांतता भंग झाली.
बाई :  मला वाटत कि सगळेच आज थोडे टेन्स आहेत; हो ना? बसा.
बाईंच्या त्या बोलण्याचा काहीच अंदाज येत नव्हता. सगळे खाली शाळेच्या ग्राउंड शेजारच्या झाडाखाली बसले. जान्हवी सुद्धा. बाई चिडत नाहीत, ओरडत नाहीत; आपण स्वप्न बघतोय कि काय? पण सगळ्यांनाच लक्ष बाईंच्या बोलण्याकडे होत.
बाई : तुम्हाला माहितीये, मी लहानपणी वाघेवाडीत होते.....गावातल्या वातावरणात वाढलो आम्ही. शेती, गाई, गोठे, नद्या, झरे, डोंगर, वनराई.....आमच गाव...माझ गाव ! दर्या-खोर्यात खेळत, गावच्या मातीत उगवणारी पिके  पाहत लहानाची मोठी  झाले. गावात एकाच शाळा होती; तीही शहरातल्या मद्दमने उघडलेली. टाईमपास म्हणून जाऊन बसायचे शाळेत. मग मजा वाटायला लागली. मी रोज जाऊ लागले. इतरही काही जण यायची. तेव्हा आमच्या बाई आम्हाला जीव तोडून शिकवायच्या. आम्ही त्यांची खिल्ली उडवायचो. त्यांनी विचारल कि, भारत स्वतंत्र कधी झाला, कि आम्ही उत्तर द्यायचो, ‘बाई आम्ही नव्हतो तेव्हा!’ खूप चिडवायचे सगळेच विद्यार्थी त्यांना. त्या शहरातून आल्या होत्या खास गावातल्या शाळेत शिकवायला. गावातल्या लोकांना अडाणी म्हणू नये म्हणून त्यांनी शहरातल्या हाय-फाय स्कूलचा गलेलठ्ठ पगार धुडकावून लावला होता. आमच्या गाववाल्यांचा ठाम विरोध होता त्या शाळेला. ‘शिक्षण घेतल्यावर मुलांचे कामावरून लक्ष उडते, आणि वही-पुस्तकात डोकं घालून बसतात दिवस भर’ असे मत होते प्रत्येक गावकऱ्याचे. ‘हि मद्दम आपल्या पोरांना बिघडवतीये.’ अशी कुजबुज गावातल्या प्रत्येक कट्ट्यावर ऐकू येऊ लागली. ‘हडळ, चेटकीण’ अशा प्रकारे संबोधू लागले तिला. पण तिने शाळा सुरूच ठेवली. आम्ही हि फावल्या वेळात जाऊन बसायचो वर्गात. मग गावातल्या लोकांचे टप्पे-टोणपे खात, टपोरी लोकांना झुंज देत त्या आम्हाला शिकवत राहिल्या. बाहेर गावी परीक्षा असल्याचे कळल्यावर आम्हा चारही जणांना त्यांनी ती देण्याकरता शहरात पाठवले; ते हि स्वत:चा खिसा रिकामा करून. परीक्षेची एन्ट्री फी देखील त्या बाईंनीच भरली. अर्थात, आमच्या घरच्यांचा जिथे शिक्षणालाच विरोध होता, तिथे ते परीक्षेसाठी काय पैसे देणार म्हणा ! बाई म्हणाल्या,” तुम्ही आज शिक्षणाकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्हाला आजची मजा दिसते पण मला तुमच्या भविष्यातला काळोख दिसतो. आज तुमचे पालक तुम्हाला जपतात. उद्या तुम्ही नको का त्यांना जपायला? तुमच्या पुढच्या आयुष्यात तुमचे घरचे, तुमची मित्र मंडळी कोणीच नाही पुरी पडणार बाळांनो! तेव्हा तुमच्या सोबतीला फक्त हे ज्ञान असेल..........  तुम्ही शिका, सज्ञान व्हा, बाकी कशाची चिंता करू नका. काही मदत हवी असेल तर सांगा मला. ” आणि बोलल्याप्रमाणे त्या खरोखर मदत करायच्या. चिनूच्या मामीच्या बाळाला सणसणून ताप आला तेव्हा ह्याच बाई धावत गेल्या होत्या वैद्याला घेऊन त्यांच्या घरी. चिनूच्या घरच्यांनी ताप घालवायला कोणत्यातरी मांत्रिकाला बोलावले होते. आमच्या बाईंना उशीर झाला असता तर त्या बाळाचे काय हाल झाले असते ते देवालाच ठाऊक! गावात सगळ्यांना मदत करूनही गावकऱ्यांचा त्यांच्या वर कसलासा रोष होता. आम्ही बाईंच्या सांगण्याप्रमाणे परीक्षेला शहरात गेलो. परीक्षा देऊन गावी परतलो, तेव्हा कळाल, कि आमच्या शाळा जळून राख झाली होती......आणि त्या आगीच्या धगधगत्या ज्वाळेत आमच्या त्या बाई देखील.....
(आफळे बाई पाण्याने काठोकाठ भरलेले डोळे पुसत म्हणाल्या,)
आता ती आग लागली, का लावली गेली ते नाही माहित; पण त्या शिक्षणाच्या यज्ञकुंडात आमच्या बाईंची आहुती गेली.
(आफळे बाईंना भावना अनावर झाल्याने त्या क्षणभर बोलायच्या थांबल्या.....) पण आज मी जी काय आहे, ते त्या बाई आणि त्यांनी द्यायला लावलेल्या त्या परीक्षेमुळेच! गावातली एक अज्ञान मुलगी, जिची किंमत आजच्या जगात कवडीची देखील नसती, तिला त्या एका व्यक्तीन आज तुम्हा सगळ्यांपुढे उभ राहण्या योग्य बनवलं. त्या बाई गेल्या नंतर मला त्यांची मस्करी केल्याचा खूप पश्चास्ताप झाला. पण आता रडून, डोकं आपटून काहीच फायदा नव्हता. वेळ निघून गेली होती......
आपल्या बाई, किती चिडकु वाटायच्या आधी! आज कळाल कि आतून खूप हळव्या होत्या. आपल्या बाईंच्या डोळ्यात पाणी पाहून आज कोणालाच असुरी आनंद झाला नाही....सगळेच भावूक झाले होते. अश्रू आवरत बाईंनी सगळ्यांवर नजर फिरवली.
बाई :  पोरांनो, अस का होत, कि एखादी गोष्ट हातातून निसटून गेली कि मगच त्याच महत्व कळत? माझ्या बाबतीतच अस का व्हावं? मी कधी धड मनापासून धन्यवादहि नाही देऊ शकले त्यांना. मला त्यांना सांगायचं होत कि, परीक्षेत त्यांनी शिकवलेले प्रश्नच आले होते, मला पेपर सोप्पा गेला, एक नव्याच प्रकारचा आनंद मिळाला परीक्षा दिल्याचा......आणि अजुन खूप खूप काही......! मला त्यांच्या पाया पडायचे होते; आशीर्वाद घ्यायचा होता.....सारे सारे राहून गेले. त्यांचे काम पुढे चालू ठेवायचे म्हणून मी शिक्षिका बनले.....मी त्यांच्या इतक नाही काही करू शकले बहुतेक; पण प्रयत्न नक्कीच केला होता, अगदी मनापासून! आणि करत राहीन शेवटच्या श्वासापर्यंत....!

परत शांतता पसरली....बाईंनी सगळ्यांकडे नजर फिरवली. हलकेच उठून हेडऑफीस मध्ये निघून गेल्या. विद्यार्थी मात्र तसेच बसून होते. एक वेगळ्याच प्रकारची शांतता होती ती.....पण प्रत्येकाच्या मनात कसलेसे वादळ होते. सुन्न पणे बसलेली मुले पालक दूरवरून न्याहाळत होते.निकालाच्या दुसऱ्या दिवशी........
बाई वर्गात आल्या...रोजच्या प्रमाणे त्याच मजल्यावरच्या त्याच वर्गात! बाई दिसताच सगळे शांत पणे उभे राहिले. आज कोणीच झोपाळलेल नव्हत. एकसुरात फ्रेश आवाजात ‘गुड मॉर्निंग’ ऐकल्यावर आमच्या आफळे बाई घेरी यायच्या बाकी होत्या. फळ्याकडे पाठ फिरवली तर, अरे! आज फळा एकदम साफ. ना आज ‘आफळे बाई’ अस लिहिलेलं व्यंगचित्र, न सुमन ने काढलेली नागाची चित्र! आज सगळ जगाच्या जागी होत. आज वर्गात कोणी कागदाचे बोळे सुद्धा फेकले नव्हते. आनंदाच्या धक्क्यातून सावरून बाईंनी फळ्यावर नाव लिहील,’ धन-ऋण संख्या ‘
सगळ्यांकडे बघत विचारलं,”ह....सांगा धन आणि ऋण संख्येचा अर्थ माहित आहे का कोणाला?”
आणि बाईंना चूक कळली, ’आता धन म्हणजे संपत्ती, पैसा-अडका. म्हणून धन संख्या म्हणजे ज्या संख्येकडे जास्त धन आहे ती आणि ऋणसंख्या म्हणजे जी संख्या कर्ज घेते ती.....’ अशी काहीतरी अरबट-चरबट उत्तर येणार म्हणून बाईंनी डोक्याला हात लावला.....
पण आज चमत्कारिक उत्तर मिळाल....लीना ने पद्धतशीर उभ राहून योग्य उत्तर दिले.....
लीना : धन संख्या म्हणजे शुन्याहून मोठी आणि ऋण म्हणजे शुन्याहून लहान.
बाई आज खूप खुश होत्या.....त्यांचा वर्ग आज सुधारला होता.....
आता त्यांची कहाणी खरी होती कि खोटी ते महत्वाच नाही, पण जे त्यांनी कोडं भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, ते मुलांना स्पष्टपणे समजल होत, हे मात्र खर!
म्हणतात ना, ‘पुढच्यास ठेस..........’ !!!   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 144
 • Gender: Male
Re: एक कथा- शाळेची!
« Reply #1 on: October 03, 2013, 02:33:58 AM »
एखादी गोष्ट हातातून निसटून गेली कि मगच त्याच महत्व कळत.. :(

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 579
Re: एक कथा- शाळेची!
« Reply #2 on: October 10, 2013, 09:34:17 PM »
Maddy, thanks for reply!!! :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: एक कथा- शाळेची!
« Reply #3 on: October 17, 2013, 04:13:43 PM »

Madhura,
chan lekh aahe.....aavadala..... :)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 579
Re: एक कथा- शाळेची!
« Reply #4 on: October 17, 2013, 07:41:13 PM »
धन्यवाद!!! :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):