Author Topic: जागो रे!  (Read 1000 times)

Offline tanu

 • Jr. Member
 • **
 • Posts: 99
जागो रे!
« on: November 11, 2009, 02:39:49 PM »
डोळ्यात अंजन घालणाऱ्या 'टाटा टी'च्या या जाहिराती गदागदा हलवून जागं करतात. पण आपणच झोपलेल्याचं सोंग घेतलंय बहुतेक.


'हर सुबह सिर्फ उठो मत, जागो रे!' निवडणुका आल्या की 'टाटा टी'च्या अॅड्स टीव्हीवर दिसू लागतात. डोळे उघडायला लावणारी ही कॅचलाइन. आधी मतं मागणाऱ्या पुढाऱ्याचा इंटरव्यू घेणारा तरुण यात दिसला. नंतर मतदानाच्या दिवशी सिनेमा बघणाऱ्यांना जागं करणारी अॅड आली.

आता विधानसभा निवडणुकीच्या आधी नवी जाहिरात आलीय. 'खिलाना बंद, पिलाना शुरू'. यात वेगवेगळ्या प्रकारे पैसे खाणारे दिसतात. पुढे 'लेकिन आपको पता हैं, ये लोग इतना खाते क्यों हैं?', हा प्रश्न विचारला जातो. उत्तर डोळ्यांत अंजन घालणारं, 'क्योंकि हम खिलाते है'. हे ऐकताना अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, हे गांधीजींचं वाक्य आठवतं. गांधीजींनी प्रत्येक गोष्टीला मूळापर्यंत खणून समजून घेतलं होतं. त्यामुळे ते एकदम वेगळ्या चौकटीतून जगाकडे बघू शकले. जागे होऊन.

पण आपण झोपलोय. खरं तर झोपेचं सोंग घेऊन पडलोय. भ्रष्टाचार आपण स्वीकारलाय. त्याच्याशिवाय आपली कामं होणारच नाहीत, असं आपल्याला ठामपणे वाटतं. एकदम क्रूसेडर बनावंच, असं नाही. पण शेकडो नव्वद कामं भ्रष्टाचाराशिवाय होऊ शकतात. अनेकदा आपणच उशीर करतो. फॉलोअपला वेळ नसतो. सिस्टम, नियम समजून घेतलेले नसतात. त्यातून आपण भ्रष्टाचाराचा शॉर्ट कट शोधतो. बथ्थड नोकरशाह पैशाच्या वजनाशिवाय हलायला तयार नसतात, हे शंभर टक्के खरं. पण अनेकदा आपणही दोषी असतो. ठरवलं तर आपण त्याला आळा घालू शकतो. त्यांना पैसे खायच्या सवयी आपणच लावतो, आपणच त्या सोडवूही शकतो. खरं तर पैशानंही जी कामं होत नाहीत. ती प्रसन्न वागणं, प्रेमळ शब्द आणि समोरच्यातल्या माणूसपणावर विश्वास असेल, तर होऊ शकतात.

मुळात फक्त पैशांची देवाणघेवाण म्हणजेच भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार चहाच्या पेल्यापासून सुरू होतो आणि बाईच्या शरीरापर्यंत पोहोचतो, असं म्हणतात. त्याच्याही अलीकडे पलीकडे खूप भ्रष्टाचार आहे. आपण पूर्ण पगार घेतो, पण आठ तास नेमलेलं काम करत नाही. हा भ्रष्टाचार नाही का? सार्वजनिक गणपती बघायला वशिला लावून घुसतो, हा भ्रष्टाचार नाही का? मूळ पुस्तकातून अभ्यास न करता गाइड वाचून पास होतो, हा पण भ्रष्टाचारच नाही का? अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी. चिमूटभर खाल्लं, तरी त्याला शेण खाणंच म्हणतात. पण या सगळ्यातून आपला फायदा होत असतो. वेळ वाचतो, पैसे वाचतो. त्यातच आपण खूश असतो. मात्र यातून आपण नकळत आतल्या प्रामाणिकपणाच्या आगीवर राख टाकत असतो. हळूहळू ती आग विझत जाते आणि आपण कोणत्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात नडायचा अधिकारच गमावून बसतो. आपल्या नकळत. अशा वेळेस आपण फार तर उठू शकतो. जागू शकत नाही.

सिर्फ उठो मत जागो, ही लाइन 'उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरान्निबोधत' या वेदवचनावरून सूचलीय, हे उघड आहे. उठा, जागे व्हा, ध्येय मिळेपर्यंत थांबू नका, असं हे वचन सांगतं. खरा बोध मिळवण्यासाठी जागं होणं गरजेचं आहे. जागं होणं दूरच, आपण उठायला तरी तयार आहोत का? की असंच सोंग घेऊन झोपून राहणार? आता तरी उठूया ना!

- सचिन परब

Marathi Kavita : मराठी कविता


Offline asawari

 • Newbie
 • *
 • Posts: 28
Re: जागो रे!
« Reply #1 on: November 13, 2009, 05:45:51 PM »
Mind Refreshing  :)

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: जागो रे!
« Reply #2 on: November 13, 2009, 08:04:04 PM »
एकदम बरोबर! ............. चांगला लेख आहे...... धन्यवाद.

Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: जागो रे!
« Reply #3 on: February 11, 2010, 09:01:08 AM »
Very nice article.........thanks for sharing....