मराठी सारस्वताच्या दरबाराचे फक्त आपणच मानकरी आहोत, अशा भ्रमात वावरत 'मराठी साहित्य महामंडळा'च्या खुर्च्या वर्षानुवर्षें अडवून बसणाऱ्या मूठभर मुख
ंडांनी आगामी मराठी साहित्य संमेलनासाठी सॅन फ्रॅन्सिस्को या अमेरिकेतील महानगराची निवड करून हे संमेलन नेमके कोणाचे आणि कोणासाठी या प्रश्नाचे अखेर उत्तर दिले आहे. मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी माणूस याविषयी अपरंपार प्रेम असलेल्या लक्षावधी रसिकांच्या डोक्यावर शतकानुशतके मिऱ्या वाटणाऱ्या या तथाकथित 'महानुभावां'च्या 'मराठी ग्रंथकार सभे'ने १८८५मध्ये महात्मा जोतिबा फुले यांना साहित्य संमेलनाचे आमंत्रण दिले, तेव्हा त्यांनी अत्यंत रोखठोक शब्दांत आयोजकांना कसे खडसावले होते, याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे.
'आमचे साहित्य आम्ही निर्माण करू आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. उच्चभ्रू ब्राह्माणी ग्रंथकार स्त्री-शूदातिशूदांच्या प्रश्ानवर अवाक्षरही लिहीत नाहीत. त्यामुळे अशा ग्रंथकार सभेमार्फत देश-समाजाचा अजिबात उत्कर्ष होणार नाही,' अशा शब्दांत महात्मा फुल्यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली होती. त्यानंतरच्या शे-सव्वाशे वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. ब्राह्माणी साहित्य आणि विदोही साहित्य यातील दरीही बऱ्यापैकी दूर होत गेली. तरीही साहित्य संमेलने आयोजित करणाऱ्यांची मानसिकता थेट तशीच म्हणजे एकोणिसाव्या शतकातीलच राहिली. अन्यथा, गावागावांत भरणाऱ्या अनेक साहित्य संमेलनांना उदंड गदीर् करणाऱ्या हजारो रसिकांचा अवमान करून ही मूठभरांची दिंडी सातासमुदापार अमेरिकेला नेण्याचा घाट कौतिकराव ठाले-पाटील आणि त्यांच्या अनुयायांनी घातलाच नसता. स्वत:ला मराठी साहित्यिक, वाचक आणि एकंदरीतच वाचनसंस्कृतीचे प्रतिनिधी म्हणवणाऱ्या साहित्य महामंडळाच्या सदस्यांच्या या 'दूर'दृष्टीचे खरे तर आपण कौतुकच करायला हवे. मराठी साहित्य रसिकांचे भाग्य थोर म्हणून सॅन फ्रॅन्सिस्को येथील 'बे एरिया मराठी मंडळा'च्या खर्चाने विदेशवारीचे पुण्य स्वत: पदरात पाडून घेतानाच महामंडळाच्या या १८ सदस्यांनी आपल्याबरोबर आणखी किमान ५२ जणांच्या विदेशवारीचीही सोय लावली आहे! या सत्तर जणांचा संपूर्ण खर्च हा अमेरिकास्थित अनिवासी मराठी मंडळी करणार असून शिवाय आणखी पाच-एकशे 'रसिकां'ना अवघ्या ७५ हजारांत अमेरिकावारी घडवून आणण्याचा घाटही कौतिकरावांनी घातला आहे.
आता मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, अनेक लेखक, प्रकाशक तसेच रत्नागिरी व ठाणे येथे संमेलन भरवण्यास उत्सुक असलेल्या आयोजकांनी महामंडळाच्या या निर्णयाची 'मनमानी' आणि 'भांडवलशाही' अशा शब्दांत संभावना केली आहे. संमेलनाचे माजी अध्यक्ष मधू मंगेश कणिर्क यांनी अशा संमेलनाला सर्वसामान्य लेखक व वाचक जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे ते केवळ श्रीमंतांचे संमेलन ठरेल, अशी तिखट टीका केली आहे. महाराष्ट्रात हे संमेलन भरते, तेव्हा तिथे जमणारी गदीर् हौसे, नवशे आणि गवशे यांची असली, तरी त्यामुळे मराठी जनमानसात साहित्यप्रेमाला उमाळे येतात, यात शंकाच नाही. लेखक आणि कवी, 'दिसतो कसा तो आननी,' हे बघण्यासाठी तिथे जमणाऱ्या रसिकांनी गेल्या काही वर्षांत कोट्यवधींची ग्रंथखरेदी केल्याचीही उदाहरणे आहेत. या सर्वसामान्य रसिकांच्या प्रेमाला दूर लोटून 'मराठीचा झेंडा' अमेरिकेत फडकवून काय साध्य होणार आहे, या 'लाखमोला'च्या प्रश्ानचे उत्तर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे. ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना विदर्भातील मधुकर आष्टिकर यांनी संमेलनाचे वऱ्हाड लंडनला न्यायचा घाट घातला होता. पण तेव्हा स्वतंत्र बाण्याच्या साहित्यिकांनी विरोध केला आणि तो बेत बारगळला. अन्यथा, आपल्याला 'वाघिणीचे दूध' पाजणाऱ्या गोऱ्या साहेबाला आपण तिथल्या तिथेच मराठी भाषेचा ठसका दाखवला असता!
आता या संमेलनाच्या निमित्ताने सॅन फ्रान्सिस्को आणि बे एरिया परिसरातील 'केएफसी' (म्हणजे केंटुकी फ्राईड चिकन) व 'मॅक' (म्हणजे मॅक्डोनाल्ड!) या दुकानादुकानांत मराठीचा गजर होईल आणि इंग्लंडमधल्या नव्हे तरी अमेरिकेतल्या साहेबाला मराठी मात्रेचे चार वळसे दिल्याचे समाधान पदरी पडेल. तेवढे पुण्य पदरात पाडून 'माय'देशी परतल्यावर पुन्हा एकदा या 'महाराष्ट्र देशी 'मऱ्हाटी' भाषेला भवितव्य उरलेच नाही!' म्हणून गळे काढून रडायला महामंडळ मोकळे होईल! १८८५च्या 'ग्रंथकार सभे'ला विरोध करताना महात्मा फुल्यांनी त्या संमेलनाच्या आयोजकांची 'घालमोडेदादा' या शब्दांत संभावना केली होती. अमेरिकेतल्या या संमेलनाच्या आयोजकांसाठीही त्यापेक्षा चांगला शब्द सुचणे कठीण आहे!