- प्रकाश अकोलकर
दिवस सरत्या वर्षाचे
दिवस जुन्या आठवणींचे
दिवस चुकांच्या उजळणीचे
आणि दिवस नव्या संकल्पांचे...
दिवस गतवर्षाचा लेखाजोखा मांडणारे
दिवस २६।११च्या सावटाखालचे
दिवस भीतीचे... दिवस भयभीतांचे
दिवस घुबडासारखे तांेड लपवून बसणाऱ्यांचे
- आणि पेटून उठणारे
दिवस दहशतीला निधड्या छातीने सामोरे जाणारे
दिवस रात्रीचा दिवस;
पण दिवसाची रात्र करणारे.
दिवस निवडणुकांचे...
दिवस पैशाच्या खेळाचे
दिवस सत्तांतराची स्वप्ने दाखवणारे
दिवस सुंदोपसुंदीचे, कलगीतुऱ्याचे,
दिवस आरोप-प्रत्यारोपांचे
आणि भाऊबंदकीचेही!
दिवस मी मराठीचे.
दिवस माझ्या मराठीचे.
दिवस माझ्या मुंबईचे.
दिवस आमच्या मुंबईचे... आणि
दिवस आम्हा मुंबईकरांचेही!
दिवस सुवर्ण महोत्सवाचे
दिवस श्रेयासाठी सुरू झालेल्या लढाईचे
दिवस दिवसच्या दिवस आपापसात भांडणांचे
दिवस कुरघोडींचे, दिवस कुरापतींचे. करामतींचे. कलागतींचे. कलगीतुऱ्याचे.
- आणि पराभवालाच विजय मानणाऱ्यांचे.
दिवस गोंधळाचे, गडबडीचे, गदारोळाचे
दिवस वास्तवाकडे पाठ फिरवणारे
दिवस रंगबिरंगी झगमगटात रमणारे
दिवस गदीर्त घुसमटणारे
दिवस तरीही गदीर्तच दिवस काढू पाहणारे
आणि अखेर गदीर्तच रमणारे.
दिवस आथिर्क तंगीचे...
जागतिक स्तरावरील मंदीचे
भाववाढीचे. नोकरकपातीचे. पगारकपातीचे...
दिवस चढत्या भाजणीचे
दिवस आश्रित. दिवस निराश्रित...
दिवस एकलकोंडे. दिवस काळतोंडे,
दिवस दुसऱ्याचे भांडे फोडणारे
दिवस अवमानित. दिवस अपमानित.
दिवस आला दिवस रोजच्याप्रमाणे विनातक्रार पुढे ढकलणारे
दिवस बघता बघता वाऱ्यावर उडून जाणारे
दिवस नशिले. झिंग आणणारे.
दिवस नुसतेच दिवसच्या दिवस जाणारे
दिवस देवदासचे.
उदास. बापुडवाणे. केविलवाणे...
दिवस दिवास्वप्नांचे आणि दिवाभीतांचेही.
- आणि दिवस वदीर्ला सलाम करण्याचे.
सलाम न करणाऱ्याच्या पाठीत लाठी घालणारे.
ठीक आहे, हरकत नाही...
लाठी पोटावर तर बसली नाही ना...
दिवस वदीर्च्या जुलमाचे
दिवस बलात्काराचे
सहन न होणारे आणि सांगताही न येणारे.
दिवस साटेलोट्याचे. भ्रष्टाचारी.
दिवस टेबलाखालच्या पैशांचे.
पैशाला पासरी मिळणारे दिवस
न्यायाचीही किंमत करणारे...
अन्यायाचे समर्थन करणारे
दिवस न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी अधिकच करकचून बांधायला लावणारे
दिवस कौरवांचे. दिवस पांडवांना वनवासात धाडणारे.
दिवस धृतराष्ट्राचे. दिवस गांधारीचे.
चक्रव्यूहातील एकाकी अभिमन्यूचे.
- आणि 'नरो वा कुंजरो वा' म्हणणाऱ्या धर्मराजाचेही.
दिवस अवघ्या जगाला कचकचीत शिवी घालणारे
आत्मकेंदी. स्वच्छंदी. चंगीभंगी.
दिवस दिवसच्या दिवस लोळत पडणारे
दिवस टीव्हीच्या पडद्यासमोर तासन्तास काढणारे
दिवस बॉलीवुडला शिव्या घालणारे.
दिवस एकामागून एक सिनेमे बघणारे.
दिवस येताजाता सचिनच्या नावाने शंख करणारे
- आणि सचिनची फलंदाजी सुरू होताच हातातला रिमोट बाजूला ठेवणारे!
दिवस कर्तृत्वाचे. दिवस कर्तबगारीचे
दिवस इंटरनेटचे. फेसबुकचे, ऑर्कुटचे...
दिवस नव्या स्वप्नांचे...
दिवस शादी डॉट कॉमचे
- आणि दिवस चमचेगिरी डॉट कॉमचेही.
दिवस 'सलाम! साहेब, सलाम!!' अशा मंत्राचे
दिवस त्यातूनच फुलणाऱ्या आशा-आकांक्षांचे
दिवस तरुणाईचे. भंकस.
दिवस हिरवाईचे. हिरवट.
दिवस नव्याच्या नऊ दिवसांचे.
नवलाईचे. न्यूऑन साईनचे.
फक्त स्वत:पुरताच उजेड पाडणारे.
दिवस दिव्याखालच्या अंधाराचे
आणि 'तुफान और दिया'चेही.
दिवस उद्याच्या आशेवर आजचा दिवस पुढे ढकलणारे
'हाच खेळ, उद्या पुन्हा!'कडे डोळेझाक करणारे
- आणि दिवस निर्ढावलेले. निब्बर.
दिवस कमावलेले. रेड्याच्या कातड्याप्रमाणे.
दिवस गमावलेले.
।। ते हि नो दिवसा गता:।।
अहा, ते सुंदर दिन हरपले...
जाने कहाँ गये वो दिन...
दिवस भूतकाळात ठाण मांडून बसलेले.
दिवस नवे कॅलेंडर लावण्याचे
दिवस नव्या डायरीच्या शोधातले...
दिवस जुनी डायरी माळ्यावर टाकणारे
हिशेब-फिशेब लिहायला लावणारे. ताळेबंदांचे.
दिवस जमाखर्चाचे. दिवस ऋण करून सण साजरा करायला लावणारे
- आणि रात्रीच्या पाटीर्ची आठवण करून देणारे.
दिवस सारेच भान हरपून टाकणारे
दिवस मैलाच्या दगडांनाच पाऊलखुणा समजणारे
दिवस असे... दिवस तसे...
- आणि दिवस 'गुड बाय २००९!'चे दिवस 'हॅप्पी न्यू इयर!'चेही....