(सकाळची वेळ ...)
आई : राणी उठायचं नाही का गं? अग सकाळचे दहा वाजले, उठ गं आतातरी. शेजारच्या इतर मुली बघ, उठून घरातल्या कामालाही लागल्या असतील आतापर्यंत. आणि तू अजून झोपूनच आहेस.
राणी : काय आहे गं? रविवारचा एकच दिवस तर मिळतो आरामात झोपायला, तेव्हाही तुझी कटकट चालूच असते.
आई : आमच्याकडे म्हणून चालून जातात तुझे हे नखरे. उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसं होणार तुझं देवालाच माहित!
राणी : काय वैताग आहे. सुखाने झोपू पण देत नाही एक दिवस कुणी.
आई : आजही कुठे जाणार आहेस की निदान आजतरी घरी आहेस?
राणी : हो, संध्याकाळी जाणार आहे. आज खूप दिवसांनी आम्ही कॉलेजच्या मैत्रीणी दादरला भेटणार आहोत. रात्री यायला थोडा उशिर होईल.
आई : उशिर म्हणजे नक्की किती उशिर?
राणी : ते मी तुला आताच कसं सांगू?
आई : हे बरं आहे तुझं, तुझे बाबा मला ओरडतात दरवेळी तुम्हांला काही शिस्तच लावली नाही म्हणून. आजकाल तुझे घरात पायच टिकत नाही. ऑफिसमधून ही रोज उशिराच येतेस. त्यात सुट्टीच्या दिवशी हि मित्र-मैत्रिणींबरोबर कुठे न कुठे जातेस. तुझी लक्षणं आजकाल काही ठिक दिसत नाही मला आणि ११ वाजता ही काय वेळ झाली का गं मुलींनी घरी यायची. तुझ्या मैत्रिणींना हि घरी विचारणारं कुणी नसतं का? की सगळ्याच तुझ्यासारख्या बेपर्वा! आम्ही तुला सगळ्याबाबतीत मोकळीक दिली आहे त्याचा असा गैरफायदा घेवू नकोस राणी.
राणी : अभी कितीही उशिरा आलेला चालतो ना गं तुम्हांला, त्याला तर तुम्ही कधी काहीच बोलत नाही. मग मलाच का ओरडता दरवेळी?
आई : अगं त्याची गोष्ट वेगळी आहे. तो मुलगा आहे आणि तू मुलगी, त्यात तुझं लग्नाचं वय. आजच्या जमान्यात कधी कुठे काय होईल सांगता येतं का? आपण आपल्यापरीने काळजी घेतलेली बरी. तुम्ही मुली नवऱ्याच्या घरी जाईपर्यंत आमच्या जीवाला घोरच असतो गं.
राणी : बघावं तेव्हा मुलींनी हे करू नये, ते करू नये, असे वागू नये यावर लेक्चर... जसं काही मुलगी म्हणून जन्माला येणं हा गुन्हाच आहे.
आई : तुझ्यापुढे काही बोलायची सोय नाही गं बाई... तुझ्या मनाला जसे वाटेल तसे कर. उद्या तू स्वत: आई झाल्यावरच तुला माझं मन कळेल. झोपली वाटतं पुन्हा, अगं बाई उठ गं. कधी अक्कल येणार हिला देव जाणे.
बाबा : कशाला जातेस तिला काही बोलायला, माहित आहे ना ती कशी आहे. स्वत:च्या मर्जीप्रमाणेच वागणार शेवटी ती. आपलं काही पटणार आहे का तिला. मी तर आजकाल तिला काही बोलायलाच जात नाही. नाकावर लगेच राग येतो तिच्या. हल्ली काय झालंय तिला तेच कळत नाही. कोणाचं काही ऐकूणच घेत नाही. कसं होणार ह्या पोरीचं उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर तेच कळत नाही.
आई : हो पण नंतर तुम्हीच मला बोलत बसता ना दोघांनाही कसलं वळणच लावलं नाही, काही शिकवलंसच नाही म्हणून, आता तुम्ही घरीच असता ना तुम्हीच शिकवा त्यांना काय ती शिस्त.
बाबा : मी घरीच असतो गं, पण हि दोघं कुठे घरी असतात. पंख फुटले दोघांनाही आता. मी कामावरून रात्री उशिरा घरी यायचो तेव्हा झोपलेली असायची दोघंही. आता कुठे वेळ आहे मुलांसाठी, पण ह्यांच्याजवळ वेळच नाही माझ्यासाठी. दोघेही जणूकाही आपआपल्या विश्वात गुरफुटून गेलीत अगदी आणि शिस्त लावायला हाताबाहेर गेलीत ती दोघं आता. साधं ओरडलो तरी किती मनाला लावून घेतात, हात उगारायची तर सोयच उरली नाही. रागाच्या भरात काहीतरी करून बसतील हि भीती. आपल्या लहानपणी आपण असे नव्हतो ना गं. आपली तर हिमंतच व्हायची नाही थोरामोठ्यांसमोर काही बोलायची आणि हि आजकालची मुलं! काही बोललो की लगेच उलट उत्तरं देतात. मोठ्यांचा काही मानच राहिलेला नाही ह्यांना. कसं होणार याचं पुढे परमेश्वरालाच माहित.
आई : हो, ना!
बाबा : बाजीराव कुठे गेले आपले?
आई : क्रिकेट खेळायला गेलाय सोसायटीतल्या मुलांसोबत, आज रविवार ना.
बाबा : हं! क्रिकेटनेच पोट भरणार आहे तो आता आपलं आणि स्वत:चही. तुझ्या अतिलाडाचे हे परिणाम. जबाबदारीची काही जाणिवच नाही त्याला. त्याच्या नोकरीचं काय झालं? कुठून कॉल आला की नाही अजून.
आई : प्रयत्न चालू आहेत हो त्याचे. इंटरव्हू देवून आलाय ४–५ ठिकाणी, बघुया आता काय होतंय ते. देवा! लवकर चांगली नोकरी लागू दे रे माझ्या अभीला. सत्यनारायणाची पूजा घालीन रे बाबा मी.
(दुपारची वेळ ...)
आई : अभी, राणी जेवायला या रे! किती वेळ झाला हाका मारून. कधीची ताटं वाढून ठेवली आहेत.
अभी : हो आलो, ५ मिनिटं थांब.
आई : राणी...
राणी : हो आली, प्रीतीचा फोन आहे. तिच्याशी बोलून येते.
बाबा : जेवायला हि कधी वेळेवर यायची नाहीत हि कार्टी, एक कॉम्पुटरवर बिझी तर दुसरी फोनवर. एवढं दिवसभर काय बोलत असतात मित्र-मैत्रिणींशी देव जाणे. आपल्याबरोबर बोलायला तर कधी वेळच नसतो ह्यांच्याजवळ.
आई : गप्प जेवा हो! उगीच स्वत:च्या डोक्याला ताप करून घेवू नका. येतील दोघं त्यांच्या सवडीनुसार.
बाबा : हो तोपर्यंत आपलं जेवून हि होईल! एकत्र बसून कधी जेवावसं वाटतच नाही या दोघांनाही. तुझ्या अती लाडाचे हे परिणाम. राणी, अभी आता येताय की नाही दोघं जेवायला? की मी येवू तिकडे?
अभी : हो आलो! (आशु चल नंतर बोलुयात. मी लॉगऑऊट करतोय. जेवायला जातो आता. बाबा भडकलेत. बाय, लव यू जानू.)
राणी : आले. (चल प्रीती बाय. तुला नंतर कॉल करते. आई जेवायला बोलावतेय कधीची...)
बाबा : किती हाका मारायच्या रे तुम्हांला? निदान जेवायला तरी वेळेवर येत चला.
राणी : हे काय आज पण पुन्हा हिच भाजी, मला नको.
बाबा : मग तुला काय हवे ते स्वत:च्या हाताने करून घेत जा ना. आता काय लहान राहिली नाहीस तू. नखरे बघायला नको एक-एक ह्या मुलीचे. सकाळी लवकर उठून आईला जेवणात मदत करायची तर सोडूनच दया, हुकुम तेवढे सोडता येतात तुला.
राणी : कितीवेळा तिला सांगितलं की घरकामाला एक बाई ठेव.
बाबा : तुम्ही दोघीजणी असताना बाई कशाला हवी. तू तिला थोडी मदत केलीस तर काही बिघडणार आहे का तुझं? उद्या लग्न झाल्यावर सासरी करावीच लागतील ना कामे तुला. मग आतापासूनच सवय करायला काय जातंय? नाही तर उद्या तुझ्या सासरची मंडळी म्हणतील आई-बाबांनी काही शिकवलेलेच दिसत नाही पोरीला. सासरी तरी निदान आमचे नाव खराब करू नको म्हणजे झाले.
राणी : लागले पुन्हा डोकं फिरवायला.
आई : कशाला उगीच वाद घालताय तुम्ही तिच्याबरोबर, गप्प जेवा हो जरा.
बाबा : हो तू मला तेवढं गप्प रहायला सांग या घरात.
अभी : बाबा माझं तुमच्याजवळ एक काम आहे.
बाबा : कसलं रे काम?
अभी : मला तुमच्याकडून थोडी मदत हवी आहे.
बाबा : कसली मदत?
अभी : मला १ लाख रुपये उधार हवे आहेत.
बाबा : कशाला?
अभी : मी आणि माझा मित्र आहे ना पंकज, आम्ही दोघे मिळून पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा विचार करतोय.
बाबा : कसला बिझनेस?
अभी : कन्सलटन्सी फर्म.
बाबा : अरे! बिझनेस करण्यापेक्षा जॉब बघ कुठेतरी. बिझनेस आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांनी करायचा नसतो.
अभी : उगीच लेक्चर देत बसू नका हो बाबा. माझा निर्णय पक्का आहे. मला नोकरी करून कोणाच्यातरी हाताखाली काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्ही पैसे उधार देणार आहात की नाही तेवढंच सांगा.
बाबा : नाही.
अभी : पण का?
बाबा : माझ्याजवळ पैसे नाहीत. मी काय आता पूर्वीसारखा कमावत नाही. रिटायर्ड झालो त्यावेळी जे काही थोडे फार मिळाले होते ते राणीच्या लग्नासाठी म्हणून जपून ठेवले आहेत.
अभी : मी कुणीच नाही का तुमचा? राणी तेवढी लाडकी! तिने मागितले असते तर लगेच काढून दिले असते.
बाबा : तू उगीच वाद घालू नकोस. बिझनेससाठी मी पैसे देणार नाही.
अभी : बाबा असं काय करताय. बँकेतून कर्ज घेतलं असतं हो आम्ही पण ते भरमसाठ व्याज भरणं इतक्यात तरी शक्य नाही हो आम्हांला, म्हणून तर तुमच्याकडे उधार मागतोय तेही तुमच्याकडे आहेत म्हणूनच.
आई : अहो! द्या हो एवढं मागतोय तर. आपलाच मुलगा तर आहे ना. आपण मदत करणार नाही तर कोण करणार?
बाबा : तू गप्प बस जरा वेळ.
आई : तुमच्या बहिणींना बरी पैशांची मदत करता दरवेळी लागेल तेव्हा. मुलाला दयायचे म्हणजे पैसे नाहीत आता.
बाबा : तू गप्प बसशील का माझे आई जरावेळ.
राणी : अहो बाबा, आजकालच्या रिसेशनच्या जमान्यात नुसतं नोकरीवर डिपेंड राहून चालत नाही हो. जॉब राहिलेत कुठे जास्त. त्याला बिझनेस करायचा आहे तर करू दयात ना! नाही तरी माझं लग्न कधी ठरेल तेव्हा. तुम्ही इतक्यात काळजी नका करू पैशांची. मी साधेपणानेच लग्न करीन. त्यामुळे माझ्या लग्नासाठी पैसा जमवून ठेवायची काही गरज नाही. अभीला दया ते पैसे. अभी माझा तुला फुल सपोर्ट आहे रे. तू बिझनेसच कर.
अभी : थॅक्स दी. वो बाबा प्लीझ्झ्झ्झ! दया ना हो.
आई : अहो! असं काय करताय द्या ना हो त्याला पैसे.
बाबा : एका अटीवरच! मला एका वर्षात सर्व पैसे परत देणार असशील तरच तुला देईन.
आई : वाह! स्वत:च्या बहिणीकडे कधी एका वर्षात पैसे मागितले नाहीत ना हो आजपर्यंत. त्यांनी घेतलेले पैसे अजून परत केले नाहीत आणि स्वत:च्या मुलाकडून तेवढे एका वर्षात हवे तुम्हांला.
बाबा : हो का आणि तुझ्या भावंडाना जी मदत केली होती ती तरी परत केली का अजून कुणी?
आई : राणीच्या लग्नाच्या वेळी परतफेड करतीलच ते.
अभी : आई तू जरा वेळ गप्प बस गं! हो नक्की देईन बाबा. तुमचे सगळे पैसे एका वर्षात परत करीन.
बाबा : बरं! ठिक आहे. जेवून झाल्यावर देतो चेक १ लाखाचा. आता तर झाले ना तुमच्या सगळ्यांच्या मनासारखे.
अभी : थॅक्स बाबा. लव यू.
बाबा : हम्म! जेवा आता लवकर चिरंजीव.
(संध्याकाळची वेळ ...)
राणी : आई मी निघते गं.
आई : बरं, लवकर ये गं, रात्री खूप उशिर करून येवू नकोस.
बाबा : जोश्यांकडच्या स्थळाबद्दल काही बोललीस की नाही अजून तू तिला?
आई : नाही, तुम्ही दोघं काय ते बघून घ्या. मला नका मध्ये पाडू यात. माझ्या बोलण्याला तर काही किंमतच नाही आजकाल ह्या घरात.
बाबा : म्हणजे तुला कोणी काही बोलले की काय?
आई : अजून कशाला कोण बोलायला हवंय? तुम्हीच काय कमी आहात का? येता जाता दोघांसमोर माझा आणि माझ्या माहेरच्यांचा उद्धार करत असता...
बाबा : तुझं खानदान आहेच तसं त्याला मी तरी काय करू.
आई : जेव्हा तेव्हा माझ्या माहेरच्यांना काहीही बोललेलं मी खपून घेणार नाही हा.
बाबा : बरं माझे आई, आता तू हि भांडत बसू नकोस माझ्याशी. आधीच राणीमुळे डोक्याला ताप झालाय. कार्टी लग्नाचा विषय काढला की भांडायला येते. २६ वर्षाची घोडी झालीय तरी अजून लग्नाचा पत्ता नाही. म्हणे माझा मी शोधिन. कधी मिळणार तरी कधी हिला कुणी देव जाणे? आम्ही आणलेलं स्थळ हिला पसंत पडत नाही आणि स्वत: सुद्धा कुणी शोधून आणत नाही.
आई : होईल ओ तिचं लग्न! तुम्ही कशाला एवढी चिंता करता? आपल्या त्या दाते भटजींनी तिची पत्रिका बघून सांगितलं आहे ना की तिला चांगला सुशिक्षित आणि सुस्वभावी नवरा मिळेल म्हणून.
बाबा : हो आता त्या दातेच्या भरवशावर राहतो मी. दुसऱ्यांच नशिब सांगताहेत, आधी स्वत:च भविष्य पहा म्हणावं त्याला.
आई : गप्प बसा हो, उगीच काहीतरी बोलू नका हा त्यांच्याबद्दल.
बाबा : बरं बाई मीच गप्प बसतो. तुम्ही दोघी मायलेकी आणि तुझा तो सुपुत्र तिघं मिळून काय घालायचाय तो गोंधळ घाला. माझं तर कुणी काही ऐकतंच नाही ह्या घरात.
आई : अरे देवा! ६ वाजले. अहो! टीव्ही लावा ना जरा. “कुंकू माझं भाग्याचं” सिरिअल सुरु झाली असेल हो. आज रविवार ना, महाएपिसोड आहे त्या सिरिअलचा.
बाबा : इथे मी काय बोलतोय आणि हिला सिरिअल्सचे पडले आहे. तू आणि तुझ्या त्या फालतू सिरिअल्स! चूलीत घाल त्यांना. हिचा नवरा तिच्याबरोबर, त्याची बायको ह्याच्याबरोबर... काय अर्थ तरी असतो का त्या सिरिअल्सना?
आई : तुम्हांला नाही आवडत तर तुम्ही नका हो बघत जावू. कोणी जबरदस्ती नाही केलीय तुमच्यावर सिरिअल्स बघाच म्हणून.
बाबा : आता दिवसभर तर तू टि.वी. लावून बसतेस वर रिमोटवर हि तुझाच ताबा असतो. मी काय पूर्ण दिवस डोळे बंद करून तर नाही ना राहू शकत.
आई : मग मी काय करू असं तुमचं म्हणणं आहे.
बाबा : त्या सिरिअल्स बघायच्या सोडून दे.
आई : आणि काय करू दिवसभर?
बाबा : करण्यासारखी बरीचशी कामे आहेत गं.
आई : जशी?
बाबा : आता ते हि मीच सांगू का?
आई : तुम्हां सगळ्यांना माझ्याशी बोलायला थोडा तरी वेळ असतो का? एक दिवसभर फोनवर बिझी तर दुसरा कॉम्पुटरवर आणि तुम्ही तर भांडणामध्येच संपूर्ण दिवस घालवता. मग मी माझे मन त्या सिरिअल्समध्ये रमवलं तर बिघडलं कुठे?
बाबा : वा आता भांडण हि मीच उकरून काढतो का?
आई : मग काय मी काढते का?
बाबा : बरं माझे आई! तू सिरिअल बघ. उगीच वाद नको पुन्हा त्यावरून. मी जरा शेजारच्या राऊतांकडे जावून येतो.
(रात्रीची वेळ ...)
बाबा : अजून कशी आली नाही हि रात्रीचे दहा वाजले...
आई : येईल हो तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? आज काय पहिल्यांदाच गेली आहे का ती? नेहमीचंच तर झालंय आता तिचं असं उशिरा घरी येणं.
बाबा : फोन करून बघ तिला, कुठे आहे विचार. मी काही बोलत नाही म्हणून डोक्यावर चढत चालली आहे.
आई : हो का? मग आज आली की बोला तिला काय ते.
बाबा : हो येवू तर देत तिला, मग बरोबरच करतो की नाही बघ तू.
आई : आली बघा.
बाबा : किती वेळ राणी? हि काय वेळ झाली का घरी यायची?
राणी : काय झाले? आताशी १०.१५ च तर वाजले. उलट आज लवकर घरी आली रोजच्यापेक्षा. बस, ट्रेन सगळं कसं मस्त वेळेवर मिळाले.
बाबा : तुला आम्ही सगळ्या बाबतीत मोकळीक दिली आहे त्याचा असा गैरफायदा घेवू नकोस राणी.
राणी : मी काय केले आता?
बाबा : घरी लवकर येता येत नाही का तुला?
राणी : आता पुन्हा तुमचं ते लेक्चर सुरु नका करू हा बाबा. मुलगी म्हणजे काचेचं भांड वैगरे वैगरे. मला आता ते तोंडपाठ झालंय.
बाबा : काय बोलावं तुझ्यापुढे तेच कळत नाही. आम्ही काय तुझे वैरी नाही आहोत. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय ना तुला हे सर्व?
आई : बाहेरून काही खाऊन आलीस की जेवायला वाढू तुला?
राणी : नको. मी इडली सांभार खाऊन आलेय आज मस्त. मला आता काही नकोय. तुम्ही जेवलात की नाही अजून?
आई : आम्ही जेवलो. कधी पासून तुझीच वाट बघतोय.
राणी : कशाला?
आई : बाबा सांगतील तुला.
बाबा : तूच सांग गं.
आई : माई आत्याचे शेजारी आहेत ना ते साळस्कर. त्यांच्या मुलासाठी मागणी आली होती तुझ्यासाठी. तुझ्या बाबांनी तुझी पत्रिका दिली होती. आजच सकाळी त्यांचा फोन आला की पत्रिका ३० गुणांनी जुळतेय. त्यांनी तुला बघायला कधी येवू ते विचारलेय.
राणी : बरं!
आई : मग काय सांगायचे त्यांना?
राणी : पत्रिका देताना मला आधी विचारले होते का कुणी? मग आता कशाला काही विचारताय.
बाबा : तुझे उत्तर मला आधीच माहित होते म्हणूनच विचारले नव्हते.
आई : अगं पण मुलगा चांगला आहे. इंजिनिअर आहे. चांगल्या कंपनीत कायमस्वरूपी कामालाही आहे. दिसायला हि बरा आहे. आणि महत्वाचे म्हणजे मुंबईसारख्या शहरात स्वत:चे घर आहे. अजून काय हवंय आपल्याला. सुखाने नांदशील पोरी तिथे.
राणी : तुम्हांला किती वेळा सांगितले आहे की मला इतक्यात लग्नच नाही करायचे आहे म्हणून.
बाबा : मग कधी करणार आहेस वय उलटून गेल्यावर का?
राणी : तुम्हीच म्हणता ना जाशील त्या घरी तुझे कसे होईल काय माहित! मग कशाला एखाद्याच्या आयुष्याची वाट लावायचा विचार करताय माझ्याबरोबर लग्न लावून देवून.
बाबा : म्हणजे कधी लग्नच करणार नाही का तू?
राणी : मी असं कुठे म्हणतेय.
बाबा : मग?
राणी : जेव्हा मला समजून घेणारा कोणी भेटेल तेव्हाच लग्नाचा विचार करेन.
बाबा : मग तुला अजून कोणी भेटलं की नाही? तुझ्या मनासारखा?
राणी : नाही!
बाबा : का?
राणी : मला नाही माहित का ते... तुम्ही दहावेळा विचारत जावू नका कुणी सापडलं की नाही अजून ते. सापडला की मीच येवून ती खुशखबर देईन तुम्हांला.
आई : आपल्या जातीतलाच मुलगा कर गं बाई! नाही तर कोणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्हांला.
राणी : हो का, मग तर मी जाती बाहेरचाच मुलगा बघते की नाही बघ.
आई : तुझ्यापुढे काही बोलायची सोयच राहिली नाही.
राणी : मग जात काय करायची आहे तुला त्याची, माणूस आहे एवढं पुरेसं नाही का एखाद्याचं? आपल्या जातीत नाहीतरी काय ढीगभर हुंडा मागतात. मला नको असला भिकारडा नवरा.
बाबा : बरं बाई! शोध तुझा तूच, बघू कुठला राजकुमार शोधून आणतेस ती. मी सरळ नाही म्हणून सांगतो साळस्करांकडच्या स्थळाला. ह्यापुढे हिच्यासाठी मुलगा शोधायच्या भानगडीतच पडणार नाही मी कधीही.