Author Topic: 'My मराठी' नव्हे 'माय मराठी'  (Read 1962 times)

Offline अतुल देखणे

 • Newbie
 • *
 • Posts: 47
 • Gender: Male
 • सांग सख्ये कसं करू कौतुक तुझं, हि अशी कविता असताना....
  • Atul Dekhane
'My मराठी' नव्हे 'माय मराठी'

'My मराठी' ....हे वाचनच जरा खटकतंय ना !!! तुम्ही विचार करत असाल की मी हे असं का लिहिलं आहे, कारण सध्या महाराष्ट्रात 'माय मराठी' नव्हे, तर 'My मराठी' आहे.

"मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे शिव-छत्रपती शिवाजी महाराजांचं सूत्र आहे. शिवरायांनी इ. स. १६४२ च्या सुमारास स्वराज्य स्थापनेची सुरवात केली. त्या काळात पारसी भाषेचा प्रचंड प्रभाव होता, परंतु राज्य व्यवहाराची भाषा मराठी असल्याने मराठीचच प्रभुत्व राहिलं गेलं. पण सध्या याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठी भाषेची होणारी गळचेपी तसेच मराठी कडे होणारे दुर्लक्ष पाहता सर्वांनाच महाराजांच्या या सूत्राचा विसर पडलेला दिसत आहे.

      अहो  तुम्हीच पाहा ना....आज लहान मुलांच्या शाळेपासून ते मोठ्यांच्या नोकरी-धंद्या पर्यंत एकच सिध्दांत दिसून येतो तो म्हणजे, 'इंग्रजी शिकूया आणि मराठी विकुया.' 'आपली बोली - आपला बाणा, मी मराठी' हे आता फक्त बोलण्यापुरते किवा ऐकण्यापुरतेच राहिले आहे. शिव-छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या सूत्राला आज खरोखरच तडे जात आहेत. आज महाराष्ट्रात 'मराठी भाषी कमी आणि हिंदी भाषी धनी' हेच समीकरण पाहायला मिळत आहे. आश्चर्याची गोष्ट हीच की, हे एवढं पाहूनही सर्व मराठी मावळे अजून गप्पच....

     आता या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण???, माझ्या या प्रश्नाच उत्तर अगदी सोपं आहे, या अशा परिस्थितीला दुसरं-तिसरं कोणी नाही, तर आपण स्वतःच जबाबदार आहोत. कारण आपण आज खूप शिकलोय त्यामुळे आपल्यालाच मराठी बोलण्याची लाज वाटते... हल्ली कोणाशीही सहज जरी बोलायला गेलं तर प्रामुख्याने हिंदी - इंग्रजीचाच वापर केला जातो आणि तेही मराठी माणसांच्याच तोंडून ...!!! त्याचं उत्तर नेहमी ठरलेलंच असतं "ya I am Maharashtrian, but I can't speak Marathi" तुम्हीच सांगा आता, काय मोठया हुद्द्यावर गेलेला मराठी माणूस "मराठी भाषा" विसरू शकतो???, काय तो हुद्दा त्यांना मराठी बोलू नका असं सांगतो???, नाही ना..... मग हि अशी मराठी भाषेशी तडजोड का?, म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हा " माय मराठी नाहीतर My मराठी"......

आपणही या सर्वांच्या मध्ये येतो कारण, टाक्सिवाले, रिक्षावाले, भाजीवाले यांच्याशी बोलताना हिंदीतूनच बोलतो ना..... अहो बोला त्यांच्याशी मराठीतून, पाच-सहा वेळा विचारा त्यांना मराठीतूनच, सातव्यांदा त्यांना कळेलंच की तुम्ही काय बोलत आहात ते आणि जरी नाही कळलं तर त्यांना हे समजून चुकेल की तुम्हाला मराठीचा किती अभिमान आहे ते आणि त्यांना हि भाषा शिकणे किती गरजेच आहे तेही...सध्याची हि अवस्था हा महाराष्ट्र आपला राहिलाच नाही अशी दाखविणारी आहे.

परंतु  सर्वच मराठी लोक असे नाहीत...अजूनही बरेच लोक असे आहेत ज्यांना माझा महाराष्ट्र म्हणण्यात गर्व वाटतो, ज्यांना महाराष्ट्राचा अभिमान आहे, ते स्वतः मराठीतच बोलतात आणि वेळ आल्यावर मराठीवर सुध्दा बोलतात, आणि असेही काही लोक आहेत जे महाराष्ट्राचे रहिवासी नसताना देखील खूप छान प्रकारे मराठी बोलतात. अहो आपलेच काही बांधव जे परदेशात राहतात परंतु तरीही त्यांची मराठी कितीतरी छान असते. मला कोणत्याही भाषेबद्दल द्वेष नाहीये, मला मराठीचा अभिमान आहे. तुम्ही विकासासाठी किवा प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान शिका, इंग्रजीत प्राविण्य मिळावा, परंतु मराठीलाही तितकच प्राधान्य दया.
 
         "गर्व आहे मला या महाराष्ट्राच्या मातीचा,
          सुखाने येथे नांदणाऱ्या बहुगुणी जातीचा
          जरी असंख्य रंग चढविले गेले याच मराठी
          बोलीला,
          पण लक्षात ठेवा जावू देणार नाही तडा
          आम्ही महाराष्ट्राच्या या ख्यातीला......."
 

     सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की, "मराठा तितुका मेळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा" हे सूत्र आणि "मराठी माणूस" या दोन्ही गोष्टी जर महाराष्ट्रात टिकवायच्या असतील तर आता पासूनच तुम्ही स्वतः सुरवात करा, जास्तीत जास्त मराठीचा वापर करा, मग समोर कोणताही परप्रांतीय असला तरी हरकत नाही, पण सुरवात जरूर करा....

   नाहीतर खरोखरच "आपली बोली - आपला बाणा" "मराठी पाऊल पडते पुढे" हे सर्व इतिहासात जमा होईल आणि तो इतिहास सांगताना आपल्यालाच "माय मराठी' नव्हे, तर 'My मराठी" असा सांगावा लागेल...
 
       
 
 
 
     
      लेख सूत्रधार

---- अतुल देखणे ----
   

दिनांक- २६ सप्टेंबर २०१०


« Last Edit: April 27, 2011, 05:52:51 PM by Atul Dekhane »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: 'My मराठी' नव्हे 'माय मराठी'
« Reply #1 on: July 06, 2011, 05:06:52 PM »
'My मराठी' नव्हे 'माय मराठी'.........:)