हुंदका
=========
✍ लेखन :-श्री.संतोष बा.मनसुटे
संध्याकाळ व्हायला अजुन थोडाच अवधी शिल्लक होता..श्यामराव पायातली चप्पल घराबाहेरच्या कनवड्यात ठेवुन घरात आला.हात पाय धुवुन ,पोरी चहा ठिव वं,अशी लग्नाला आलेल्या त्याच्या थोरल्या पोरिला हाक देवुन खाट टाकुन ,थोडा आडवा झाला.. जस जसा श्वासांचा वेग वाढत होता तस तसा कंठ ही दाटून येत होता.आसवांना थोपवत श्यामराव स्वताला सावरत होता..कंठ पिळवून आसवांचे दोन थेंब बाहेर पडलेच...तितक्यात थोरली मुलगी कपबशी घेवून पुढे आली."हा घ्या बाबा चहा,आज लय दमलाय वाटता,तुमाले कीती दा सांगतो आमी,डवर्याले एखादा दोडीदार मजुर सांगत जा,लवकर काम आवरीन.." डवरा म्हणजे कोळपनी..अश्रू लपवतांना बापाची चालाखी तिच्या नजरेत आली होती पन पाहिल्याच न पाहिल करु दमलेल्या बापाची ती पाय दाबायला लागली....तिच्या डोक्यावरुन मायेन हात फिरवत श्यामरावाला अजून गहिवरुन आल...श्यामराव विचारात हरवून गेला .....सतत ची नापिकी,कधी ओला तर कधी सुखा दुष्काळ सोसत आज संसाराचा गाढा इथवर नेटवत तो आला होता...बँकेच कर्ज आधिचेच थकित होते,अडत्याची आगावु उचल मागच्या वर्षी नापिकीमुळे देण जमल नव्हतं,गावातल्या सावकारा कडून टक्केवारी वर कर्ज घेवुन वावर पेरल होत,पण पाऊस पडेपर्यंत फार उशिर झाला होता..दुबार पेरणी करावी लागली होती.आता पिक जोमात होत पण तन जास्त झाल होत.मजुर लावुन निंदुन काढणही जमत नव्हत,त्यात भर म्हणुन सर्जा-राजा च्या बैल जोडीतील राजा अकाली गेला होता.भाडोत्री बैल घेवून कोळपनी सुरु होती..कारभारीन तापान फनफनत होती, तिला नुकतच दवाखाण्यातून घरी आणल होत. .मे महिन्यात आशाला, थोरल्या मुलीला पाहायला पाहुणे आले होते पन जाचक अटीमुळे दोन्हीकडची पसंती होवुनही योग जुळून आला नव्हता...जाचक अटीत लग्न थाटात लावन अन तोड्यावार दागिण्यांची भर ही होतीच...लहान मुलगा शाळेत जात होता...कुटुंबाची वाताहत झाली होती... नव्या दप्तराच्या पोराच्या मागणीलाही श्यामराव कडुन मुहुर्त निघता निघत नव्हता..
दिर्घ श्वास घेवुन श्यामराव भानावर आला.मुलगी अजुन रिकामी कपबशी हातात घेवुन टक लावुन बापाच्या काळजीवाहु चेहर्याकडे पाहत होती...आता आसवांचा बांध फुटण्यास आला होता...तोच सावरत श्यामराव पोरीच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाला, बेटा कायजी घेजोव ,तुयी ,तुया मायची,गोलुची...लयी मन खाते माय तुय लगन नाइ जमवु शकलो म्या ...तूले पोरा सारख वाडवल वो ,पन का य करु माय पैशाच सोंग नाय व घेतायत मले ...हात टेकले माये या नियती पुडे .....तुन एखाद्या शिरमंताच्या घरी जन्म घ्यायला पायजे व्हता,देवान धाडल माया सारख्या करंट्याच्या घरी.....स्वतालाच शिव्या देत श्यामराव घरा बाहेर पडला....आशा हुंदके देवुन रडत होती...बापाची तळमळ तिला पाहवत नव्हती ....
रात झाली पन अजुन श्यामराव घरी परतला नव्हता.आशाने काकाला सांगितल, बा अजुन घरी नाही आला.सर्व इकडे तिकडे शोधत होते पन श्यामराव दिसत नव्हता.तेव्हड्या माळावर शोधायला गेलेल्या शेजारच्या काकाचा फोन आला.लवकर वावरात या ...सर्व जन लगबगीन वावराकडे चालू लागले.आशाच्या श्वासांचा वेग खुप वाढला होता ..... अन बाप दिसलाच ,पन झाडाला टांगलेला.....आशा तिच्या माय ,भाऊ अन टांगलेल्या बापाकडे रोखुन पाहत होती ......तिला काहिच उमजत नव्हत....गळा कोरडा होत होता ....रडू ही येत नव्हत ....आवाजही निघत नव्हता... अन हुंदका फुटला .... धाय मोकुन रडू लागली .....आता तिला कळल होत आपला बाप काय बोलुन गेला ......उरला होता..... हुंदका .........हुंदका ........अन फक्त हुंदका .......
✍ *लेखन:-श्री.संतोष बा.मनसुटे*
रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा
9099464668