दूर दूर ,शेकडो मैल अंतरावर ,आसमंतात एक चांदणी उगवतेय. अगदी अलगद ,अलवार.कसलाच आवाज नाही .कसला गाजावाजा नाही .कुणाची सोबत नाही.कुणाची साथ नाही. एकटीच .स्वताशी लुकलुकणारी.आभाळाच्या गर्द निळाई वर उठून दिसणारी . चमचमणारी.एक चांदणी .कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही .
रोजच उगवत असेल.कित्येक दिवस,कित्येक महिने,कित्येक वर्ष,अगदी वर्षानु वर्षेही .स्वतःच एकटेपण सांभाळत .एकाकीपण सहन करीत .कुणाची लक्षातहि आली नसेल .कुणी नोंदही घेतली नसेल कदाचित .
माझतरी कसं लक्ष गेल आज? कुणास ठाऊक ?पण गेल खर.तसही एकटच असं गच्चीवर ,तेपण अशा रात्री कितीवेळा आलेय मी तरी?
दिवसभराच्या उन्हाने गच्ची तापलेय.अजूनही उब जाणवतेय.
तुझ्यासारखीच. पण तुझ्यापेक्षा कितीतरी अपुरी,कितीतरी,अगदी खूपच अपुरी...
दूर खाडीवरून वारा येतोय. गार .बोचरा.अंगातून आरपार जाणारा.अंग थरथरून शहरणारा.पण वाऱ्याला त्याची जाणीवही नाही.
तो आपल्याच मस्तीत लहारतोय.हळूच नजाकतीने मोरपीस फिरवल्यासारखा ,खाडीच्या पाण्यावर मंद ,मंद तरंग उमटवतोय .
. तर्जनीने तू माझ्या पोटावर वर्तुळ रेखत असायचास ,एका लयीत,पोटापासून गळ्यापर्यंत.
माझा श्वास रोखलेला आणि अंगाची सूक्ष्म थरथर ....आताही कानाच्या पाळिमागे श्वास जाणवतोय,तुझा? हो.. तुझाच .....तुझ्या मऊ केसांचा स्पर्श कानाच्या पाठी अजूनही हुळूलतोय.
''सोन्या...."..
मी मागे वळून पाहते.पण तू नाहीसच.आणि दिसतात आंब्याच्या झाडाची पाने... हलणारी ...
म्हणजे तुझा ..तुझा.. फक्त भासच होता तो? एक थंड शिरशिरी उमटून जाते.
.सिली हवा छु गई
सिला बदन छील गया
नीली नदी के परे
गीलासा चांद खिल गया
दूरवरून पाणी खळ खळतय.मंद मंद .निरव शांततेत खळ खळाट खूपच वाटतोय . बाकी कसलाच आवाज नाही .तरीही कुणाच्या तरी पावलांची चोरटी चाहूल लागतेय
.''राजा.....''
माझा श्वास थांबतो .एक क्षणभर ,डोळे मिटतात .कान आतुरतात.आता तुझी साद कानी येईल .
नाही... अजून नाही.... मग नाहीच .
मी डोळे उघडते .समोर पाहते.
चंद्र पाण्यात उतरत असतो.हलके हलके .पाय धुवायला?
हः ...त्याचाच आवाज होता तर हा!आणि मी वेड्यासारखी.........
तुमसे मिली थी जो जिंदगी
हमने अभी बोई नहीं
तेरे सिवा कोई न था
तेरे सिवा कोई नहीं
आठवतंय? एकदा तू आलेलास .अगदी एकाच दिवसासाठी .आणि त्यात पण भेटता येणार नव्हतं.
तू इतक्या जवळ असून तुला भेटता येणार नाही? मला सारख रडायला येत होत .डोळे भरून भरून येत होते.चीड़चीड़ायला झालेलं .दिवसभर माझी तगमग सुरु होती .
का? का अस होत ?तुझ फक्त दर्शनही माझ्यासाठी इतक दुर्लभ का असाव ?.रात्र झाली.पांघरुंणावर पडल्यावरही शांत वाटेना.उलट दिवसभराची निराशा मनाला आणखीच जाळू लागली.
मी उठून गच्चीवर आलेली.खूप वारा सुटलेला, तरीही तशीच बसून राहिलेली .
.आणि..आणि ..तू आलास.दबकत दबकत ..गच्चीवर..
.तुझी उब पसरत गेली.आणि चंद्रकोर हसत बसली .शेवटी तर चांदण्यानाही राहवलं नाही .त्या पण टपटप खाली यायला लागल्या .झुरू मुरु पावसात भिजलेले आपण ,मग त्या चांदण्याच सुकवत बसलो अंगावर.
जाने कहा कैसे शहर
लेके चला ये दिल मुझे
तेरे बगैर दिन ना जला
तेरे बगैर शब् ना बुझे
किती दिवस झाले त्याला?कि वर्ष? माहित नाही.
आताशा मी दिवस मोजायचेच सोडून दिलेत .ते तर कमी न होता वाढतच जाताहेत .
आणि तू..? तुला तर तुझ्या कामासाठी दिवसच्या दिवसही कमी पडत असतील .पळ, क्षण,मिनिट ,दिवस हा हिशेब तर तुला आता कळतही नसेल.
एक डेडलाईन ते दुसरी डेड लाईन .किती काम असतील तुला.महत्वाची .
.सगळच शांत आहे .आता पाण्याचाही आवाज येत नाही .भरती संपलेय.ओहोटी लागलेय.चंद्रही मावळलाय.
आणि ती चांदणी ......ती तर कुठे हरवूनच गेलीय .....
.जितने भी तैर करते गए
बढ़ते गए यह फासले
मिलोंसे दिन छोड़ आये
सालोंसे रात लेके चले ..........
- अनिता
