Author Topic: घाणघापुरचा SMS  (Read 2893 times)

Offline dhundravi

  • Newbie
  • *
  • Posts: 34
घाणघापुरचा SMS
« on: December 28, 2009, 08:33:02 PM »
आयुष्यात वादळं ही येणारंच.... आणि आलेली वादळं तुमचं आयुष्य बदलुन टाकणारंच...

पण मोठी मोठी वादळं येताना काय भारी भारी कारणं असतात हो लोकांकडे ! अघोरी अन्याय, जीवघेणी फसवणुक, पराकोटीचे अपयश, सूड, महत्वाकांक्षा अशा मराठी कादंबरीत वाचलेल्या पण सामान्य माणसाला कधीच अनुभवायला न मिळालेल्या गोष्टींनी खुप वादळं येतात म्हणे....
काही काही लोक तर ह्या ही पेक्षा नशीबवान असतात. लग्नाआधि प्रेमभंग, लग्नानंतर अपेक्षाभंग, मग अनपेक्षित चढलेले प्रेमरंग... मग बायकोला कळाल्यानी झालेला रसभंग.... अशी एकदम रोमॅंटीक वादळं पण असतात हं !
आमचं एवढं नशीब कुठलं... प्रेमच नाही त्यामुळे प्रेमभंग नाही तसच अपेक्षा नाही त्यामुळे अपेक्षाभंग नाही. तरी माझ्या आयुष्यात वादळ आलंच.... तुम्हाला वाटेल की एका कपडे धुण्याच्या साबणाची पावडर बनवण्याच्या कंपनीत काम करणा-या माणसाच्या आयुष्यात कसलं आलंय वादळ ??

पण नाही हं ! वादळ आलं.... वादळ आलं एका SMS नी...


मागच्या आठवड्यात रात्री एका नातेवाईकाचा SMS आला... रात्री १०.४२ ला.
अरे काय विक्षिप्त आणि विचित्र असतात लोकं ! १०.४२ ही काय SMS करण्याची वेळ आहे का ? (खरं सांगायचं, तर मला कुठल्याही वेळेच्या बाबतीत असंच वाटतं. खात्यातुन पैसे वजा झाल्याचा SMS मला जेवताना येतो. बीलाची रिमांयडर्स मला झोपताना येतात. निमंत्रणाचे SMS मला तो कार्यक्रम झाल्यानंतर येतात. एकदाच व्हॅलेंटाईन-डे ला एक SMS आला होता. कुणाचा ते कळालं नाही कारण तेंव्हा मोबाईल बायकोच्या हातात होता. आणि तिला 'माझ्याविषयी काहितरी निनावी पत्र आल्यासारखा' तिचा चेहरा झाला होता. मला वाटलं आता मोबाईलच फेकुन मारतीये का काय, पण तो SMS डीलीट करण्यावरच भागलं. तो कुणाचा होता, काय होता हे नाही कळालं, पण त्या कल्पना-विलासात अजुनही माझे काही क्षण खुप छान जातात. .....असो. सुखाची इतकी सवय चांगली नाही !)


मी तो SMS वाचायला लागलो.... "हा SMS घाणघापुरचा...."

मी जाम टरकलो. कारण घाणघापुर म्हणजे भूत, डाकीणी, पिशाच्च, हडळ असे ब्रह्मसंबंध जर मानगुटीवर बसले असतील तर ते उतरवायला लोक इथे जातात, अशी एक ऐकीव माहिती होती.
(अनुभव घ्यावा म्हणुन मी पण एकदा गेलो होतो... बायकोला घेउन. त्या दंतकथेवर विश्वास ठेऊन, जातानाची दोन रीझर्व्हेशन्स आणि येतानाचं मात्र एकच केलं.
कसलं काय हो ! येताना पण 'हि' माझ्या बरोबरंच.. ते ही त्या रीझर्व्ह्ड सीटवर बसुन... मी मात्र आख्खा प्रवास उभ्यानी पायावर, मानगुटीवर आणि मनावर ओझं घेउन केला.
मग पुढे कळालं की हल्लीची भुतंही खुप हुशार झालीत. घाणघापुरच्या वेशीजवळ आली की मानगुटीवरुन उतरुन झाडावर जाउन बसतात. तो बिचारा झपाटलेला, दर्शन घेऊन हलक्या मनानी (आणि मानेनी) घाणघापुरच्या बाहेर आला की झाडावरचं भुत पुन्हा झाडावरुन मानगुटीवर आणि मानगुटीवरुन घरी !! पुढच्या वेळेला हिला घाणघापुरला नेताना आधि तिथली सगळी झाडं पाडण्याची विनंती मी तिथल्या कलेक्टर साहेबांना करणार आहे. असो....)



तर मी पुढचा SMS वाचायला लागलो. "हा SMS घाणघापुरचा प्रसाद आहे.....".

हुश्श ! मला क्षणभर हुश्श झालं. क्षणभरच कारण एक अभद्र विचार माझ्या मनात आला की हल्लीच्या भुतांची नावं आरती, प्रसाद, भक्ती अशी मॉडर्न आणि ऑफ्बीट नसतील ना ?
हो.... नाहीतर येऊन बसायचा मानगुटीवर... घाणघापुरचा प्रसाद ! (अर्थात मला घाबरायचं कारण नाहीये. आमची 'ही' थोडीच बसु देणार आहे त्याला तिथं. मग... तिच्या हक्काचं 'झाड' आहे मी !)


.... मी SMS पुढं वाचायला लागलो. "हा SMS घाणघापुरचा प्रसाद आहे. हा SMS तुम्ही जर पाच लोकांना पाठवला तर तुमची एक सरप्राईज मिळेल. जर दहा लोकांना पाठवला तर तीन सरप्राईजेस आणि पंधरा लोकांना पाठवला तर पाच सरप्राईजेस मिळतील.".


तुम्हाला सांगतो, माझं आयुष्य 'उगाच कशाला' ह्या दोन शब्दांमुळे खुप वाईट गेलं आहे. चांगलं सुखासुखी दिवस चालले होते तर उगाच कशाला एकटं राहयचं म्हणुन लग्न केलं. मग उगाच कशाला वाद म्हणुन बरच काही उगाचाच सहन करतोय. उगाच कशाला रिस्क म्हणुन ऑफीसमध्ये जे पडेल ते काम करतो. आताही उगाच कशाला खर्च म्हणुन सोडुन देणार होतो तर पुढचा SMS वाचला...
"...जर तुम्ही हा पुढे न पाठवता डीलीट केलात तर... तर कोप होऊन लवकरच तुमच्यावर घाणघापुरला यायची वेळ येईल."
'म्हणजे काय' ते मला कळालंच ! मागच्या वेळेला मी घाणघापुरला गेलो होतो तेंव्हा ह्या अशा ' घाणघापुरला यायला लागणा-या लोकांचं ' दर्शन मला झालं होतं. त्या मानगुटीवरच्या कुणी... कुणाला खांबावर चढवलं होतं, कुणी कुणाला लोळवलं होतं, कुणी कुणाला स्वतःचेच कपडे फाडायला, डोकं आपटायला, स्वतःचेच केस ओढायला लावलं होतं. हे सगळ ठीक होतं हो, पण एका विवाहित माणसाला खळखळुन हसताना पाहिलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.
भुत लागल्यानंतर माणुस काय दुर फेकला जातो वस्तुस्थितीपासुन... !!"


...तर उगाच कशाला विषाची परीक्षा... म्हणुन मी SMS करायचं ठरवलं.... आधि पाच लोकांनाच करणार होतो, पण मग नंतर अजुन पाच SMS मध्ये जर दोन जास्तीची सरप्राईजेस मिळणार असतील तर उगाच कशाला संधी घालवा, असं विचार करुन मी त्या रात्री १.४३ वाजता दहा लोकांना SMS केले.

झालं...! त्या SMS मध्ये लिहिलं तसंच झालं. पुढच्या काही दिवसात मला तीन सरप्राईजेस मिळाली आणि माझं आयुष्य बदलुन गेलं. हा घाणघापुरचा SMS इतका पॉवरफुल असेल असं वाटलं नव्हतं....



सरप्राईजसाठी उतावीळ झालेला असा तो मी....सकाळ सकाळी एकदम सज्ज होतो.

पण नेमकी लाईट गेल्यानी गिझरवर पाणी गरम करता आलं नाही. 'त्या' स्वाभिमानी स्त्री नं गॅसवर पाणी गरम करायला ढळढळीत नकार दिला. मग गार पाण्यानी आंघोळ करावी लागली. टॉवेल पण ओलाच मिळाला. बनियन तर सापडेनाच. अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा बायकोनी चुकुन ओटा पुसायला घेतला होता. पण ह्या विषयावर तिच्याशी बोलण्यात काहिच अर्थ नसतो. माग एकदा असं झालं होतं तर म्हणाली होती,
"बनियन कुठला आणि फडकं कुठलं हे कळतच नाही. फडक्याला भोकं नाहीयेत, एवढाच तर फरक आहे."
काय बोलायचं ह्यावर ?
मी काहिही तक्रार न करता आवरुन निघालो तर... बाईक पंक्चर ! रिक्षा मिळेना म्हणुन बस स्टॉपपर्यंत चालत आलो. सगळ्या जगाची गर्दी त्या स्टॉपवर झाली होती. पहिल्या चार गाड्या तर सोडुनच दिल्या, पण असं केलं तर संध्याकाळपर्यंत तिथंच उभं राहायला लागेल म्हणुन दंड थोपटले आणि तयार झालो. त्या सक्तीच्या कुस्तीनंतर कसाबसा आत शिरलो तोपर्यंत माझ्यात बराच बदल झाला होता....
एकदम टरटरुन फुगवलेला फुगा बरीचशी हवा गेल्यानंतर जसा मऊ होतो आणि चुरगाळुन जातो, तसा झालो. सहा महिन्यांपुर्वी गाठोड्यात बांधलेले कपडे घालावेत, असे दिसायला लागले. चष्म्याच्या काड्या, ज्या आधि काचांना काटकोनात होत्या, त्या सरळ रेषेत आल्या. एखाद्या गवताच्या झोपडीचं चक्रीवादळानंतर जे व्हावं, ते केसाचं झालं.
त्यानंतर..."कुठं बसलात ?" असं कंडक्टरनी विचारल्यावर, "बसलोय कुठे ? अजुन उभाच आहे" असं हलकट उत्तर त्याला दिलं. मग त्यानी काहिही कारण न देता मला खाली उतरवुन दिलं. अर्थात पुन्हा दुस-या बसमध्ये बसायची तयारी नव्हती म्हणुन रिक्षाचा भुर्दंड सोसुन ऑफिसला पोहचलो. दरम्यान जे काही सरप्राईज मला मिळायचं होतं ते पावलोपावली मिळालं होतं आणि दुसरं सरप्राईज माझी ऑफीसमध्ये वाट पाहत होतं...



नेहमीप्रमाणे साहेब जरा उशीराच आले. त्यांचे लाल डोळे पाहता कालची जरा जास्त झाली असावी. आल्या आल्या त्यांनी सगळ्या स्टाफला बोलावलं आणि ते म्हणाले...
"आपल्या कंपनीत दिवसरात्र काम करणारे खुप मेहनती लोक आहेत. रात्र रात्र जागुन कंपनीचा विचार करणा-या ह्या माणसांमुळेच आपली कंपनी इथपर्यंत आलीये. अशाच एका गुणी माणसाला मी प्रमोशन द्यायचं ठरवलय. नुसतं प्रमोशनच नाही तर त्याची बदली सगळ्यात कार्यक्षम विभागात केली आहे."
त्या SMS चा परिणाम की साहेबांनी माझं नाव घेतलं... माझं !
माझं कौतुक केल्यानंतर ते माझ्या कानात म्हणाले " ह्या वेळेस तुझी फक्त बदली करतोय 'तक्रार निवारण' विभागात, पण पुढच्या वेळेस जर रात्री १-१.३० ला असा दळभद्री SMS करुन जर झोपमोड केलीस तर घाणघापुरला नविन ब्रांच उघडुन तिथं तुझी बदली करेन."
त्यांचे ते निद्रानाशामुळे झालेले लाल डोळे पाउन मी काळा-निळा पडलो. साहेबांनी... कसला साहेब... त्या नालायक नराधमानी माझी बदली 'तक्रार निवारण' मध्ये केलीच पण तक्रारीसाठी माझा नंबर छापला हो... !


लोकांचे काय वाट्टेल ते फोन येतात. साबणाला झाग येत नाही, साबणाचे डाग जात नाहीत, साबणाला फेस येत नाही हे ऐकुन ऐकुन तर माझ्या तोंडाला फेस आलाय. परवा एका बाईच्या मुलानी थोडी पावडर खाल्ली तर मलाच झापडलं हो तिनी. म्हणाली तुम्ही हर्बल पावडर का काढत नाही ? आता काय कपडे धुण्याची पावडर पण हर्बल काढुन त्यात स्ट्रॉबेरी, मॅंगो, बनाना असे फ्लेवर टाकायचे ? तरी फोन येणार की आमच्या मुलाला ऍप्पल खुप आवडतं, तुम्ही ऍप्पल फ्लेवर का काढत नाही ? एका हिरवे नावाच्या बाईचा फोन आला की आमच्या येल्लो पावडरनी त्यांच्या पिंक ड्रेसला ब्लु डाग पडले. त्या विविध रंगांनी मी इतका गडबडलो की चुकुन त्यांनाच पिंकी म्हणुन हाक मारली. पार धुतलाच त्यांनी मला. समोर असतो तर आमच्याच पावडरनी धुवुन मला रंगवला असता. काही आगाऊ लोक प्रात्याक्षिक द्यायला घरी बोलावतात. आता काय लोकांच्या घरी जाउन कपडे धुवु ?
पुर्वी मला स्वप्नात अप्सरा दिसायच्या आणि त्यात वातावरण निर्मितीसाठी साबणाचे फुगे वैगेरे उडत असायचे. आता खुप भयानक स्वप्न पडतात हो....
सार्वजनीक नळावर मी मध्यभागी बसलोय आणि सगळ्या बायका कोंडाळा करुन...घेराव घालुन उभ्या आहेत आणि आमच्याच पावडर वरुन मला घालुन पाडुन बोलताहेत आणि माझ्या तोंडातुन साबणाचे फुगे बाहेर पडताहेत असं काहीतरी....
ह्या सगळ्याला तो SMS कारणीभुत आहे. मी फक्त पाचच लोकांना तो SMS केला असता तर एकच सरप्राईज मिळालं असतं किंवा कमीत-कमी मी माझ्या साहेबांना तरी हा SMS करायला नाही हवा होता, असं आता वाटाण्यात काहीच अर्थ नव्हता....
मला अजुन एक सरप्राईज येणार होतं आणि मला ती झेलायलाच लागणार होतं....




'.......मी पाटावर उघडाबंब बसलो आहे. पाटापुढे (आमच्याच पावडरनी) रांगोळी काढलेली आहे. बायको पावडरचं उटणं अंगावर लावत आहे. त्या पावडरचं कुंकु कपाळावर ओढत आहे. अक्षता म्हणुन डोक्यावर पावडर....'
हे असलं स्वप्न तुम्हाला पडलं तर तुम्ही पण पिसाळुन जाल. गेल्या दोन सरप्राईज मधेच मी इतका संपलोय की विचारुच नका. त्या येणा-या फोन्समुळे रात्र-रात्र झोप येत नाही. झोप आलीच तर स्वप्नांचा तर कहर झाला आहे. ह्या आत्ता सांगितलेल्या स्वप्नात तर एकच बाई होती पण एखाद्या भयानक भयपटाचा पुढचा भाग जास्तच भयावह असावा अशी स्वप्न पडतात हो...
त्या नळावरच्या बायकांनी मला पाटावर बसवलं आहे. पुन्हा पाटाभोवती पावडरची रांगोळी आहे आणि त्या बायका माझ्याभोवती फेर धरुन भोंडला म्हणताहेत....

"श्रीकांता कमलकांता अस्से कस्से झाले... अस्से कस्से झाले माझ्या नशिबी आले...
वेड्याच्या बायकोनी आणली होती पावडर.. तिकडुन आला वेडा त्यानी डोकाउन पाहिले..
पिठीसाखर म्हणुन त्यानी चाटुन टाकले..."
हे गाणं संपतं-न-संपतं तोच.....

"१ SMS करु बाई २ SMS करु
२ SMS करु बाई ३ SMS करु
३ SMS करु बाई ४ SMS करु
४ SMS करु बाई ५ SMS करु
पाचव्या SMS ला सरप्राईज..."

सरप्राईज हा शब्द आला की एकदम खडबडुन जागा होतो आणि बराच वेळ छाती धडधडत राहते. मग उरलेला वेळ जागुन काढतो.... आता सगळ सहन शक्तीच्या पलिकडे चाललय.

त्या SMS टाकणा-या नातेवाईकाला शोधुन... त्याच्या हातातुन मोबाईल हिसकावुन... त्यावर दणादणा नाचुन तो मोबाईल तोडुन टाकावा आणि त्यातलं सीमकार्ड खलबत्त्यात कुटुन त्या चु-यावर पेट्रोल टाकुन त्याला काडी लावाविशी वाटते हल्ली. कुठे मोबाईल खणखणला की डोकं भणभणतं. मळके कपडे दिसले की खुप धडधडतं. कुठेही वाळत टाकलेले जरी कपडे दिसले की आग लावाविशी वाटते.


...........हे सगळं मी एकदा बायकोला सांगितलं. तिनी क्षणाचाही विलंब न लावता कुठल्या तरी स्पेशालिस्ट ची अपॉईंट्मेंट घेतली. बाहेरगावचा कुणीतरी नावाजलेला स्पेशालिस्ट असावा कारण त्याच्याकडे आम्ही चक्क ST मधुन चाललो होते. त्या गाडीतुन खाली उतरल्यावर पाहतो तर काय..... तिसरं सरप्राईज....

घाणघापुर.... !!
जातानाचं तिच्या एकटीचंच रिझर्व्हेशन होतं आणि इथली झाडं पण कुणीतरी तोडली आहेत. त्यामुळे सध्या इथेच असतो.


तुम्हाला म्हणुन सांगतो....
इथे आणले गेलेले ८०% लोक हे १५ SMS केलेले आणि उरलेले २०% माझ्यासारखे १० SMS केलेले आहेत. पण एकही माणुस असा नव्हता की ज्यानं तो SMS डीलीट केलाय. त्यामुळे कधिही जर तुम्हाला असा काही SMS आला तर...
एक- तो SMS लगेच डीलीट करा आणि दोन- त्या SMS पाठवणा-या माणसाला शोधुन त्याचा निःपात करा. आणि जर तुम्हाला माझं न ऐकता तो SMS पुढं पाठवायचा असेल तर...

तर... घाणघापुरमध्ये तुमचं स्वागत आहे !!


धुंद रवी.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,511
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
Re: घाणघापुरचा SMS
« Reply #1 on: December 28, 2009, 08:37:11 PM »
yet another AWESOME article on MK.  Thanks a lot for posting. I will post link of this article to MK Google group members.

ha prakar mail mahdye pan hoto....ase barech mails yetat 'forward this mail to 10 persons else......'   :D  :)
« Last Edit: December 28, 2009, 08:38:06 PM by talktoanil »

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
Re: घाणघापुरचा SMS
« Reply #2 on: December 28, 2009, 11:26:06 PM »
 ;)  :D अस माज्या बरोबर जाहला आहे  :) तुमची लेखनी उत्तम आहे
« Last Edit: December 28, 2009, 11:26:49 PM by shardul »

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: घाणघापुरचा SMS
« Reply #3 on: December 29, 2009, 02:02:01 PM »
Apratim  :) ............ ha tumacha lekh ahe ........ mala email madhye hi ala hota ....... khup khup chhan ahe ........... vachatana hasun hasun pot dukhayala lagal hota maza  :D :D :D .......... tumchya saglya kavita hi chhan ahet ........ keep writing and keep posting :)

Offline Mayoor

  • Jr. Member
  • **
  • Posts: 126
  • Gender: Male
Re: घाणघापुरचा SMS
« Reply #4 on: December 29, 2009, 02:28:37 PM »
Lai bhaari hay Raav... :D :D :D

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: घाणघापुरचा SMS
« Reply #5 on: December 31, 2009, 12:59:48 PM »
Khupacha chan lekh aahe.......... Thanks for sharing

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):