Author Topic: आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रे सारख्या महर्षींचा वाटा फार मोठा आहे.  (Read 818 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
इतिहास संशोधन आणि इतिहास लेखन या क्षेत्रांमध्ये ज्यांनी अनन्यसाधारण काम केले अशा दिग्गजांच्या  यादीतील एक क्रियाशील व्यक्ती म्हणजे वासुदेव सीताराम बेंद्रे होत. बेन्द्रे यांच्या नावाचा विशेष गवगवा झाला नाही याची अनेक कारणे संभवत असली तरीही त्यांची स्वतःची प्रसिद्धी पराङमुखता आणि वितंड वाद टाळण्याची वृत्ती या गोष्टीही त्याला कारणीभूत होत्या यात संशय नाही .
आपल्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी प्रचंड संशोधन केले आणि विपुल लिखाणही,पन्नासावर ग्रंथाची निर्मिती करण्याचे विलक्षण कार्य त्यांनी केले.संत वांङमय ,शिवशाही ,संभाजी महाराज यांसारख्या विषया पासून शीघ्र लिपी सारखे विषयही त्यांनी हाताळले.अव्वल इंग्रजी अंमल ,भारतीय राष्ट्रीय आंदोलन ,स्वातंत्र्य प्राप्ती , स्वातंत्र्योत्तर  समाजवादी भारत ,अशा भारतीय इतिहासाच्या विविध टप्प्यांचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. या प्रत्येक अनुभवाच्या संदर्भात त्यांची मनोभूमिका तयार झाली होती.या मनोभूमिकेचे पडसाद त्यांच्या इतिहासलेखनात उमटलेले स्पष्ट दिसतात.
महाराष्ट्रातील इतिहास लेखनाची वाटचाल हि नेहेमीच द्वंद्वात्मकतेतून विकसित होत गेलेली आहे. ज्याला आज आपण इतिहास म्हणतो ह्या प्रकारच्या इतिहासाचे लेखन इंग्र्जीपूर्व काळात नव्हतेच.कदाचित आपली इतिहास विषयक कल्पना आजच्या कल्पनेपेक्षा वेगळी होती हे त्याचे कारण असेल.काहीही असले तरी इंग्रजी अमलापूर्वी महराष्ट्राच्या इतिहासाचे कालानुक्रमाने संघटन करण्याचे काम कोणी पंडिताने हाती घेतल्याचे माहीत नाही.
१९व्या शतकाच्या पूर्वार्धात ग्रांट डफने केला तो मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा पहिला प्रयत्न. त्यानंतर डफच्या अनुषंगाने मराठ्यांच्या इतिहासाचे लेखन सुरु झाले.डफच्या चुका, मराठ्यांच्या इतिहासाचे त्याने लावलेले अन्वयार्थ ,त्याने आधारभूत मानलेले कागदपत्र इत्यादी संदर्भात साधकबाधक चर्चा एका वैचारिक आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. इतिहासाविषयी एक प्रचंड आस्था महराष्ट्रातील विद्वानांमध्येच नव्हे, तर सर्वसामान्य व्यक्तीतही निर्माण झाली .
तेव्हांपासून 'इतिहास' हा मराठी मानसिकतेचा एक अविभाज्य घटक झाला. न्या.तेलंग आणि न्या.रानडे यांनी या मानसिकतेला एक व्यापक असे सांस्कृतिक परिमाण प्राप्त करून दिले. त्याचबरोबर वासुदेवशास्त्री खरे,वि.का.राजवाडे प्रभूतींनी मराठ्यांच्या इतिहासाची अस्सल साधने गोळा करण्यास सुरुवात केली. अस्सल कागदपत्रांच्या पुराव्या अभावी मराठ्यांचा इतिहास ही एक केवळ सांगोपांगी गोष्ट आहे,अशी निर्माण झालेली भावना दूर करण्याचा तो एक प्रयत्न होता.

काव्येतिहास-संग्रहासारख्या मासिकातून ही कागदपत्रे प्रसिद्ध केली जातात.त्यामुळे कागदपत्रांचे महत्व सर्वसामान्य मराठी शिक्षितावर चांगलेच बिंबले . या कागदपत्रांची व्याप्ती पाहिली की  ' मराठ्यांचे राज्य हा एक अपघात होता ' या वसाहतवादी दृष्टीकोनाचा कोतेपणा आणि खोटेपणा लक्ष्यात येण्यासारखा होता!

परंतु या कागदपत्रांचा उपयोग कसा करावा ,त्यांची मीमांसा कशी करावी, त्यांचा अन्वयार्थ कसा लावावा याविषयी सर्वसामान्य वाचक आणि इतिहासाचे अभ्यासक अनभिज्ञ होते.त्यामुळे त्यांच्या मराठी इतिहासाला भावनेपेक्षा वेगळे असे शास्त्रीय परिमाण आणि चिकित्सक बैठक नव्हती.ती बैठक निर्माण करण्याचे महत्वाचे  आणि मूलगामी  कार्य वासुदेव सिताराम बेंद्रे यांनी केले. दहा वर्षाच्या अव्याहत अभ्यासानंतर १९२८ साली त्यांनी लिहिलेला 'साधन-चिकित्सा ' हा ग्रंथ इतिहाससंशोधन आणि अभ्यास यांना वैज्ञांनिक बैठक देणारा पहिला ग्रंथ ठरला.आजच्या अनेक मराठी इतिहासकारांची इतिहासविषयक भूमिका तयार करण्यास या ग्रंथाने मोठा हातभार लावला यात शंका नाही.
वसाहतवादी प्रशासक आणि अभ्यासक यांना मराठ्यांच्या इतिहासाची दखल घ्यावीच लागली , यातच मराठ्यांच्या इतिहासाचे महत्व स्पष्ट झाले होते.मात्र हे लिखाण करताना या इतिहास-अभ्यासकांनी वापरलेले निकष अनेक वेळा अभारतीय आणि पूर्वग्रहदुषित होते.दुर्दैवाची गोष्ट अशी की या निकषांवर आधारित निष्कर्ष भारतीय अभ्यासकांनीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या स्वीकारले.  'आधुनिकते ' च्या संकल्पनेचा तो एक परिणाम होता.त्यामुळे मराठी इतिहासकारांची भूमिका खूपदा बचावात्मक राहिली .
संभाजी महाराज हे याचे एक लक्षणीय उदाहरण . संभाजी दुराचारणी ,दुष्ट, व्यसनाधीन वगैरे होता ही संभाजीमहाराजांची प्रतिमा लोकमानसांत दृढ करण्यास इंग्रज इतिहासकार जितके जवाबदार होते त्या पेक्षा कितीतरी पटींनी भारतीय आणि मराठी इतिहासकार जवाबदार होते ! मराठ्यांच्या इतिहासाची आणखी एक शोकांतिका म्हणजे विसाव्या शतकाच्या पहिल्या तीस-वर्षांत महाराष्ट्रात माजलेला ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद .ह्या वादाने रणक्षेत्र इतिहास हे ठरले .त्यामुळे रामदासांचे कर्तुत्व ,व संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व या गोष्टी वादग्रस्त झाल्या . मराठा  एक शिवाजी सोडला तर कोणी लायक उमेदवार ब्राह्मणी इतिहासकारांना सापडेना .आपल्या खोट्या आणि आक्रस्ताळी जात्यभिमानाने आपण मराठी संस्कृतीचे किती नुकसान करतो आहोत याचे भान सर्वांचेच सुटले.
अश्या परिस्थितीत वा.सी.बेन्द्र्यांचे संभाजी चरित्र वादग्रस्त ठरले नसते तरच नवल. मराठ्यांच्या दुसर्या छत्रपतीचे मूल्यमापन अमूर्त आणि संकल्पनामक मूल्यांच्या अनुषंगाने न करता ऐतिहासिक वास्तवाच्या संदर्भात करण्याची जवाबदारी यांनी स्वीकारली आणि समर्थपणे पेलली.

मराठी मानसिकतेची खरी ओळख व्हायची असेल तर घटनाबद्ध इतिहासाबरोबरच सांस्कृतिक व भावनिक प्रवाहांचाही अभ्यास हवा. मराठ्यांचा इतिहास हा एकाएकी पेटणारा वणवा नाही, तर त्याला खोलवर पाळेमुळे  आहेत आणि या पाळामुळांची ओळख भक्तीसंप्रदायाच्या अभ्यासकांनाच होईल, हा न्यायमूर्ती रानड्यांचा अभ्यासपूर्ण संदेश वासुदेवराव बेंद्रे यांनाही कळतनकळत प्रभावित करून गेला असावा . तुकाराम महाराजांचा  त्यांचा अभ्यास हा केवळ भावनिकतेचा भाग नव्हता , तर मराठी संस्कृतीच्या जडणघडणीच्या प्रक्रियेचा तो अभ्यास होता .
सामान्य मध्यमवर्गीय माणूस जिद्दी पोटी काय करू शकतो याचे वा.सी.बेंद्रे हे एक चालते बोलते प्रतिक होते .१८९६ ते १९८६ अशी नव्वद वर्षांची त्यांच्या आयुष्याची वाटचाल . सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय माणसाला भारभूत व्हावी अशी ही आयुर्मर्यादा . पण बेंद्रे ह्यांना हे आयुष्य सुद्धा कमीच ठरले . १९७२ मध्ये त्यांनी शिवचरित्र प्रकाशित करून आपली जीवनावरील निष्ठा आणि प्रवृत्ती-अभिमुखता सिद्ध केली . आपल्या कामावर इतकी निष्ठा असणारा विद्वान विरळाच . आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रे सारख्या महर्षींचा वाटा फार मोठा आहे.

प्रा.अरविंद देशपांडे
पुणे विद्यापीठ