Author Topic: शिक्षक व्हायच तर ...............  (Read 1493 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
शिक्षक व्हायच तर ...............
« on: December 28, 2012, 04:17:04 PM »

जी व्यवस्था मूल्याच्या मुडद्यावरच उभी राहत असेल आणि मूल्यांच्या मृत्यूबद्दल कधीही शाळेला सुटी देत नसेल, शोकसभा घेत नसेल, तिथं मूल्यांची पेरणी कोण करणार? पीक कोण घेणार? आणि मूल्यांची बेणी वाढली की नाही, हे कोण तपासणार? बोंबच आहे सगळी!


"गजाआडच्या कविता' या काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीची तयारी करतो आहे. खून करून जन्मठेप भोगणाऱ्या कैद्यांच्या कविता पुन्हा गोळा केल्या. एक कविता मोठी विलक्षण आलीय. विदर्भात एका बी. एड. पदवीधारक विद्यार्थ्यानं शेतजमीन विकून एका संस्थाचालकाला डोनेशन म्हणून भलीमोठी रक्कम दिली. लाचेऐवजी आता "डोनेशन' हा अतिशय सुंदर शब्द पुढं आला आहे. सबब, डोनेशन देणं किंवा घेणं याविषयी आता कुणी चर्चा करत नाही. "मै अण्णा हूँ', "मै केजरीवाल हूँ' म्हणणारेही चर्चा करत नाहीत. "डोनेशन' आता पवित्र, कायदेशीर, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी, सर्वसंमतीचा शब्द झालाय. त्याचं संस्कृतीत रूपांतर झालंय. ...तर मी विदर्भातल्या तरुणाचं बोलत होतो. नाव मुद्दाम लिहीत नाहीय, कारण "डोनेशन'चा बाजार केजी टू पीजीपर्यंत सर्वत्रच सुरू आहे. कवितेत म्हटलं आहे ते असं ः या तरुणानं संस्थापकाला डोनेशन दिलं. पाच वर्षांनी शाळा अनुदानित झाली, की तुला नोकरी देईन, असं आश्‍वासन संस्थापकानं दिलं. दोघांमध्ये अलिखित करार झाला. तरुण शिक्षक झाला. पाच वर्षं त्यानं बिनपगाराची नोकरी केली. कधीतरी शाळा अनुदानित होईल आणि आपला पांग फिटंल, असं स्वप्न बाळगलं. ते जिवंत ठेवलं. कधी कधी माणसाऐवजी स्वप्नं जिवंत ठेवावी लागतात. त्यानंही बहुतेक असंच केलं. शाळा अनुदानित झाली आणि संस्थापकानं अधिक डोनेशन घेऊन दुसऱ्यालाच नोकरी दिली. हा तरुण कोसळला. लाख विनंत्या करूनही त्याला नोकरी मिळाली नाही. मग यानं डोनेशन परत मागायला सुरवात केली. अध्यक्षानं पुरावा मागितला. आता पुरावा कुठून द्यायचा? तो काही या तरुणाकडं नव्हता. पुरावा नसल्यानं संस्थापक जिंकला; तरुण हरला. डोनेशन परत न घेताच रिकाम्या हातानं तो बाहेर पडला. संतप्त झाला. त्यानं एक दिवस संस्थापकाचा मर्डरच केला. तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. त्याला जन्मठेप झाली.


ही सारी घटना कवितेत कुठं कुठं तरी झिरपताना दिसते. कधी कधी कविता वास्तवापेक्षा अधिक सत्य वाटते. आरशाच्या मागं पारा नसला, की आपलं प्रतिबिंब दिसण्याचं बंद होतं. कवितेचं मात्र तसं नाही. पारा असो वा नसो ती प्रतिबिंब दाखवत राहते किंवा तिनं ते दाखवायला हवं असं म्हणतात.


कवितेतली घटना वाचून अस्वस्थ झालो होतो. अनेकांशी चर्चा केली. प्रत्येक जण म्हणाला ः "सगळीकडं असंच चाललंय. डोनेशनशिवाय नोकरीच मिळत नाही.' नोकरीसाठी, जगण्यासाठी असहाय्य होणारे तरुण व्यवस्था तशीच ठेवून डोनेशनचा मार्ग पत्करतात. व्यवस्था बदलता येत नाही, असं अनेकांनी एकतर्फीच जाहीर करून टाकलंय. मध्यंतरी एक तरुण असाच भेटला होता. शिक्षकाची नोकरी त्यानं सोडून दिली होती. कारण मोठं मजेशीर होतं. त्याच्या संस्थापकानं नोकरीत कायम करण्यासाठी त्याच्याकडं डोनेशन नाही मागितलं. मोठी विचित्र अट घातली. "आपल्या बहिणीच्या काळ्याकुट्ट, ढोबळ्या आणि मतिमंद मुलीशी लग्न कर; तुला नोकरीत कायम करतो, विदाऊट डोनेशन,' अशी ती अट होती. या मुलानं ती नाकारली. राजीनामा दिला आणि पडला बाहेर. त्याच्यासमोर अंधार होता. बेइमानी करणाऱ्या उजेडाऐवजी त्यानं सच्चा अंधार स्वीकारला होता. आता भविष्यात तो काय करणार होता, हे त्या अंधारालाच ठाऊक!


शिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय, ताज्या धारेच्या दारूप्रमाणं ताजा पैसा देणारा व्यवसाय, असाच समज अनेकांचा झाला असल्यानं संस्थापकांची भूक वाढतच आहे. डोनेशनच्या पलीकडं जाऊन काय आणि कसं करता येईल, याचा विचारही रोज होतोय; पण हा सगळा मामला बंद दरवाजातला असल्यानं कुणी कुणाविरुद्ध "ब्र' काढत नाहीत. मिटवून घेण्याचा, ऍडजस्ट करण्याचा, कॉम्प्रमाईज्‌ करण्याचा हा मामला आहे. कोल्हापुरातल्या एका कॉलेजनं तर एक भन्नाट शक्कल काढली. त्यांच्याकडं एक पूर्ण पगारी जागा डोनेशन घेऊन भरायची होती. कॉलेजनं सहा महिने अगोदरच काही उमेदवारांकडून अनामत म्हणून प्रत्येकी दोन-पाच लाख रुपये जमा केले. मुलाखतीनंतर ज्याची निवड होईल, त्याचेच पैसे घेतले जातील आणि इतरांचे परत केले जातील, असा अलिखित करार झाला. याचा अर्थ 40-50 लाख रुपये बिनव्याजी वापरले जाणार होते. दुसरीकडं संभाव्य नोकरीसाठी व्याजानं पैसे काढून अनामत ठेवणारेही होते. बाजार यापेक्षा वेगळा काय असतो? आपल्या शिक्षणाचं असं काहीतरी होईल, याचा अंदाज "विद्येविना मती गेली', असं सांगणाऱ्या महात्मा फुले यांना आला नसणार!


शिक्षणक्षेत्रात प्रवेश आणि नोकरी, बढती, बदली याबाबत अशा अनेक कुकथांचा जन्म होतोय. फरक एवढाच, की त्यावर कथा, कविता लिहिण्याचंही बंद झालंय. "यही है जिंदगी', असं म्हणत साऱ्या अनिष्ट प्रथांना स्वीकारायचं कसं, याचाच विचार होतोय; नाकारण्याचा विचार होत नाही. पुरुष डोनेशन देतो; पण काही महिलांना डोनेशनबरोबर सर्वस्व दान करावं लागतं. एकीकडं शिक्षणाचा हक्क राबवण्यासाठी खिचडीपासून सायकलच्या चाकात हवा भरेपर्यंत सर्व काही देण्याची घाई आणि दुसरीकडं जे येतं आहे, ते घेण्यासाठी डोनेशन भरण्याची घाई, असा हा प्रकार आहे. अशा या बाजारात कोण, काय आणि कसं शिकवत असंल आणि कुणाला काय मिळत असंल, याचा विचारच न केलेला बरा. मध्यंतरी सरकारनं एक आदेश काढून मूल्यशिक्षणाचा जादा तास घ्या, असं सांगितलं होतं. मूल्य समजून अनेक जण "चांदोबा'तल्या जादूच्या गोष्टी सांगू लागले. मग कुणी मूल्यं कशी शिकवायची याचं गाइड काढलं. मग कार्यशाळा होऊ लागल्या. मूल्यावरच्या कार्यशाळेत हजर न राहणाऱ्या शिक्षकालाही डोनेशन घेऊन हजर राहिल्याचं प्रमाणपत्र दिलं जाऊ लागलं. मूल्य म्हणजे एक सोंग, घोकंपट्टी, नाटक आणि सुंदर चीटिंग, असं समजू लागलो आपण. जी व्यवस्था मूल्याच्या मुडद्यावरच उभी राहत असंल आणि मूल्यांच्या मृत्यूबद्दल कधीही शाळंला सुटी देत नसंल, शोकसभा घेत नसंल तिथं मूल्यांची पेरणी कोण करणार? पीक कोण घेणार? आणि मूल्यांची बेणी वाढली की नाही, कोण तपासणार? बोंबच आहे सगळी!


त्या तरुणाची कविता मला खूप अस्वस्थ करतेय. पायाखालची जमीन दुभंगल्यासारखं वाटतंय. समाज किती असहाय्य होतो आणि पिळवणूक करणारी व्यवस्था किती मुजोर होतेय, याची कल्पना यायला लागतेय. हे सारं शिक्षणक्षेत्रात घडू लागलंय याचंही खूप वाईट वाटतंय... पगार घेऊनही न शिकवणाऱ्या, पाचवीत जाऊनही जोडाक्षरं न लिहिणाऱ्या आणि थोरा-मोठ्यांची नावं घेत शिक्षणक्षेत्र ओलीस धरणाऱ्यांशी संवाद कसा आणि किती करायचा...? मी पुनःपुन्हा त्या तरुणाची कविता वाचतोय...त्याचं समर्थन करता येत नाही. कारण, त्यानं खून केलाय आणि त्याची कविता बाजूला ठेवता येत नाही. कारण वास्तव बनून ती चाल करून येते...एक केमिकल लोचा... एक न सुटणारं कोडं...


 Source: Unknown


Marathi Kavita : मराठी कविता