Author Topic: रामलला  (Read 1643 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
रामलला
« on: November 14, 2013, 10:52:03 PM »

“ए आज्जी मी आलो !”
           मोठ्याने आरोळी ठोकत मी माजघर ओलांडून देवघराकडे धाव घेई .आजी तिथे नक्की असणार हे माहित होते.हातातील वही व पोथी बाजूला ठेवून आजी प्रेमाने माझे स्वागत करीत असे .”सुनील किती वाळलास रे ” ,म्हणून गालावरून हात फिरवे आणि स्वत:च्या कानशिलावर बोट मोडत असे .मामाकडून आजोळहून घरी आल्यावर हा नेहमीच पहिला सीन असे .मग सुटीतील दोन महिण्याच्या गैरहजरीचा मोबदला सव्याज मिळत असे .
            घरातील कामात आईला मदत केल्यावर आजीचा बहुतेक मुक्काम देवघरात असे .दिवाबत्ती, देवपूजा सारा जिम्मा तिच्याकडे असे . संध्याकाळी ती  देवळात जायची  ,तिथेच जुन्या मैत्रिणी बरोबर बोलायची तेवढे सोडले कि मग बाकी ना कुणाच्या अध्यातमध्यात वा गप्पा टप्पात. तिला त्याची मुळीच आवड नव्हती .पण उपासतापासाचे मात्र तिला वेड होते .त्यामुळे तिच्याकडे एक उपासाचे लाडू व सुक्या मेवा ठेवायचा डब्बा नेहमी असे .तिला तो खातांना मी कधीच पहिला नव्हता परंतु आमचा मात्र त्यावर केव्हाही हक्क असे . शाळा, खेळ, अभ्यास या साऱ्यातून आजी साठी वेळ मुद्दाम काढावा लागायचा नाही .ती या साऱ्यात अंतर्भूत असायची.खरतर माझे पानही तिच्या शिवाय हलत नसे .
आजीला दोन सवयी होत्या ते म्हणजे साध पान खायची अन वहीत राम राम लिहित बसायची पानाचा तो वेगळा गंध नेहमी तिच्या कपड्याला येत असे .मी त्या लिहिण्या वरून तिला नेहमी चिडवत असे,म्हणायचो “अगं आजी, असे राम राम लिहून का कुठे राम मिळतो ? तू उगाच शाई आणि वह्या वाया घालवतेस बघ “. आजी माझ्याकडे बघून गोड हसे आणि मला डब्यातला एक लाडू वा सुकामेवा  देत असे .तिच्या गोड हसण्यामुळे अन लाडूच्या प्रसादाने चर्चा वाढत नसे .मला नेहमी वाटे आजीला समजावून  सांगायला पाहिजे .असे राम राम लिहून बोट व पाठ दुखून का घेतेस .पण ते सांगणे या एका वाक्याच्या पुढे कधी गेलेच नाही 
           पुढे आम्ही शहरात आलो .आजी मात्र गावी तिकडेच राहिली .सुटीत भेटी गाठी होत असत  .प्रेमाचे उधान येत असे .हळू हळू थकलेली आजी कालप्रवाहात विरघळून गेली .तिचे जाणे हृदयात मोठी पोकळी निर्माण करून गेले .पण ती जाणार हे तिला, आम्हा सर्वांना माहित होते .तिच्या जाण्यात आजारपण नव्हते ,दु:ख नव्हते ,वेदना नव्हत्या पान  गळून पडावे तशी आजी गेली .
गावातील घर बंद झाले ,येणे जाणे हि कमी झाले .बऱ्याच वर्षांनी एकदा गावी गेलो .सात बाराचे जुने उतारे आणायला ,रहिवासाचा दाखला काढणे आणि इतर काही अत्यावश्यक कामा करता .घर साफ करून घेतले .जुन्या आठवणीत मन बुडून गेले .
           जुन्या लोखंडी पेटीत पेपर शोधत होतो ,अचानक आजीच्या त्या रामनामाच्या वह्या सापडल्या .एका ओळीत लिहलेल्या काहीही खाडाखोड नसलेल्या .स्पष्ट रेखीव सुंदर जणू एकेक अक्षर कोरून काढलेल्या .माझ्या डोळ्यात पाणी आले .आजीच्या आठवणी फेर धरून नाचू लागल्या .ते माझे बोलणे आठवले  “आजी कश्याला उगाच सदानकदा लिहित असतेस हे”.त्यावर आजीचे हसणे जणू कालचीच गोष्ट वाटू लागली .प्रेमाने हृदयाशी धरलेल्या त्या वह्या मी पुन्हा उघडून पाहू लागलो .त्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर संकल्प होता सुनीलच्या आरोग्य, जय, लाभ, यश, कीर्तीसाठी .माझ्या गळ्यात हुंदका दाटून आला ,आणि डोळ्यातून पुन्हा अश्रू धारा वाहू लागल्या .
             त्या रात्री या घटनेमुळे असेल कदाचित ,मला एक स्वप्न पडले .त्या देवघरात आजी बसली आहे.राम नाम लिहित .आणि मी नेहमी सारखा तिथे धावत जातो आज्जी म्हणून ओरडत आणि तिच्या मांडीवर डोके ठेवतो .आणि मला जाणवले अरे हे तर मी बघतो आहे अचानक मला मी ते दृश बघणारा वेगळा अशी जाणीव होवू लागली .आता आजीच्या मांडीवर मी नव्हतो .एक गोरापान अतिशय सुंदर मुलगा तिथे लोळत होता आणि आजी त्याला लिहिता लिहिता थोपटत होती .मला राग आला माझ्या जागेवर आणखी कुणीतरी झोपलाय आणि आजीला कळत कसे नाही .मी जोराने ओरडून सांगायचे ठरवले पण माझा आवाज मलाच एकू येईना .मला काही सुचेना .त्या मुलाकडे तो कोण आहे या बद्दल ची उत्सुकता ,त्याचा राग, हेवा अश्या भावनांनी मन भरले होते .तोच त्या मुलाचे माझ्याकडे लक्ष्य गेले .तो तसाच लोळत माझ्याकडे बघत हसला आणि कुणी तरी कानात बोलले “रामलला” !!  मी दचकून उठलो .अंगावर रोमांच उभे राहिले ,डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला.आजीच्या साध्या पानाचा दरवळ सभोवताली दाटून राहिला होता .

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:35:06 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):