Author Topic: भारताच्या परदेशी अभ्यासकांची परंपरा  (Read 2157 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
परदेशी अभ्यासक आपल्या देशाचा अभ्यास करतात व त्यात तज्ज्ञ होतात, एवढे तज्ज्ञ की आपल्या देशातील अभ्यासकही त्यांचे ऋण मान्य करतात तेव्हा त्यांच्याविषयी आदरयुक्त कौतुक वाटते. अशा संशोधनासाठी अभ्यासकाला एका परकीय समाजाला स्वत:चे मानून, आत्मीयतेने त्या समाजाला समजून घ्यावे लागते. त्याची संस्कृती, इतिहास, राजकारण इत्यादींचे धागेदोरे उलगडून पहावे लागतात. भारताचा अभ्यास करणाऱ्या अशा अनेक परदेशी विद्वानांची मोठी परंपरा आहे व त्यातील एक विदुषी म्हणजे एलेनॉर झिलियट. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ त्यांच्या विद्यार्थ्यांना जसा झाला तसाच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर अभ्यासकांनाही झाला. मॉस्कोच्या विदुषी इरिना ग्लुश्कोवा त्यांच्याविषयी म्हणतात की, ‘‘दमनाचे विविध प्रकार असतात. त्यापैकी काही वैचारिक विश्लेषणामुळे लक्षात येतात तर काही हृदयात उठणाऱ्या वेदनेमुळे! ‘बाई’ या दोन्हीत पारंगत आहेत.’ अ‍ॅन फेल्डहाऊस यांना एकदा इरिना म्हणाल्या की, ‘म्हातारं झाल्यावर आपलं काय होणार?’ त्यावर फेल्डहाऊस म्हणाल्या की, ‘आपण  एलिनॉरसारखे होऊ.’ इरिनांना वाटले, ‘आपल्याला हे शक्य आहे?’

  खरे तर सगळ्यांनाच हे शक्य व्हावे, कारण एलिनॉरच्या कामापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे विद्यार्थी व सुहृद यांनी ‘क्लेमिंग पॉवर फ्रॉम बिलो’ या पुस्तकाची सिद्धता केली आहे. त्यांचा अभ्यासाचा विषय म्हणजे दलित समाज, डॉ. आंबेडकर व त्यांचे प्रश्न म्हणूनच या पुस्तकाचा विषयही ‘दलित व भारताच्या बहुजनसमाजाचे प्रश्न’ हाच त्यांच्या विद्यार्थ्यांनी/ चाहत्यांनी घेतला आहे.
यात अनेक देशी-परदेशी विद्वानांनी लिहिले आहे व विषयांचेही वैविध्य आहे. डॉ. मणी कामरेकरांच्या वसाहतकालीन शेतकरी दमनाचा प्रश्न जसा आहे, तसाच १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात कारागिरांना धंदेशिक्षण देण्याच्या प्रयत्नांचा धांडोळा आबगेल मॅकगोबन यांनी घेतला आहे. ओबीसी मुसलमानांवर राजेन्द्र वोरा यांचा लेख आहे तर यास्मिन सैकिया यांचा १९७१च्या लोकइतिहासावरचा लेख आहे. ऊर्मिला पवार यांच्या कथांवर व नामदेव ढसाळ यांच्या कवितेवर लेख आहेत. अशा प्रकारच्या पुस्तकांचे हे एक वैशिष्टय़ असते, तशीच त्याची ही मर्यादाही असते. म्हणजे एकाच वेळी उत्तर प्रदेश व हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये काय चालले आहे याची माहिती मिळते. उदा. दिल्लीत दलित लेखक संघ आहे व हिंदीतील दलित लेखक काय लिहीत आहेत याची माहिती लॉरा ब्रुक यांच्या लेखावरून मिळाली. कुतूहल जागृत झाले, परंतु माहिती फारच त्रोटक मिळाली. अर्थात भारताच्या संदर्भात समग्र दलित समाजाचे चित्र आजही डोळ्यासमोर उभे राहणे अवघड आहे, कारण प्रांताप्रांतात जाणीव-जागृतीचे प्रमाणही कमी-जास्त, अधिक-उणे आहे. त्यामुळे शिक्षणाचा स्तर व जीवनमान यात फरक पडणे साहजिक आहे. शिवाय बौद्ध धर्म स्वीकारणे वा न स्वीकारणे यामुळेही हा फरक पडणार; परंतु तो वेगळा विषय आहे.

अनुपमा राव यांचे ‘दलित कोण’ या विषयावरील लेखन मराठी दलित साहित्यावरच आधारित असल्याने त्याचे संदर्भ चट्चट् लक्षात येतात; परंतु माहिती नवीन वाटत नाही. रामनारायण रावत यांचा यू.पी.तील चमार (चांभार) समाजावरचा लेख, १९४० पासून त्या समाजाची आंबेडकरांशी जुळलेली नाळ अधोरेखित करतो, बसपा तेच राजकारण पुढे नेत आहे असेही तो म्हणतो; परंतु अनेक प्रश्न उभे करतो. चाळीसच्या दशकात पूर्वास्पृश्य समाजाने डॉ. आंबेडकरांना आपला नेता मानले व आजही देशभरातले बहुतेक दलित समाज डॉ. आंबेडकरांना आपला नेता मानतात; परंतु हे समाज महार समाजाबरोबर बौद्ध झाले नाहीत. इथे बौद्ध होणे हे फक्त प्रतीकात्मक नाही तर हिंदू धर्माच्या भेदाभेदांच्या, पुनर्जन्माच्या राजकारणापासून मुक्त होणे अभिप्रेत आहे.

शैलजा पाईक व यास्मिन सैकिया यांचे अनुक्रमे दलित स्त्रियांची शाळा व १९७१चे अनुभव हे दोन्ही लेख मौखिक इतिहास या वर्गात मोडतील. पैसा व इच्छाशक्ती या व्यतिरिक्त इतर अनेक बंधने स्त्री-शिक्षण मागे पडण्यास कारणीभूत असतात हेच खरे. यास्मिन सैकिया १९७१च्या बळींना भेटली, तिने भारतीय तसेच पाकिस्तानी दस्तावेजांचा अभ्यास केला व एक वेगळेच चित्र उभे केले. ऊर्मिला पवार व नामदेव ढसाळ यांच्यावरील लेख काही ठिकाणी ऊर्मिलाच्या तिखट शेऱ्यांमुळे व नामदेवच्या आयुष्यामुळे आपल्याला अंतर्मुख करतात परंतु मराठी माणसाला कदाचित ते सर्व माहीत असण्याची शक्यता जास्त.

विजय प्रशाद यांचा ‘रेस ऑनर..’ हा लेख. गोऱ्या युरोपीय  माणसाला श्रेष्ठ ठरवण्याच्या हेतूने, इतर देशांना व माणसांना गुलाम बनवण्याला नैतिक अधिष्ठान मिळावे या हेतूने, खरा उद्देश दडवून ठेवून, अनेक वैज्ञानिक संशोधनांचा आभास निर्माण करण्यात आला व स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्यात आले. अनेक दस्तावेजांच्या आधारे विजय प्रशाद हे दाखवून देतात की, जातींचे बंध घट्ट करण्यासाठी व दलित जातींना भूमिहीन करण्यासाठी या तत्त्वज्ञानाचा वापर ब्रिटिशांनी केला व दलितांना फक्त काबाडकष्ट करण्याचा पर्याय ठेवण्यात आला. बबी सहोना यांचा ‘पॅराडॉक्सेस ऑफ दलित कल्चरल पॉलिटिक्स’ या लेखाची सुरुवातच नकारात्मक प्रक्षोभ व्यक्त करते. दलित संस्कृतीतील विरोधाभास त्यांनी सोदाहरणे व्यक्त केला आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्यानंतरच जातींचे राजकीयीकरण अधिक झाले; दलित आपल्या ‘बळी’ या ओळखीला जरा जास्तच चिकटून आहेत व ‘स्टेट’ जे अधिकृतपणे जाती-पातींच्या विरोधात आहे ते बहुतेक वेळा आपल्या विकासासाठी जाती-जातींच्या अलगपणावर अधिकाधिक अवलंबून आहे. या अंतर्विरोधामुळे ‘स्टेट’चा सेक्युलर पाया धोक्यात येण्याचा संभव आहे.

‘जात नाही ती जात’ हे मुस्लिमांवरील लेखात परत परत जाणवत राहते. समताधिष्ठित धर्म म्हणून, अनेकांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला परंतु इस्लाममध्ये फक्त मशिदीत सर्व समान असतात. कदाचित रोटी व्यवहारातही असतील परंतु बेटी व्यवहारात मात्र नाही. म्हणूनच आज मागास मुस्लिम संघटनांचा उदय झाला आहे. मात्र स्वत:ला दलित, मुस्लिम म्हणवणाऱ्या नेत्याचे, सर्व दलितांनी मुस्लिम व्हावे हे आवाहन वाचून गंमत वाटते. कारण म्हणे ‘इस्लाम श्रेष्ठ आहे किंवा सरस आहे.’ बौद्ध का नाही? जातीच्या राजकारणाव्यतिरिक्त अशा तऱ्हेच्या आवाहनाचा काय उद्देश? मात्र दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चन वा दलित शीख यांचे प्रश्न आहेत व त्यांना उत्तर मिळायला हवे.

सुखदेव थोरात यांचा ‘आर्थिक विकासाबद्दल बी. आर. आंबेडकर यांचे विचार’ हा लेख अतिशय उद्बोधक वाटला. बहुतेक वेळा डॉ. आंबेडकरांचे विचार हे निखळ दलितांसंदर्भात सीमित करून टाकले जातात. परंतु या लेखातून त्यांचे द्रष्टेपण दिसते. डॉ. आंबेडकर अर्थशास्त्राचेच विद्यार्थी. त्यांनी शेती व कारखानदारीचा विकास, योजना, पाणीप्रश्न, वीज व कामगार अशा अनेक प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केले आहेत व आजच्या प्रश्नांवरही ते सुसंगत आहेत. भांडवलशाहीला पर्याय अशा व्यवस्थेचा विचारही त्यांनी केलेला होता. डॉ. आंबेडकरांचे द्रष्टेपण, मोठेपण त्यांनी र. धों. कव्र्याची केस विनामोबदला लढवली त्यात दिसून आलेच होते, परंतु त्यांचे इतर अनेक विषयांवरील विचार दुर्लक्षित राहिले त्याचे वाईट वाटते व स्वतंत्र भारताने त्यांचा इतर अनेक क्षेत्रांत उपयोग करून घेतला नाही याची खंतही वाटते. एकेका जातीच्या नावे एखाद्या पुढाऱ्याला टाकले की त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करायला अन्य समाज मोकळा होतो हेच खरे.
वासंती दामले