आपले एक पुण्याचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी सांगितलेला एक भावपूर्ण अनुभव. वाचून पहा.
—————————————
प्रिय मराठी बांधवांनो,
सप्रेम नमस्कार.
मी मध्यंतरी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. तिथून एके दिवशी मराठी माणसाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक अशा पन्हाळगडाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे वर्तमान यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे, केवळ ऐहिक प्रगतीच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी मूलभूत स्वभाव वैशिष्ट्य़ांमध्येसुद्धा. स्वदेश व स्वसंस्कृतीसाठी दिल्लीच्या मोगलाईशी प्राणपणाने लढणारा मराठी माणूस आज दिल्लीश्वरांपुढे गोंडा घोळण्यात धन्यता मानतो. फारशी, अरबी भाषांमधील शब्दांच्या आक्रमणापुढे मराठी भाषा लोप पावण्याची भीती ओळखून मराठीभाषाशुद्धीसाठी मराठीतील (बहुधा देशातील) पहिला राजव्यवहार शब्दकोश बनवून घेणार्या पराकोटीची दूरदृष्टी असलेल्या शिवछत्रपतींचे वंशज म्हणवणार्या आपणाला आज आपल्या राज्यात आपल्या मायबोलीची व संस्कृतीची पूर्णपणे उपेक्षा करून इंग्रजी आणि हिंदी भाषांची जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नांबद्दल काहीही खंत न वाटता उलट त्यात प्रतिष्ठा वाटते.
हा टोकाचा परस्परविरोध मला पन्हाळा-भेटीत अधिक प्रकर्षाने जाणवला व त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता लक्षात येताच शरमेने मान खाली झाली.
माझी ही रडकथा तुम्हालाही ऐकवावी व माझ्या दुःखात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हे पत्र लिहित आहे. (आनंद एकटाच उपभोगावा आणि दुःखात मात्र वाटेकरी शोधावे असा माणसाचा स्वार्थी स्वभाव असतो, त्यालाही हे धरूनच आहे म्हणा.)
पन्हाळा हे कोल्हापूरपासून केवळ २० कि०मी०वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुमारे ४००० लोकवस्तीचे एक गाव. क्षेत्रफळ विस्तीर्ण म्हणजे ४०० एकराचे असले तरीही तसे हे खेडेच. जमीन ही काळ्या कातळाची व जांभा दगडाची असल्यामुळे शेती अशी नाहीच. गुरांना चरायलाही फारशी माळराने नाहीत. पाण्यासाठी विहीरी मात्र बर्याच आहेत असे म्हणतात. पण एकंदरीत शेती व दूधदुभत्याच्या अभावामुळे येथील स्थानिक जनता उदरनिर्वाहासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यतः पर्यटनावरच अवलंबून. पण पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ऋतुकालावर अवलंबून (seasonal) असल्यामुळे एकंदरीत तशी गरीबीच आढळते. शिक्षणाचे प्रमाणही फार नसावे. एकूण लोकसंख्येपैकी बरेच मुसलमान आहेत आणि तेही शिवाजी महाराजांवर प्राणापलिकडे निष्ठा असणारा व त्यांच्यासाठी बलिदान करणारा पन्हाळ्याचाच सिद्दी वाहब (महाराजांचा अंगरक्षक सिद्दी हिलाल याचा मुलगा) याच्या नावाने शपथ घेणारे. सर्वांची मातृभाषा, (पितरभाषासुद्धा) मराठीच.
आदिलशहाचा मुख्य सरदार अफझलखान याचा वध झाल्यानंतर १८च दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ या दिवशी शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याचे व्यूहात्मक महत्व (strategic importance) ओळखून त्याला उपराजधानीचा दर्जा दिला. या घटनांनी संतापलेल्या आदिलशहाने आपला सरदार सिद्दी जोहर यास ५०-६० हजाराच्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या स्वारीवर पाठवले. सिद्दी जोहराने किल्ल्यास वेढा दिला. ४ महिने १० दिवस वेढ्यात अडकून पडल्यावर गडावरील दाणावैरण संपू लागली आणि शेवटी १२ जुलै १६६० रोजी शिवाजी महाराजांनी नाईलाजाने हा किल्ला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. राजांसारखा दिसणारा व जातीने न्हावी असणारा वीर मावळा शिवा काशीद लाखाच्या पोशिंद्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यासारखे वेषांतर करून बलिदानाच्या तयारीने सिद्दी जोहरच्या भेटीला पुढच्या दरवाजाने गेला आणि मागल्या पश्चिमेकडील दरवाजाने राजे पौर्णिमेच्या रात्री पालखीतून गडाबाहेर निसटले व विशाळगडाकडे निघाले. इथे सिद्दी जोहरला फसगत लक्षात आल्यावर त्याने पालखीतून जाणार्या महाराजांना पकडण्य़ास घोडदळ पाठवले. त्यांना घोडखिंडीत तुटपुंज्या मावळ्य़ांसह अडवून ठेवून राजे विशाळगडावर पोचल्याच्या तोफा ऐकेपर्यंत जीव कुडीत धरून ठेवणारा वीर बाजी प्रभू देशपांडे याच्या रक्ताने पावन झालेला तो पावन खिंडीचा परिसर मराठी माणसाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रच आहे.
अशा त्या पन्हाळ्याची कहाणी आमच्या वाटाड्याने (तो एक स्वाभिमानी मराठी मुसलमान होता) मोठ्या त्वेषाने सांगितली. ती ऐकताना माझी छाती अभिमानाने फुलली होती व वीररसाने चेतलेले ऊष्ण रक्त धमन्यातून वाहताना कान गरम आणि चेहरा तांबडालाल झाला होता, हाताच्या मुठी वळल्या होत्या. मुद्दामच गाडी न वापरता चार तास पायी गडावर फिरून आम्ही तो वीरपट पाहिला. वाटाड्याने आपले काम संपवले तरीही बराच काळ मन छत्रपतींनी शिकवलेल्या स्वाभिमानाच्या भावनास्थितीतच गुंतले होते.
पण नंतर लवकरच काही अशी दृष्ये पाहिली की आमच्या छातीतील स्वाभिमानाची हवाच निघून गेली व धमन्यातील वीररसाने तापलेले रक्त शरमेच्या भावनेने गोठून गेले.
पन्हाळ्याच्या यूनियन (यून्यन?) बॅंकेच्या समोर उभे राहून आपल्या मायबोलीचा अपमान पाहिल्यावर महाराजांना दिल्लीच्या दरबारात औरंगजेबापुढे उभे राहिल्यावर जसे अपमानित वाटून चीड आली असेल तसेच क्षणभर वाटले. पण त्यानंतर आजचा नेतृत्वविहीन मराठी माणूस अशा बाबतीत निमूटपणे अपमान गिळून गप्प बसण्याशिवाय काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात येताच आपल्या अशा भिकारराष्ट्राची लाज वाटली. आजचा मराठी माणूस शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी थोर मराठी पुढार्यांनी शिकवलेले सर्व आदर्श विसरून पुन्हा महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या पूर्वीच्या काळातील गुलामगिरीच्या स्वभावावर गेलेला आहे. फक्त शासनकर्ते, दिल्लीश्वर बदलले. पण त्यांची दडपशाहीची वृत्ती आणि महाराष्ट्राचा सत्तेपुढे नांगी टाकण्याचा स्वभाव तसाच आहे.
खालील दुव्यावरील चित्रपुस्तिकेमधील छायाचित्रे क्रमाने पहा व त्यांच्या क्रमांकानुसार खाली दिलेले टिपण वाचा.
१. वीररत्न बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा. लुब्रेपणाने गुलामगिरीचे आयुष्य जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी स्वाभिमानाने प्राणार्पण करावे असेच तर या सर्व वीर मराठ्यांचे म्हणणे होते. आणि थोर व्यक्तींचे पुतळे त्यांनी दाखवलेल्या आदर्शांची आपल्याला पुनःपुन्हा आठवण व्हावी म्हणून तर उभारले जातात.
२. पन्हाळा गावातील यूनियन बॅंकेच्या प्रवेशद्वारावरील नावाचा फलक. भाषा- इंग्रजी, मराठी, हिंदी. त्यांचा प्राधान्यक्रम/महत्वक्रम- इंग्रजीला सर्वात जास्त दृश्यमहत्व व राज्यभाषा मराठी दुसर्या क्रमांकावर. केवळ नावापुरता मराठीचा मुख्य नामफलकावर उल्लेख. बाकी पूर्णपणे दुर्लक्ष.
३. प्रवेशद्वारावर लावलेली बॅंकेची घोषणा- फक्त हिंदीमध्ये. मराठी मात्र पूर्णपणे दुर्लक्षित. दिल्लीश्वर म्हणतात – “बदले हैं हम”. पण ते इतर भाषिक राज्यांच्या बाबतीत. मराठी माणसावर भाषा लादणे चालूच आहे. नाहीतरी आजचा मराठी माणूस लोचट, निरभिमानी, अल्पसंतुष्ट आणि खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानणारा असाच आहे. ते म्हणतात- “हमारा नया लोगो इस बदलाव का प्रतीक है”. याचा अर्थ पन्हाळ्यातील दोन टक्के लोकांनाही कळणार नाही. आणि तो कळावा अशीही कोणाची इच्छा नसावी. (मलासुद्धा हे सर्व “कौन लोगोके बारेमें” बोलत आहेत हे कळायला बराच वेळ लागला.)
४. ग्राहकांना धन्यवाद फक्त हिंदीमधून, मराठीचा प्रश्नच नाही. “कारोबारी लक्ष्य को प्राप्त करमे में आपके सक्रिय सहयोग हेतु” ह्याचा अर्थ पन्हाळ्याच्या शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक (कोल्हापुरी भाषेत – हिंदीचं मास्तर) तरी सांगू शकेल काय? या बॅंकेचं घोषवाक्य आहे, “अच्छे लोग, अच्छा बैंक”. अर्थात हा विनयशीलतेचा गुणदेखिल केवळ हिंदी भाषकांसाठी, त्यांच्याच भाषेत. पन्हाळ्याच्या गावकरी मराठी माणसांना तसे पटवून देण्याची आवश्यकताच काय?
५. ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी आणि त्यांच्या तक्रार निवारणासाठी माहिती. ही सुविधा देखिल फक्त हिंदी भाषकांसाठीच. मराठी माणसांची सेवा करायची इच्छा कोणाला आहे?
६. बॅंकेच्या कामाच्या वेळेसंबंधी माहिती. एवढी साधी माहितीसुद्धा जाणून घेण्याचासुद्धा पन्हाळ्यासारख्या गावातील मराठी ग्राहकाचा अधिकार नाही !
७. रिझर्व बॅंकेने प्रसिद्ध केलेली बनावट नोटा ओळखण्यासंबंधीची माहितीपत्रके. ही बंगाली, तमिळ, आसामी, उर्दू इ० सर्व राजभाषांत उपलब्ध असणारच. त्यात नावापुरती मराठीतही छापली असतील. पण पन्हाळ्यासारख्या लहान गावातही स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याची इच्छा नाही. महाराष्ट्रातील दुय्यम दर्जाच्या मराठी नागरिकांची काळजी कोणी व कशाला करावी? शिवाय रु. १००, ५००, १०००च्या नोटा या अडाणी मराठी माणसांच्या दृष्टीला तरी पडतात का? त्यांना या पत्रकाचा काय उपयोग? म्हणून हे पत्रक इंग्रजी व हिंदी जाणणार्यांसाठीच प्रसिद्ध केलेले दिसते आहे.
८. धूम्रपान प्रतिषिद्ध (मनाई) असल्याबद्दलच्या पाट्या. केवळ हिंदी आणि इंग्रजीमधून. पन्हाळ्यातही आम्हाला हिंदी व इंग्रजी भाषिक ग्राहकच हवेत. लोचट मराठी माणसे हवीत कशाला?
९. तीच गोष्ट कर्जदार व चालू खातेदारांच्या बाबतीत. ह्या सुविधा उद्योजकांना लागतात. कर्जे घेऊन धंदा करण्यासाठीही गाठीला मूळचा पैसा असायला लागतो आणि कर्ज कौशल्यपूर्वक बुडवण्यास तर विशेष बुद्धी लागते. त्यामुळे या सुविधा निरुद्योगी आणि भणंग मराठी माणसांना नाही. त्यांनी फारतर शेती किंवा चाकरी करावी व अंथरूण पाहून पाय पसरून (डोक्यावरून पांघरूण घेऊन) झोपावे. त्यांना कर्ज हवे कशाला आणि देणार तरी कोण?
१०. मोठ्या रकमा खात्यातून काढणे हे मराठी लोकांचे कामच नाही. त्यामुळे त्या संबंधीच्या सूचनादेखिल मराठीत असण्याची आवश्यकता नाही. रोख पैसे भरण्यासाठी खिशात पैसे असावे लागतात व खात्यातून काढण्यासाठी खात्यात पैसे असावे लागतात. आम्ही मुंबई-पुण्यातही हिन्दी-इंग्रजी बोलणार्या ग्राहकांनाच सेवा द्यायची इच्छा असते; तर पन्हाळ्यामधील गोरगरीब मराठ्यांना आम्ही का भीक घालणार? मुंबईत म्हणतातच ना – “मुंबई घ्या तुमची, पण भांडी घासा आमची”.
बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या समक्ष मी मुद्दाम बॅंकेमध्ये कामासाठी आलेल्या व बॅंकेबाहेर उभ्या असलेल्या (छायाचित्र क्रमांक २ पहा) सामान्य पन्हाळावासी लोकांना विचारले की या हिंदी व इंग्रजी पाट्यांपैकी तुम्हाला किती पाट्यांचा अर्थ कळला? एकाही गावकर्याला कुठलीही पाटी समजली नव्हती. “मग हा अट्टाहास का व कोणासाठी? इतर राज्यात त्यांच्यात्यांच्या राज्यभाषेत माहिती लिहिली जात असता केवळ महाराष्ट्रातच ही हिंदीची दादागिरी का? लिपी सारखी असल्याने असे जर केले जात असेल तर महाराष्ट्रात मराठीतच पाट्या लावाव्यात व हिंदी भाषिकांनी तीच लिपी वाचून अर्थ समजावून घ्यावा. स्थानिक माणसावर अन्याय का?” पण त्या मराठी बॅंक-व्यवस्थापकाकडे या प्रश्नांना काहीही उत्तर नव्हते.
मला एक सांगा. अशी दृश्ये तमिळनाडू, केरळ, बंगाल, आसाम, ओरिसा, गुजरात इ० राज्यातील गावात तर सोडाच पण शहरात तरी दिसतात काय? मुंबई-पुण्याला बहुभाषिक म्हणणारे महाभाग बंगळूरू व कोलकात्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये व्यवहार करतात आणि आमच्या राज्यात पन्हाळ्यासारख्या खेड्यात मात्र हिंदी-इंग्रजीची जबरदस्ती करतात. ह्या मागची कारणे काय?
आपल्याला माहित असेलच की बंगळूरू शहरात गेली अनेक दशके कानडी भाषकांपेक्षा तमिळ भाषक अधिक आहेत. पण त्याचा परिणाम कुठल्याही शासकीय किंवा खासगी दळणवळणात (संज्ञापनात) दिसून येत नाही. सर्वत्र तोंडी व लेखी माहितीसाठी कानडीलाच सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. पण महाराष्ट्रातील सर्व शहरातच नव्हे तर अगदी आडगावात देखिल मराठीला कटाक्षाने दुर्लक्षित केली जाते.
या सर्वामागे एकच तत्त्व आहे. अन्याय करणार्या पेक्षासुद्धा तो मुकाट्याने सहन करणारा हा अन्यायास अधिक जबाबदार असतो. दुसर्याने कानशिलात लगावली तर “तो अन्याय नाही, त्याने प्रेमाने मला चापटी मारली” असे मानणार्या निर्लज्ज, निरभिमानी लोकांना न्याय कसला आणि अन्याय कसला? (इथे कृपया महात्मा गांधींना मध्ये आणू नका. गांधीजींनी स्वतः असा जुलूम अमान्यच केला असता. गांधीजींनी भाषाविषयक विचारांवर अनेक सुंदर लेख लिहिले आहेत.)
स्वाभिमानशून्य मराठी माणूस इतका लोचट आणि थप्पडखाऊ झाला आहे की अशा गोष्टींच्या बाबतीत तो गांधीजींच्या माकडांचा दाखला देऊन “अन्याय पाहू नकोस, अन्याय ऐकू नकोस व अन्यायाविरुद्ध बोलू नकोस” असे स्वतःला बजावून अशा वेळी आपले डोळे, कान आणि तोंड ही ज्ञानेंद्रियांची भोके तर बंद करतोच पण स्वतःच्या स्वाभिमानाची सुरळी करून, तिचे बूच मारून आपल्या इतर सर्व संवेदना देखिल बुजवून टाकतो. स्वतःच्या भाषेबद्दल दुरभिमान नसावा; दुसर्याच्या भाषेबद्दल तिरस्कार नसावा. पण स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा आणि निरभिमान म्हणजे विशाल हृदयाचे लक्षण असं तर नाही ना? म्हणूनच मराठी माणसाचा अशा प्रकारचा स्वाभिमान ते निरभिमान असा प्रवास पाहून मन अगदी विषण्ण होतं.
आणखी काय लिहू?
कळावे,
आपल्यापैकीच एक मराठी बांधव,
सलील कुळकर्णी